सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ घेणेकरी… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मग आमच्या घरी एक वेगळीच वर्दळ सुरु झाली.काॅन्ट्रॅक्टर्स बिल्डर्स आर्कीटेक्ट्स,इंजीनीअर्स…

रात्रंदिवस पपा आणि जीके प्लॅन्स पाहुन चर्चा करीत.

एक रचनात्मक  कृतीचा आराखडा तयार झाला.

अडचणी समस्या होत्या .पण त्यावर मात करण्याच्या योजनाही होत्या…

पपा भराभर चेक्स फाडायचे.काॅन्ट्रॅक्टरने सबमीट केलेल्या बीलांवर सह्या करायचे.संदेह शंका आलीच तर त्यांची सडेतोड आणि समर्थनीय ऊत्तरे जीकेंकडे असायचीच.

सगळं काही सुरळीत योग्य पद्धतीने चालले होते.

उपक्रमाला हवा तसा आकारही आला होता.

कधीकधी पपांना काही गोष्टी स्वीकारताना जड जात होतं.पण जीके सांगतात ना मग ठीकच असणार..

एकदा रात्री जीकेंचा फोन आला.

“एक प्राॅब्लेम आलाय् .ए विंगच्या बांधकामाला म्युनिसीपालिटीने आॅब्जेक्शन घेतलय् .काही पाडावं लागेल.बरंच आर्थिक नुकसान होइल आपलं..बांधकामाची मेजरमेंट्स बदलतील.बुकींग झालंय् .अॅडव्हान्स घेतलेत.”

“अरे पण याला जबाबदार कोण?इंजीनीअर्स आर्कीटेक्ट यांना हे समजायला हवं होतं..”

“हे बघ,तू इतका एक्साईट होऊ नकोस. मार्ग काढु आपण..”

“कुठला मार्ग?”

“अरे वजन ठेवायचं.टाउन प्लॅनींगवाल्यांचा चुका काढण्यामागचा हेतुच हा असतो.तुला पटत नाहीत या गोष्टी.पण काही ईलाज नाही रे बाबा..जगात हेच चाललंय्…”

मग आंजारुन गोंजारुन जीके पपांचा गळ बरोबर पकडायचे..

जीजी म्हणायची “जीके सरळ नाहीय् लुच्चा लबाड आहे…”

पण पपा तिला सहज झटकायचे.मुळात आपल्याला कोण कशाला फसवेल?आणि तंत्र, कायदे, तरतुदी या सगळ्यांचा चौफेर विचार आपणही करतोच की..तेही जागरुकपणे .सज्ञानाने,फसवण्याचा प्रश्नच कुठे येतो?

शिवाय कुंपणच शेत खायला लागलं तर…!

पण कुंपणही शेत खातं..!!

कुठल्यातरी क्षणी आपल्याच चांगुलपणाचा, ठेवलेल्या विश्वासाचा फायदा घेउन आपल्याच माणसाने डोळ्यावर हात ठेवलेला असतो म्हणून आपण फसतो.

हे पपांना जेव्हां जाणवलं तेव्हां फार उशीर झाला होता.

आजकाल जीके प्रश्नांची ऊत्तरे नीट देत नाही ..

हिशेबाची उडवा उडवी करतो..

कागदपत्रं दाखवत नाही..

कायदेशीर बाबींचा पाठपुरावा केला तर त्याचे त्यावर भाष्यच नसते..

आजकाल तर तो  परस्परच निर्णय ,घेतो, अॅॅग्रीमेंटस करतो   ..

पपा खूप अस्वस्थ झाले…

अंतर पडले दर्‍या निर्माण झाल्या.

विश्वासाचे धागे तुटले…मूळातच ते धागे कच्चे होते..!रंग जाणारे होते,हे कळेपर्यंत काय आणि किती खर्ची झालं याचं गणित जेव्हां मनासमोर मांडलं गेलं तेव्हां प्रचंड

मानसिक धक्का बसला…

गणित चुकलं..

इतक्या मोठ्या प्राॅपर्टीचा घुसखोरीने ताबा घेउन जीकेने जेव्हां अत्यंत बेदरकार शब्दांत पपांना सांगितलं,”

“आज तरी तू माझं काही बिघडवू शकत नाही.मी घुसखोर आहे आणि ही प्राॅपर्टी तुझी आहे हे तुला कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल..”

पाठीत खंजीर खुपसला जणु..विश्वास ,मैत्रीचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा क्षणात कोसळला.संतापाचा रागाचा ज्वालामुखी तर भडकलाच पण त्याहीपेक्षा विश्वासघाताची वेदना अधिक तापदायक होती.जपलेल्या भावनांचा चक्काचुर झाला होता..

“अरे! तुझ्यावर मी विश्वास ठेवला,एक क्षणही आपल्याला एकमेकांशिवाय चैन पडत नव्हतं! किती क्षण किती सुखदु:खं आनंद एकत्र साजरी केली…

शेअर केली.हे सारं तू विसरलास?की नुसतं मैत्रीचं नाटक होतं ते?”

कशाचा काही उपयोग नव्हता.एखादा जमिनीतला झरा नाही का सुकून कोरडा ठणठणीत होत!! भावनेचा ओलावाच निघुन गेला..!

पपांना वेदना होती ती केवळ प्रचंड आर्थिक नुकसानाचीच नव्हती तर बिनदिक्कत डोळ्यात धूळ फेकून झालेल्या फसवणुकीमुळे त्यांच्या अस्मितेलाच ठेच पोहचली होती. आपल्यासारख्या जाणकार व्यक्तीला कुणी असा धोका देऊ शकतो हे धक्कादायक होते.

 त्यानंतर त्यांना जे अनुभव आले ते याहुनही त्रासदायक होते.

 कोर्ट,कायदा,केस,वकीलपत्र..पुरावे साक्षीदार..या सर्वांशी आता नव्याने ओळख व्हायची होती.

 राजे वकील म्हणजे पपांच्या बैठकीतले.

“ही केस तुच लढव ..!”असं हक्काने पपांनी त्यांना सांगितले.मात्र त्यांनी सरळ नकार न देता, मी तुला चांगला वकील देतो..जो अशा केसेस हाताळण्यात तरबेज आहे…”

 आणि मग हेही लक्षात यायला लागले की जीकेने सर्वच बाबींची किती विचारपूर्वक तयारी केली होती! साधारणपणे ज्या ज्या नामांकीत वकीलांकडे  पपा जाण्याची शक्यता होती त्या सर्वांना जीकेने आधीच विकत घेतले होते! पपांची विद्वत्ता, प्रतिष्ठा,समाजातील स्थान लौकिक याचा काहीही उपयोग झाला नाही…

पपांनी प्रेस मीटींगही घेतली.पत्रकार आलेही.चहा नाश्ता याचा आनंदे सुहास्य समाचार घेतला.घटनेचा विचारपूर्वक आढावा घेतला…अश्वासन देउन ते परतले.

जीकेचा गुन्हा उघडकीस येईल.त्याचा गवगवा होऊन निदान जीकेची बदनामी तर होईल..??

पण पेपर उघडला तेव्हां डोळेच फाटले.

फक्त चार ओळींचा बातमीवजा मजकूर..तोही संदिग्धपणे लिहिलेला.जीकेंच्या नावाचा उल्लेखही नाही.

आता हे प्रकरण न्यायालयात दाखल आहे ..इतकच..

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments