?इंद्रधनुष्य? 

☆ डालडा…भाग 2 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

( भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.) इथून पुढे —–

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना  लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरेसं मिळणं  शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून सैन्यात मार्गारीन वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकांकडून मात्र या मार्गारीनपेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते.  विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पिटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले, ‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत, तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे ’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पिटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सात वर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती.  पण ‘ वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय आपल्या देशालाच द्यायचे ‘ या हट्टापायी त्यांनी ती नाकारली.

या  काळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळलं.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचं नांव ठेवलं—” टाटा केमिकल्स “ .

टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालिसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबर साबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘ अनार अँड कंपनी ’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात ‘ हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफॕक्चरिंग ‘ नांवाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्टरी सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,

वनस्पती तुपाचा शोध प्रत्यक्षात नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपणही विसरून गेलो,  हे आपले दुर्भाग्य होय. 

नारायणराव भागवतांच्या मुलींनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत, आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाचं नाव अजरामर राहिले आहे.

समाप्त

संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments