श्रीमती उज्ज्वला केळकर

? ५ मार्च –  संपादकीय  ? 

हरी नारायण आपटे

अर्वाचीन मराठी वाङमयाचे जनक, विशेषत: मराठी कादंबरी आणि लघुकथांचे जनक हरी नारायण आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ मध्ये झाला. पूर्वापार चालत आलेल्या लेखनापेक्षा अगदी वेगळ्या प्रकाराचं लेखन त्यांनी केलं. त्याचा प्रभाव पुढल्या लेखकांवर पडला म्हणून त्यांच्या कालखंडाला हरिभाऊ युग असे म्हणतात आणि हरीभाऊंना युगप्रवर्तक.

हरिभाऊंनी १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक कादंबर्या् लिहिल्या. याशिवाय २ स्वतंत्र नाटके, ३ रूपांतरित नाटके व ३ प्रहसने लिहिली. त्यांच्या सामाजिक कादंबरीत तत्कालीन सामाजिक, राजकीय, संस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडवते. त्यांच्या कादंबर्यां स्त्रीकेन्द्रित आहेत. स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडणे, हेच त्यांच्या कादंबरीचे सूत्र आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुष जातीची व समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता त्यातून व्यक्त झाली आहे.

ह. ना आपटे ‘ज्ञानप्रकाश’ मासिकाचे काही काल संपादक होते. ‘आनंदाश्रम’ या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकही होते. ‘करमणूक’ या मासिकाचे संस्थापक सदस्य होते. केशवसुतांची कविता व गो.ब.देवल यांचे संगीत शारदा हे नाटक हरिभाऊंनी प्रकाशात आणले. त्यांनी अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना लिहिल्या. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली त्यांनी भास्कराचार्याँची लीलावती , राणी दुर्गावती इ. ची बोधप्रद माहिती प्रकाशित केली.

ह. ना. आपटे यांची काही महत्वाची पुस्तके – सामाजिक – १. पण लक्षात कोण घेतो? २. जग हे असे आहे. ३. चाणाक्षपणाचा कळस, ४. मधली स्थिती ५. मायेचा बाजार, ६. मी, ७. यशवंत खरे

यापैकी ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी कादंबर्यां चा मानदंड मानली जाते. १. ऐतिहासिक पुस्तके – १. उष:काल, २. केवळ स्वराज्यासाठी, ३. गड आला पण सिंह गेला, ४ चंद्रगुप्त व चाणक्य, ५ वज्राघात, ६. सूर्योदय, ७. रूपनगरची राजकन्या याशिवाय स्फुट गोष्टी भाग १ ते ६ हे त्यांचे कथा संग्रह आहेत, तर संत सखू व संत पिंगळा ही नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘हरीभाऊंची पत्रे ‘ म्हणून त्यांच्या पत्रांचेही संकलन, ससंपादन झाले आहे.

अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

ह. ना. आपटे यांच्या संबंधीची काही महत्वाची पुस्तके –

१. आलोचना – ह. ना. आपटे विशेषांक (१९६३)

२. ह. ना. आपटे चरित्र – रा.भी. जोशी

३. ह. ना. आपटे चरित्र व वाङ्मय विवेचन – वेणूताई पानसे

४. ह. ना. आपटे संक्षिप्त चरित्र – बापूजी मार्तंड आंबेकर

५. ह. ना. आपटे निवडक वाङ्मय- साहित्य अकादमी – संपादक विद्याधर पुंडलिक

६ हरिभाऊ आपटे – आत्मचरित्रात्मक कादंबरी- मी – डॉ. रेखा वडीरतार्य

☆ ☆ ☆ ☆ ☆

डॉ. नारायण गोविंद कालेलकर

डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे मराठी भाषिक भाषावैज्ञानिक होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९०९चा. ५०च्या दशकात भाषाविज्ञान या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी या विषयावर मराठीतून लिहायला सुरुवात केली. भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास या अर्थी भाषाविज्ञान ही संज्ञा आज वापरण्यात येते, त्या प्रकारच्या अभ्यासाचा प्रारंभ त्या काळात झाला. नव्या अभ्यास शाखेचा परिचय करून देणारे लेखन मराठीत करणार्याा लेखकांपैकी डॉ. कालेलकर हे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते सायाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती मिळवून पॅरीसला गेले. तिथून परतल्यावर बडोदायेथील महाविद्यालयात तसेच विद्यापीठात फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्र हे विषय शिकवले.

कल्चरल एक्स्चेंज फेलो म्हणून ते पुन्हा पॅरीसला गेले. तेथील विद्यापीठात त्यांनी ‘ऋद्धिपूर’ वर्णनावरचा ( हा महानुभाव ग्रंथ आहे.) आपला प्रबंध फ्रेंचमधे सादर केला व डी. लिट. मिळवली.

१९५५-५६ ला रॉकफेलर प्रतिष्ठानची ज्येष्ठ अभ्यासवृत्ती मिळवून ते अमेरिकेत गेले. तिथे येल विद्यापीठात भाषाविज्ञान विभागात त्यांनी अध्ययन केले.
पुण्याच्या डेक्कन कॉलेज – पदव्युत्तर व संशोधन संस्था इथे इंडो-आर्यन भाषांचे ते प्रपाठक होते. नंतर याच संस्थेत भाषाविज्ञान विभागाचे ते प्रमुख झाले.

लेखन- संपादन

सायाजी साहित्य मालेचे २४६वे पुष्प म्हणून रिचर्ड फिक यांच्या जर्मन ग्रंथाचा डॉ. शिरिष कुमार मैत्र यांनी केलेल्या इंग्रजी अंनुवादावरून ‘बुद्धकालीन भारतीय समाज’ हे पुस्तक लिहिले.

१. ध्वनीलहरी, २. भाषा आणि संस्कृती, ३. भाषा, इतिहास आणि भूगोल ही त्यांची भाषाविज्ञान या ज्ञानशाखेची तोंडओळख करून देणारी पुस्तके.
त्यांनी भाषाविषयक पुस्तकांची परीक्षणेही लिहिली. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत त्यांनी लेखन केले.

आधुनिक मराठी वाङ्मयाचे जनक असलेल्या ह. ना. आपटे आणि मराठीतील भाषाशास्त्राचे पंडीत डॉ. नारायण गोविंद कालेलकर यांच्या कार्याला शतश: प्रणाम.?

 

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments