सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ बंधन ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

तसे पहायला गेले तर बंधन, बांध म्हणजे अडवणे, कुंपण घालणे. आपली जागा कुंपणाने किंवा सीमारेषेने बंदीस्त केली की त्यात कुणी अतिक्रमण करत नाही हा बंदिस्तपणा आवश्यक असतो, करावा लागतो.मात्र मनुष्य असो की प्राणी खरेच त्याला बंधन आवडते ?त्याचे उत्तर ‘नाही ‘असेच येईल. पक्षी उन्मुक्त हवेत फिरतो कोणत्याही झाडाच्या फांदीवर बसतो, झोके घेतो, वेगवेगळी फळे चाखतो, घरटे बांधतो अन गाणे गातो. बंध मुक्त जीवन असे असते,  आणि ते असे स्वैर असतात म्हणूनच आनंदाने गातात. पिंजऱ्यातल्या पक्षाला कधी गाताना पाहिलंय ? कारण त्याचे नैसर्गिक वागणे, फिरणे, उडणे आपण कैद करतो आणि म्हणून तो त्याचा आनंद गमावतो. गाईलेच कधी तर ते कदाचित रडगाणेच असेल!

“प्रत्येक मनुष्य जन्मतः स्वतंत्र असतो अन त्याला स्वतंत्र रहाण्याचा अधिकार आहे” फ्रेंच राज्यक्रांतीने मानवास दिलेले एक सूत्र ! जिथे बंधन अर्थात बद्धता असते तिथं हक्कांची, अधिकाराची पायमल्ली होते अन मग अशी बंधने जाचक ठरतात, प्रगतीस मारक ठरतात ;असे असले तरी मनुष्यास अनेक प्रकारची बंधने असतात मनुष्याच्या जीवनास आकार प्राप्त होण्यासाठी त्याला ठराविक बंधने त्या त्या वयात योग्य असतात, त्यालाच मर्यादा म्हणतात. मनुष्याने अमर्याद वागून कर्तव्य विसरू नये म्हणून मग नात्यांची बंधने घातली  त्यातलेच एक रक्षाबंधन ! रक्षा अर्थात रक्षण करण्याची जबाबदारी ! बहिणीचे सर्व परस्थितीत पित्याच्या पश्चात रक्षण, संगोपन, पालन करणे आणि बहिणीने आईच्या पश्चात भावास आईचे निरपेक्ष प्रेम देणे, काळजी घेणे म्हणजेच रक्षाबंधन होय !

कोणतेही  प्रेमाचे बंधन माणसाला हवेहवेसे वाटते, या बंधनात आपुलकी आणि आपल्या माणसाची काळजी,  हीत असते पण बंधनाचा अतिरेक झाला की अन्याय अन गुलामगिरी वाढते, म्हणून बंधन हे धाग्याप्रमाणे असावे ते नाजूक जरूर असावे पण चिवट, लवचिक असावे जेणेकरून कोणत्याही स्वार्थापोटी किंवा गैर समजापोटी तुटू नये ! कोणत्याही नात्यात बंधनातून जबरदस्ती झाली की नाते ताठर बनून तुटते म्हणूनच नात्यात स्वातंत्र्य अबाधित राखून अदृश्य बंध घट्ट व्हावेत की जेणेकरून कुणाचा जीव घुसमटणार नाही.

आज प्रत्येक सण, नाते औपचारिकतेकडे झुकतेय प्रेमाची भेट आनंददायी असते पण सण येताच बहिणीचे मन भावाच्या भेटवस्तुकडे लागणे अन मनासारखी गिफ्ट मिळाली नाही तर रुसवे फुगवे मग भावालाही हे सर्व नकोसे वाटून त्याने हे बंधन टाळणे असेच काहीसे होतेय !

खरे तर हा सण एकदिवसाचा नसून बहीण भावाने आजन्म पाळावयाचा आहे, जसे आपण भावावर हक्क गाजवू पहातो तसेच कर्तवय तत्परताही हवी, भाऊ जसा आपला असतो तशीच वाहिनी ही आपली समजून तिच्यावरही आपल्याला निरपेक्ष प्रेम करता यायला हवे म्हणजे नात्यात कटुता येणार नाही.कोणतेही नात्यांचे बंध जटिल न होता अलवार गुंफण झाल्यास वीण घट्ट होते अन नाते चिवट, अतूट होते.

आजच्या दिवशी प्रत्येक बहिणीचे डोळे भावाच्या वाटेकडे असतात,  राख्या बाजारात येताच  बहीण हौसेने छान छान राख्या भावासाठी निवडते, खरेच ज्याला प्रेमळ बहीण लाभते तो भाऊ भाग्यवान आहे अन जिला खंबीर साथ देणारा पाठीराखा भाऊ लाभतो ती बहीण ही भाग्यवानच !आजच्या दिवशी भावाच्या कपाळावर तीलक अन हातात राखी नसणे किती दुर्भाग्य ! ज्याला सख्खी बहीण नसेल त्याने मानस बहिणीला जीव लावावा व नात्याचे प्रेमळ बंध आयुष्यभर निभवावे, टिकवावे  अन या पवित्र नात्याचे निर्भेळ प्रेम मिळवावे !

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments