सौ राधिका भांडारकर

??

☆ शून्य.. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

शून्याला हेटाळणार्‍या सगळ्या अंकांना शून्यानेच एकदा उत्तर दिले.प्रत्येक अंकाच्या शेजारी जाउन तो उभा राहिला.आणि मोठ्याने म्हणाला,बघा आता तुमची किंमत किती वाढली ते…केवळ माझ्यामुळे…

खरंच की ,शून्यामुळे एकाचे दहा ,दोनाचे वीस, …सत्तर ऐंशी नव्वद..लाख करोड अब्ज…

वा!!वा!! मग सगळे जणं शून्याला खूपच भाव देऊ लागले..

शून्य ही संकल्पना,गणितशास्त्रात एक संख्या, स्थानमूल्य दर्शक म्हणून वापरली जाते.शून्य आणि दशमान पद्धती ही भारतीयांनी ,जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे.त्यापूर्वी,मोठ्या संख्या लिहीणे व त्यांची गणिते मांडणे फार किचकट असे.

पण त्यापलिकडेही जाऊन शून्याविषयी काही विचार मांडावेसे वाटतात.

अंकाला शून्याने गुणले ,भागले तरी उत्तर शून्यच येते. कोणत्याही अंकात शून्य मिळवा नाहीतर वजा करा अंक तोच राहतो …यामधे मला एक दडलेले आध्यात्मिक तत्वच दिसतं…कुठल्याही बाह्य परिस्थितीचा परिणाम न होणारा एक स्थितप्रज्ञच मला या शून्यात दिसतो…

शून्य म्हणजे गोल.पृथ्वी तारे ग्रह सूर्य चंद्र सारेच गोल…एक संपूर्ण अवकाश.एक पोकळी. ब्रह्मांड…

सार्‍या विश्वाचीच निर्मीती एका शून्यातून झाली…

शून्य म्हणजे काही नसणे.शून्य म्हणजे निराधार.

शून्य म्हणजे निर्बंध .मुक्त.कोरे. शांत…

म्हणूनच शून्य मला नेहमीच निर्मीतीचे भांडवल वाटते.आणि शून्यातून जे निर्माण होते ते स्वयंप्रकाशी  ,लखलखते असते.अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी असते….

जेव्हां तुमची पाटी कोरी असते तेव्हांच तिधे स्वच्छ अक्षरांची निर्मीती होते….

शून्यात जाणे ही एक मोठी प्रक्रिया आहे..

शून्य स्थिती ही एक सिद्धी आहे…

शंभरपैकी तुला किती गुण मिळाले.शून्य गुण मिळाले.याचा अर्थच तुला एक उद्देश्य मिळालं..

ध्येय गाठण्याची ईर्षा या  शून्यातूनच उत्पन्न होते….

म्हणूनच शून्य स्थिती,शून्यावस्था, शून्यांतर्गत यात नकारात्मकता नसून एक प्रकाश अवस्था आहे…पर्णभार गळून गेलेलं झाड शून्य दिसतं..

ओकं बोकं दिसतं…पण कालांतराने त्याच जागी नवी पालवी फुटून पुन्हा यौवन प्राप्त होते…

शून्य झालेल्या मनातच नवकल्पनांची निर्मीती होऊ शकते…

शून्य म्हणजे शेवट नाही. शून्य म्हणजे सुरवात…

 

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं

पूर्णात् पूर्ण मुदच्यते

पूर्णस्य पूर्णमादाय

पूर्ण मेवावशिष्यते।।

 

शून्य म्हणजेच पूर्ण..

आणि शून्यातून शून्याकडे हा निसर्गाचाच

नियम आहे,…

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
SHARAD DIVEKAR

शुन्याचा महिमा खुपच छान व्यक्त केला आहे.