सुश्री अरूणा मुल्हेरकर

?विविधा ?

☆ खिडकी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

रुक्मिणी तिच्या सखीला सांगते,” ते आले,मी त्यांना पाहिलं, बरं का,.सर्वांच्या आधी मी त्यांना पाहीलं”. किती आनंद झाला होता रुक्मिणीला.स्वयंवर नाटकांतील हा प्रवेश.

माझाही अनुभव काही फारसा वेगळा नाही. आमच्या घराच्या खिडकीतूनच मी त्याला प्रथम पाहीलं.

आजूबाजूच्या लोकांकडून तो फारच देखणा आहे, रूबाबदार आहे,असं बरंच काही कानावर आलं होतं पण त्यादिवशी आमच्या दिवाणखान्याच्या खिडकीतून मला त्याचं दर्शन घडलं.ऊंचापुरा बांधा, गुलाबी गौर वर्ण,सोनेरी छटा असलेले कुरळे केस,अगदी उदयाचलीचा अरूणच! मन माझे मोहून गेले!

त्याच वेळी अंतर्शालेय नाट्यस्पर्धेत आमच्या शाळेने ‘ए क होता म्हातारा’ हे मो.ग.रांगणेकरांचे नाटक सादर केले होते आणि त्यांतील “ये झणि ये रे ये रे ये रे ये रे माघारी”हेच पद एकसारखे  गुणगुणण्याचा मला नाद लागला होता.गाता गाता खिडकीतून सहज बाहेर पहायचे आणि अहो आश्चर्य तो आलेला असायचाकीहो!

अग अग  खिडकीबाई आमच्या मूक प्रेमाची तू पहीली साक्षीदार!

काय झालं असतं, घराला खिडकीच नसती तर? कारागृहच! खिडकी पलिकडचं जग किती सुंदर आहे.

आमच्या घरांतून रोज सूर्योदय दिसतो,ती गुलाबी पहाट पाहतांना कसं अगदी प्रसन्न वाटतं,आणि मग आठवतं ते देसकारातलं कृष्णाचं पद,”प्रिये पहा! रात्रीचा समय सरुनी होत उषःकाल हा”!

काही घरांतून सूर्यास्त दिसत असेल, तलावाकाठी असलेल्या घरांना नौका विहार, पक्ष्यांचे उडणारे थवे, तलावाचे निळेशार पाणी अशा सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेता येत असेल. काही  घरे भर वस्तीत रस्त्यावर असतात. रस्त्यावरची वर्दळ, वाहनांचा आवाज,फेरीवाल्यांच्या विक्षिप्त आरोळ्या हेही खिडकीपलिकडचे जग अनुभवणे मजेचेच असते.

मुंबईला मरीनड्राईव्हवर फिरत असतांना दिसतात धनाढ्य लोकांची समुद्राच्या विरुद्ध दिशेला असलेली घरे. घरांना ग्लास वाॅल आणि मोठमोठाल्या फ्रेन्च विंडोज! कांचेच्या पलीकडून उसळणार्‍या लाटा पाहातांना, समुद्राची गाज ऐकतांना ह्या रहिवाश्यांना मिळणारा आनंद काय वर्णावा?

मला आठवतं आम्ही काश्मीरला पेहेलगाम याठिकाणी गेलो होतो.आमच्या हाॅटेलच्या समोरूनच लिडार नदी वाहत होती. तिची अखंड खळखळ, शुभ्र फेसाळलेले पाणी खिडकीतून पाहताना डोळ्याचे पारणे फिटत होते जणू.

अलिकडे टी.व्हीवर कसली तरी जाहिरात दाखवतात.त्याचे जिंगल आहे” काय काय दाखवते ही खिडकी”

मलाही तेच वाटतंकाय काय दाखवते ही खिडकी?

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments