सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ ऋण….भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या ‘आशा दीप’ नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले, तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधूनमधून पोस्टमन येऊन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा,  तेव्हा हे ठराविक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या 

आविर्भावात,  बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेऊन वाचत बसलेले असत.  किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत. 

त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली–” देशमुख काका… तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेऊन जा “  

–तेव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच. 

‘आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?’ असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात ‘बार’ भरला होता. मानेनेच ‘ जाउन या..बघा काय आलय..’ असे नानांनी आप्पांना सुचवले, तसे आप्पा  लगबगीने ऑफिसमधे आले. रजिस्टरला नोंद करुन ते जाडजूड envelope आपल्या हातात घेउन ते उठले. 

पाकीट दिल्लीवरून स्पीड पोस्टने पाठवलेले होते. 

त्यावर पाठवणा-याचे नाव नव्हते. फक्त एवढेच लिहिले होते

If undelivered, please return to

Assistant Secretary-Planning

Ministry of Finance

10, Sansad Marg, New Delhi-01

आप्पा देशमुखला दिल्लीवरून कसलेसे जाडजूड टपाल आलय हे एव्हाना दत्तूकरवी सर्वांना समजले होते. 

सारेजण आप्पांभोवती जमा झाले..

मग एक एक प्रतिक्रिया येऊ लागल्या..

“ काय रे आप्पा, या वयात लव्ह लेटर आले काय तुला? एवढे दिवस सांगितलं नाहीस आम्हाला ते..”  आबा क्षीरसागरने आप्पांची खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला.

“ अरे आबा..लव्ह लेटर नसेल..उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावलं असेल राष्ट्रपतींनी आप्पाला—तो मास्तर म्हणून रिटायर होउन पाच वर्षे झालीयेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या—”  बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले. 

“ छे रे..बापू..अरे पत्र बघ कोणाकडून आलय..Department of Planning, Ministry of Finance. आयला, म्हणजे आप्पाला planning commission मधे घेताहेत की काय ? अभिनंदन आप्पा..!!”  पांडूकाका पवार बोलले. 

तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना वर्टीकरने सगळ्यांना शांत केले—

“ अरे बाबांनो..असा अंदाज लावत बसण्यापेक्षा आप्पाला ते पाकीट उघडू तरी द्यात. काय ते कळेलच…ए आप्पा.. उघड रे ते पाकीट..” 

आप्पानी नानांच्या आदेशा प्रमाणे पाकिटाची एक कड कात्रीने सावकाश कापली. आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते. तीन वर्षापूर्वी पत्नी गेली अन सुनेबरोबर पटेनासे झाले,  तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येऊन राहिले होते. मुलगा महिन्यातून एकदा येऊन त्यांना भेटून जायचा. शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे. आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते. आता त्यांचे खाजगी, वैयक्तिक असे काही नव्हतेच. म्हणूनच हे पाकीट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भिड वाटली नाही. 

पाकिटात तीन चार गोष्टी होत्या. आधी एक ग्रिटींग कार्ड निघाले. त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भित्तीचित्र होते व त्यावर सुवाच्य अक्षरात एक मेसेज लिहीला होता..

‘माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक- दिना निमित्त सप्रेम नमन.’

खाली फक्त नाव होते..आरती.

नानांनी ते ग्रिटींग पाहिले व म्हणाले..’अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या…’

—– ( क्रमशः भाग पहिला )

प्रस्तुती : संग्रहिका अंजली गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments