सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.) इथून पुढे —–

घराचं कुलूप काढत होते तेवढ्यात समोरच्या श्रीवास्तवभाभी ने टोकले .(श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव मी नेमप्लेटवर वाचलेले होते.) “कहाँ होके आई?”- “घर मालिक के यहाँ.!”  माझ्या उत्तरावर ती खुदुखुदू हसू लागली. म्हणाली, “घरमालिक मतलब तुम्हारा हजबंड ! मकान मालिक कहो.”

अशा तऱ्हेने माझ्या बोलण्यातील गमती जमती दोन-तीन महिने तरी इतरांचे मनोरंजन करीत राहिल्या…. आणि मला कळलं की माझी ‘हिंदी’ पुस्तकी आहे… शब्द संख्या खूप मर्यादित आहे… त्यामुळे मला हिंदीवर खूप अभ्यास करावा लागेल.

हिंदीतलं वर्तमानपत्र (अखबार )वाचायला सुरुवात केली. मासिकं ,साप्ताहिकं यांचं वाचन सुरू झालं. पण खूपसे शब्द डोक्यावरूनच जायचे. बोलीभाषा तर मला चक्रावून टाकायची. एकदा तर जमादारनी (सफाई कर्मचारी) तिचा काहीतरी गैरसमज झाल्यानं माझ्याशी दबंगाई करून,  खेडवळ हिंदीत भांडू लागली. शेजारीपाजारी कोणीच दिसले नाही .भांडण आणि तेसुद्धा हिंदीतनं…बापरे मला काहीच सुचेना .बावीस वर्षाचं लहान वय. कधी अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं नव्हतं… मी घाबरून रडायलाच सुरुवात केली. नवऱ्याला साफ सांगून टाकलं.”इथं नाही राहणार मी. ह्या हिंदी लोकांपुढे माझा नाही टिकाव लागणार.”

हे शक्य नाही हे मलाही माहीत होतं. त्यामुळे मी हिंदीवर थोडं वर्चस्व मिळवायचा प्रयत्न करु लागले…आणि दोन महिन्यानंतर जेव्हा आमचा मुंबईला जाण्याचा योग आला, तेव्हा मी हिंदीतून मराठी आणि मराठीतून हिंदी असे शब्दकोष विकत घेतले. (ते अजूनही माझ्याकडे आहेत.)

माझं हिंदी वाचन जोरात सुरू झालं. दिल्ली पब्लिक लायब्ररीत नाव घातलं अन् तूर्तास नोकरी करणार नसल्याने मी घरची पी.आर्.ओ. व्हायचं ठरवलं ….आणि ओळखी-पाळखी वाढवायला सुरुवात केली. (रिझर्व रहाणं तसंही मला आवडायचं नाही.) शेजारीपाजारी , पार्कमध्ये, वाचनालयात सगळीकडेच. व मग संक्रांतीच्या हळदी कुंकवा साठी खूप जणींना बोलावून घेतलं … त्यामुळे हळूहळू सगळ्यांशी माझ्या गप्पा -शप्पा सुरू झाल्या. आणि मी ‘पुस्तकी’ हिंदी वरून ‘बोलचाल की हिन्दी’ वर पोहोचले. अन् मला हळूहळू पंजाबी, हरियाणवी ,राजस्थानी, बिहारी हिंदी सुद्धा समजू लागली. स्वतःला हम आणि समोरच्याला (आप नही) तुम म्हणत बोलणाऱ्या यूपीवाल्यांचा नखरा पण समजला.

त्या ‘आप’वरून एक मजेदार प्रसंगच घडला. वरच्या मजल्यावर राहणारी मिसेस कपूर मला तिच्या घराची किल्ली देऊन गेली होती. अर्ध्या तासात तिचा नवरा आल्यावर त्याला ती द्यायची होती. त्याप्रमाणे मिस्टर कपूर आले. “मिसेज़ गॅडरे, चाबी.” ते म्हणाले. मी किल्ली त्यांना दिली. आणि त्यांच्याशी हिंदीत थोडं बोलले. परत जायला निघालेले ते एकदम थांबले.

” एक बात बताऊ..” असं म्हणत ते एकदम नाराजीच्या स्वरात बोलू लागले,” मैं आपसे इतना बडा हूँ, फिर भी आप से आप कहके बात कर रहा हूँ… और आप हैं कि मुझे ‘तुम’ कह रही है.” बापरे… म्हणजे झालीच पुन्हा चूक!  मग मी माझी बाजू सावरून घेतली. ” सॉरी… थोडा लैंग्वेज प्रोब्लेम…. बुरा मत मानना….अंग्रेजी में जैसे you–तू , तुम, आप सब कव्हर करता है, वैसे थोडासा मराठी में भी है. तुम्ही में तुम और आप दोनो आते है..” आणखी पण असंच काहीसं सांगितलं. मग जेव्हा त्यांची समजूत पटली, तेव्हा लगेहात मी त्यांना हेही सांगायला विसरले नाही, “भाईसाब नॉट गॅडरे…गद्रे है हमारा सरनेम… लैंग्वेज प्रॉब्लेम… आपके साथ  भी…”. ते हसले आणि निघून गेले. पण त्यानंतर मी तुम आणि आप च्या बाबतीत खूप सजग झाले.

हिंदी उच्चारांची पद्धत पण मी आत्मसात केली. मैं, है, ऐसा, वैसा, औरत, और म्हणताना मॅ, हॅ, ॲसा, वॅसा, ऑरत, ऑर–आणि बरीच वेगळी उच्चार पद्धती मला जमू लागली. अन् मग सगळे सोपे झाले. हिंदीभाषिकांकडून  “आपकी हिंदी बहूत अच्छी है” असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments