सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सोनं -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

 (आपण गरीब आहोत, म्हणून समजूतदार कनक खर्चाच्या बाबी टाळायची……)

नववीत असताना मॅडमनी तिला ट्रीपला यायचा आग्रहच केला, “हे बघ, कनक. आतापर्यंत तू कधीच आली नाहीस ट्रीपला. हे शेवटचं वर्ष आहे ट्रीपचं. आईला सांग तुला पाठवायला.”

मग घरी जाऊन तिने आईची खूप मनधरणी केली. पण सुमा हट्टालाच पिटली होती.कनकही फुरंगटून बसली.

दुसऱ्या दिवशी शाळा थोडी लवकर सुटली. घरी येताना कनकला सुमा सोनाराच्या दुकानातून बाहेर पडताना दिसली. सुमाने डोक्यावरून, दोन्ही खांद्यावरून पदर घेतला होता. पण कनकने तिला ओळखलंच. दुकानातून बाहेर पडल्यावर सुमाने इकडेतिकडे पाहिलं आणि ती भराभर पावलं टाकत घराकडे वळली.

कनक घाबरली,’बापरे! आपल्या ट्रीपच्या पैशांसाठी आईने मंगळसूत्र तर गहाण ठेवलं नाही ना? उगीच हट्ट केला आपण. आता घरी जाऊन सांगूया तिला,’मी ट्रीपला जाणार नाही’ म्हणून.’

घरी आल्यावर तिने सांगून टाकलं, “आई, मी नाही जात ट्रीपला.” सुमाला एवढा आनंद झाला, की ती कारण विचारायलाही विसरली.

नववीनंतरच्या सुटीत मॅडमनी सगळ्या विद्यार्थ्यांना क्लासला जायला सांगितलं. आधी दहावीचा अभ्यासक्रम पुरा करणार. नंतर टेस्ट सिरीज.

पण सुमाने नकार दिला, “शाळेत शिकवणार नाहीयेत का? मग वेगळे पैसे भरून क्लास कशाला?”

कनक हटूनच बसली,”वाटल्यास मी एक वेळ जेवीन ;पण मला टेस्ट सिरीज करायच्याच आहेत. “

“काय करायचंय जास्त मार्क मिळवून? तुझी मावशी, आमची ताई एसएससीला पहिली आली होती शाळेतून. आता घरात बसून ‘रांधा, वाढा….’च करतेय ना?”

शेवटी शरद मध्ये पडला, “अगं, ती स्कॉलरशिप मिळवतेय ना!ते पैसे दे की तिला.तेही ओरबाडून घेतेस तू.”

“पण तिच्याचसाठी वापरते ना?”

“ते काही नाही. घालूया तिला क्लासला.”

मग नाइलाजाने सुमाने कनकला क्लासला घातलं. पण त्यामुळे किती ग्रॅम सोनं कमी झालं, या विचाराने ती वर्षभर कासावीस झाली होती.

एसएससीला कनक जिल्ह्यातून पहिली आली. स्कॉलरशिप, बक्षिसं सगळ्यांमधून कॉलेजच्या फीचे पैसे जमा झाले.

पुढे तिने उत्तम मार्कांनी पदवी मिळवली. एमबीए केलं. चांगली नोकरीही मिळाली.

पहिल्या पगारात तिने छान, आपल्या मापाचे, मनासारखे ड्रेस घेतले.

या खर्चामुळे सुमा थोडी नाराज झाली ; पण

जन्मभर वाढत्या अंगाचे कपडे घातलेली आपली लेक योग्य मापाच्या कपड्यांत किती सुंदर दिसते, हेही तिला जाणवलं.

कनकने खोटेच, पण कपड्यांना मॅचिंग कानातले, गळ्यातले व बांगड्या वगैरेही घेतल्या होत्या.

तिला सोन्याचे दागिने घालायला देऊया, असा विचार सुमाच्या मनात आला. पण लग्नात कोरेकरकरीत दागिनेच चांगले दिसतील आणि आता थोडेच तर दिवस राहिलेयत, म्हणून मग तिने तो विचार मनाआड केला. मावशी आता हयात असत्या तर त्यांनीही हेच सांगितलं असतं, या विचाराने तिला शांत वाटलं.

क्रमशः….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments