श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-……”माणसांचे वरवर दिसणारे रंग पक्के असतातच असे नाही.ते विरुनही जाऊ शकतात.तुला अनोळखी असला तरी आपल्या इंडस्ट्रीत हा ‘रंगभुलैया’ थोडा अधिकच फसवा आहे.”

अभिशी बोलून गुंता सुटेल असं तिला वाटलं होतं पण गुंता अधिकच वाढला.)

” मे आय कम इन सर?”

“ये अश्विनी.हॅव अ सीट”

“सर,तुम्ही बोलावलं होतंत?”

“हो.हे तुझं ऑफर लेटर. ही अॅकनॉलेजमेंट कॉपी साईन कर प्लीज”

सही करतानाही अश्विनी अस्वस्थच होती.

“तुला आनंद नाही झाला?”

“नाही तसं नाही सर पण ही असाइनमेंट स्वीकारावी की नाही याचा मी विचार करतेय.”

“का? काही प्रॉब्लेम?”

अश्विनी क्षणभर विचारात पडली. मग कसेबसे शब्द जुळवू लागली.

“सर, मला वाटतं, अगदी मनापासून वाटतं की समीर इस द राईट पर्सन फोर धीस पोस्ट.नॉट आय.”

“या पोस्टला कोण योग्य आहे हे ठरवायचा अधिकार माझा आहे अश्विनी. आणि ऑफर स्वीकारायची की नाही हे ठरवण्याचा तुझा. पण एक गोष्ट मीच सांगायला हवी म्हणून सांगतो.नीट लक्ष देऊन ऐक. या क्षणी तू कुणासाठी तरी सॅक्रिफाइस करण्याच्या विचारात आहेस.जरूर कर.पण ज्याच्यासाठी तू हा सॅक्रिफाइस करणार आहेस त्यासाठी ती व्यक्ती योग्य आहे कां हेही एकदा तपासून बघ. तुझा एक्सेप्टन्स द्यायला तीन दिवसांची मुदत आहे.तेव्हा विचारपूर्वक निर्णय घे”

सौरभ खरा कोणता हेच अश्विनीला समजेना. हा समोरचा की अभी,समीरच्या मनातला? आणि समीर तरी ? मित्र आहे तो आपला. इतकी वर्षे आपण त्याला ओळखतो. आणि तरीही सरांनी त्याच्याबद्दल असा संशय का बरं व्यक्त करावा?

समीर, अभी आणि सौरभ ! वेगवेगळे मुखवटे घातलेला तिघांचा चेहरा आपल्याला सारखाच का भासतोय अश्विनीला समजेचना.आणि तिला संभ्रमातही  रहायचं नव्हतं. विचारांच्या गुंत्यात अडकून पडायला तिच्याकडे वेळ होताच कुठे ? ‘बोलले तर आत्ताच, नाही तर कधीच नाही.’ तिने विचार केला.

“थँक्स सर.माझा निर्णय तुम्हाला योग्य वेळेत मी नक्कीच कळवेन.पण त्यापूर्वी केवळ उत्सुकता म्हणून स्वतःच्या समाधानासाठी एक गोष्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायचीय”

“कोणती गोष्ट?”

” या पोस्टसाठी समीर माझ्याइतकाच कॉंम्पिटंट असताना तुम्ही मलाच कां प्रेफर केलंत?”अश्विनीच्या नजरेला आणि शब्दांनाही विलक्षण धार होती.सौरभने चमकून तिच्याकडे पाहिलं.

“तुला काय वाटतं? मी तुला कां प्रेफर केलं असेल?”  त्याने गंभीरपणे विचारलं.

“तेच तर मी तुम्हाला विचारतेय सर”

आता उत्तर देण्यावाचून गत्यंतर नाही हे सौरभला जाणवलं. त्याने आपली नजरेची, शब्दांची सगळीच शस्त्रे म्यान केली. तो स्वतःशीच हसला.

“आय एम अॅन्सरेबल टू माय बॉस आय नो .आय ॲम अॅन्सरेबल टू माय सबॉर्डिनेटस् आॅल्सो आय डिडन्ट नो. तुला कदाचित माहीत नसेल, पण हाच प्रश्न काल मला समीरनेही विचारला होता.”

“समीरने..?” तिने अविश्वासाने विचारलं.

“हो. आई आजारी असूनही समीर काल इतक्या तातडीने इकडे कां आला होता असं तुला वाटतं?”

“कां म्हणजे? नेक्स्ट वीक तुम्ही स्टेटस् ला जाणार आहात म्हणून भेटायला आला होता तो तुम्हाला “

“इज इट?” सौरभ तिची किंव केल्यासारखा हसला. “तो आला होता तुझं प्रमोशन थोपवायची मला गळ घालायला. “

“सर..?” अश्विनी अविश्वासाने पहातच राहिली.

“हे प्रमोशन त्यालाच मिळणार हे त्याने गृहीतच धरलं होतं. त्याचा मित्र म्हणून त्याने मलाही गृहीत धरलं असावं. तुझ्या प्रमोशनची न्यूज त्याला समजली आणि तो बिथरला. खूप गळ घातली त्याने मला. बट अॅज अ चेअरपर्सन आय स्टीक्ड् अप टू माय डिसिजन “

संतापातिरेकाने अश्विनीचे डोळे भरून आले.

“रहाता राहिला प्रश्न मी तुला प्रेफर कां केलं हा.आज तू हा प्रश्न शांतपणे विचारलास. काल समीरने हाच प्रश्न मला चिडून-संतापून विचारला होता. तुला इम्प्रेस करायला मी त्याला डावललं असा त्याने माझ्यावर आरोप केलान. ‘ओपन सेशनमध्ये हाच आरोप तू माझ्यावर कर, मी तिथं सर्वांसमक्षच या आरोपाला उत्तर देईन ‘ असं बजावून मी त्याला इथून हाकलून दिलं. माझा स्वतःवरचा ताबाच गेला होता. पण आज तसं होणार नाही. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे अश्विनी. समीर माझा मित्र आहे.तो मला आवडायचा. मित्र म्हणून आणि हुशार न्  सिन्सिअर म्हणूनही. तो खरंच बेस्ट परफॉर्मर होता. पण तुझा परफॉर्मन्सही कमी प्रतीचा नव्हता. तूही हुशार होतीस. तू सुद्धा त्याच्या इतकीच सिन्सिअर होतीस. प्रमोशनचा विचार करायचा तर तुम्ही दोघेही समान पातळीवर होतात. बैठकीतला मित्र म्हणून कोणीही समीरलाच वेटेज दिलं असतं,बट आय डिडण्ट डू दॅट.मी ते वेटेज तुला दिलं. समीरचा आरोप आहे की एक स्त्री म्हणून तुला इंप्रेस करण्यासाठी मी हे केलं.असं कुणाला इम्प्रेस करायला अशा कुबड्यांची मला गरज नाही. पण तरीही एक स्त्री म्हणून मी तुला प्रेफर केलं हे मात्र खरं आहे. कारण एक स्त्री असूनही तू स्पर्धेत कुठेही कमी पडलेली नाहीयस.तू त्याच्याच तोडीचा परफॉर्मन्स रेकॉर्ड केलायस हे मला मोलाचं वाटलं. तुला त्यासाठी माझ्यासारख्या बाॅसवर इंप्रेशन मारायची गरज वाटली नाही. स्त्रीत्त्वाच्या बुरख्याआड लपून तू कधी माझ्याकडून कसली कन्सेशन्स उकळली नाहीस. समीरला फक्त ऑफिसमधे वर्कलोड होतं आणि तुला मात्र ऑफिस आणि घर या दोन्ही आघाड्यांवर.ती सगळी शारीरिक, मानसिक,भावनिक कुतरओढ मॅनेज करून तू त्याच्या तोडीचा परफॉर्मन्स रेकॉर्ड केलास त्याचा एक ग्रेस मार्क मी तुला दिला. बस्स..बाकी कांही नाही.एक रिस्पॉन्सिबल टीम लीडर म्हणून मी हेच करायला हवं होतं ना अश्विनी ?” अश्विनी थक्क होऊन ऐकत राहिली. ‘सौरभ सरांचा हा असा ऍप्रोच खूप रेअर आहे आणि माझ्यासाठी एंकरेजींग सुद्धा.’ तिला मनापासून वाटलं.तिला सौरभसर या क्षणी खूप मोठे वाटले.

“हे सगळं माझं शहाणपण नाहीये अश्विनी.मी माझ्या आईकडे पाहून हे शिकलो.शी वाॅज विडो अॅंड वर्किंग वुमन टू. जिद्दीनं करियर करणाऱ्या मुलींना पाहिलं की मला तेव्हाची ती आणि तिची घुसमट आठवते. म्हणून असेल माझे निर्णय कधीच चुकत नाहीत.” तो स्वतःतच हरवला….!

“थँक्स सर. अॅंड साॅरी फाॅर एवरीथिंग”

“आणखी एक. बोललो, ते स्वतःजवळच ठेव.त्याची चर्चा नको. आणखी एक. समीरला झटकून टाकू नकोस प्लीज.जस्ट फरगीव अॅंड एंकरेज हिम. या मनस्थितीत त्याला तुझ्या सॅक्रिफाईसची नाही तर सपोर्टची गरज आहे “

ती विचारात पडली. पण विचार करायला तिला वेळच मिळाला नाही. कारण केबिनबाहेर समीर तिचीच वाट पहात उभा होता. त्याला पाहिलं आणि एक विलक्षण कोरडेपण अश्विनीच्या मनात भरून राहिलं.पण तिनं जाणीवपूर्वक स्वतःला सावरलं.

“हाय समीर” ती हसली.

” हाय ” समीरच्या जीव भांड्यात पडला.

” चल, चहा घेऊया.” ती आग्रहाने म्हणाली. त्याला तेच हवं होतं.

“आज आलं अरे प्रमोशन लेटर. सौरभसरांनी त्यासाठीच तर बोलावलं होतं.” ती उसन्या उत्साहाने सांगू लागली.

“तू काल बोललीस अभिशी?”

” हो”

“काय म्हणाला तो?”

” हा तुझा प्रश्न आहे.तो तू सोडव असं म्हणाला.तू माझ्यासारखी आणि समीरसारखी अॅंबिशिअस असशील तर प्रमोशन घे आणि नसशील तर सोडून दे असं म्हणाला “

” मग? तू काय ठरवलंयस”

“मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ठरवलंय”

“थँक्स अश्विनी.”

“हो, पण ते माझ्या पद्धतीने “

” म्हणजे?”

“सांगते.पण त्या आधी नीट विचार करुन तू मला अगदी खरं सांग.तुझ्या समोरचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?”

“काल मी सगळं सविस्तर सांगितलंय ना तुला?”

” तेवढंच की आणखीही काही?” तो गप्प. मग थोडी वाट पाहून तीच बोलू लागली,

“आईच्या ट्रीटमेंटचा अवाढव्य खर्च..एवढंच ना?”

“हो”

“देन डोन्ट वरी. समीर, तुझी आई मलाही कुणी परकी नाहीये. आय ऑल्सो ओ समथिंग टू हर फाॅर लव्हिंग ट्रीटमेंट शी गेव्ह मी इन अवर कॉलेज डेज.सोs मी माझा शब्द नक्की पाळेन.त्यांच्या संपूर्ण ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करेन. आय प्रॉमिस”

“भिक घालणारायस मला?  भिकारी आहे कां मी ? ” समीर संतापाने बेभान होत ओरडला. अश्विनी शांतपणे त्याला न्याहाळत राहिली.

“समीर,प्लीज. शांत हो. तू तुझा म्हणून जो प्रॉब्लेम सांगितलायस तो सोडवायचा हाच एक योग्य मार्ग आहे असं मला वाटतं. खरा प्रॉब्लेम आणखी काही वेगळा असेल तर मोकळेपणाने बोल माझ्याशी.मी तोही सोडवेन. तू आईच्या आजारानं खचलायस कीं अपेक्षेप्रमाणे तुला प्रमोशन न मिळता ते मला मिळालं म्हणून दुखावलायस? तुझं ते दुःख हलकं करायला माझं प्रमोशन रिफ्यूज करून ते मी तुला मिळवून द्यावं अशी अपेक्षा आहे का तुझी? तसं असेल तर आज तुझ्याऐवजी अभि माझ्याशी असं वागला असता तर मी त्याला जे सांगितलं असतं तेच तुला सांगते. होs,मी तुझ्यासाठी प्रमोशन रिफ्यूज करेन. तुझं दुःख तुला हवं त्या पद्धतीने हलकं करेन.पण एका  अटीवर.अटच म्हणशील तर अगदी साधी आहे. माझ्या फक्त एका प्रश्नाचं मला पटेल असं उत्तर तुला द्यावं लागेल. प्रश्नही अगदी साधा आहे. समीर, तुझी अॅंबिशन आणि माझी अॅंबिशन अशी तफावत कां करावीशी वाटली  तुला? विचार करून अगदी खरं सांग. तुला स्वत्त्वातला ‘स्व’ जपायचाय की स्वार्थातला ‘स्व’ हे तरी समजू दे मला.सौरभसरांनी निर्णयासाठी मला तीन दिवस दिलेत. मी  वाट पाहीन मी विचारलेल्या प्रश्नाच्या तुझ्या खऱ्या उत्तराची!”

समीर दिङमूढ होऊन ऐकत होता. हव्यासाच्या निसरड्या वाटेवर हरवू पहाणारा त्याचा ‘आतला आवाज’ क्षीणपणे कण्हतोय असं जाणवताच तो दचकून भानावर आला. पण… अश्विनी तिथे नव्हतीच. ती केव्हाच निघून गेली होती..!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments