श्री बिपीन कुलकर्णी

☆ जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-2 ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆ 

एके दिवशी तिन्ही सांजेच्या करकरीत वेळी माय ला अचानक तिच्या सुनेचा फोन आला. त्या फोनने माय हादरली. हेलपाटली. बापाने बघताच तो माय ला सावरायला धावला. त्याला तो निरोप समजताच बाप थरारला. भीतीने गारठून गेला… केविलवाणा होत निःशब्द झाला. माय सुनेशी दोन वाक्य बोलली आणि ती ही गंभीर झाली. बापाच्या चेहऱ्यावर उमटलेली व्याकुळता माय ला स्पष्ट दिसली. तिने विचार केला आणि त्याला घेऊन माय निघाली. पाचव्या मिनिटाला माय आणि बाप त्यांच्या सुने समोर उभे होते. तिची सून समोर शांत बसली होती…. हॉस्पिटल मध्ये.

लेकाला भयंकर अपघात झाला होता.काय आणि कसं घडलं हे त्या दोघांनी सुनेकडून सविस्तर जाणून घेतलं. बापाला सगळं कळताच तो मूक झाला. शेवटी काहीही झालं तरी बाप तो बापच … प्रत्यक्ष जन्मदाता. आता मात्र बापाने सगळी सूत्र आपल्या हातात घेतली.डॉक्टरांना भेटून एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला. अत्यंत धीराने बायको आणि सुनेला सावरून धरलं. ट्रीटमेंट दरम्यान लेकाला रक्ताची गरज पडली. आज बापाने आपल्या शरीरातील अर्ध्याहून अधिक रक्त लेकाच्या धमन्यांत घातलं. शेवटी रक्त बापाचंच होतं. रक्ताला रक्त जुळलं. बापाचं नशीब आणि माय ची पूर्व- पुण्याई थोर… .लेक मरणाच्या दारातून परत आला.

आज त्या माय-बापाचा लेक घरी येणार होता; त्याच्या जन्मघरी. माय त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. त्या गच्च भरलेल्या आभाळाखालच्या हिरव्या पानापानात लपलेल्या पायवाटेवर आभाळ कोसळत होतं आणि पाना पानांत लपलेल्या  वळणदार पायवाटेकडे तिचे डोळे खिळले होते. इतक्यात अस्पष्टशा आकृत्या हलताना दिसल्या. काही मिनिटात ते तिघेही समोर उभे राहिले.लेक एका हातात कुबडी घेऊन तर दुसरा हात बापाच्या गळ्यात टाकून उभा होता. आज तो बाप त्याच्या लेकासाठी कुबडी झाला होता. हळूहळू बाहेरील झड थांबली आणि धूसरलेलं वातावरण स्वच्छ झालं. घरात मात्र त्या चौघांच्या डोळ्यांतील सरीला खंड नव्हता. आभाळातली  सोनेरी किरणे आता काळ्या ढगांना भेदून त्या माय बापाच्या घरात प्रसन्नपणे विखुरली होती. आज बापच आभाळ झाला होता …

लेक पूर्णपणे बरा होईपर्यंत डोळ्यांच्या नेत्रज्योती त्या बापाने चार महिने अखंड तेवत ठेवल्या होत्या. चार महिन्यात बापाने लेकाला तळहातावर झेलले होते आणि घरात सुनेला मुलीचा मान देऊन त्या बापानेच त्रिकोणाचा चौकोन पूर्ण केला होता. शेवटी बाप तो बाप असतो आणि त्याची अव्यक्त माया..?

 ती तर ‘ आभाळ माया ‘ .. खरं ना …?

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
2 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments