इंद्रधनुष्य
☆ वैश्विक गणेश यात्रा: चीन मधील ‘भगवान विनायक’ ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
चीन म्हणजे पोलादी पडद्याआडचा देश. या अश्या चीन चे आणि भारताचे संबंध फार प्राचीन आहेत. प्राचीन म्हणजे किती जुने..? काही निश्चित सांगता येणं कठीण आहे. पहिल्या शतकात चीन मध्ये असलेल्या हिंदू मंदिरांचे पुरावे मिळाले आहेत. मात्र हिंदू धर्माचा प्रादुर्भाव चीन मध्ये या पेक्षा ही आधी झाला असावा.
आज सुध्दा चीन मध्ये अनेक हिंदू मंदिरं आहेत. आणि जिथे हिंदू मंदिरं आहेत, तिथे गणरायाची उपस्थिती ही असतेच असते. चीन च्या ह्या हिंदू मंदिरांमध्ये श्री गणेशाच्या अनेक प्राचीन मूर्ती आहेत. येथे गणेशाला बुध्दी आणि समृध्दी ची देवता मानलं जातं.
चीन च्या फुजियान प्रांतात, क्वांझाऊ शहरात, जवळपास वीस हिंदू मंदिरं आहेत. ही सारी मंदिरं साधारण दीड हजार वर्ष जूनी आहेत. त्या काळात चीन चा, भारताच्या तामिळ भाषिक क्षेत्राशी मोठा व्यापार चालायचा. आजच्या तामिळनाडू मधून अनेक वस्तु चीन ला जायच्या, आणि चीन हून साखर आणि इतर पदार्थ आयात केले जायचे. स्वाभाविकतः या क्वांझाऊ शहरात मोठ्या संख्येने तामिळ व्यापारी आणि त्यांची माणसं राहायची. त्यांनीच ही मंदिरं बांधली. (२०१९ च्या डिसेंबर मध्ये चीन चे राष्ट्रपती शी जिनपिंग भारतात आले असताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बरोबर ची एक बैठक तामिळनाडू च्या ‘महाबलीपुरम’ येथे ठेवली होती. सातव्या आणि आठव्या शतकात, पल्लवांच्या काळात, भारत आणि चीन मधील व्यापार येथून होत होता, त्याला उजळणी देण्यासाठी महाबलीपुरम ची निवड केलेली होती). सन ६८५ च्या आसपास, तेग राजवंश्या च्या काळातली ही मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये नंतर स्थानिक चीनी लोक ही यायला लागले आणि पूजा करायला लागले. या मंदिरांवर मेंदारिन (चीनी), संस्कृत आणि तामिळ भाषेतील शिलालेख आहेत. या सर्व मंदिरांमध्ये भगवान गणेश विराजमान आहेत. चीन च्या गंसू प्रांतात तुन-हुयांग (की दुन-हुयांग) शहरातील बौध्द मंदिरांमध्ये श्री गणराय, कार्तिकेयांबरोबर दिसतात.
चीन च्या उत्तर भागात झालेल्या उत्खननात जी गणेश प्रतिमा मिळाली आहे, ती कार्बन डेटिंग च्या अनुसार सन ५३१ ची आहे. चीन च्या अगदी दक्षिण टोकावर असलेले गुआंगदोंग (Guangdong) हे बंदर (port) आहे तर क्वांझाऊ किंवा चिंचू ही सुध्दा बंदरांची शहरं आहेत. तामिळ व्यापारी, सागरी मार्गाने, याच बंदरांच्या रस्त्याने चीन मध्ये यायचे. स्वाभाविकतः या सर्व बंदरांच्या आसपास अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आजही मिळतात. या शहरातील पुरातत्व संग्रहालयांमध्ये भगवान शंकर, गणेश, दुर्गा देवी इत्यादींच्या अनेक प्रतिमा आहेत.
सागरी मार्गाशिवाय, भारतीयांचे चीन ला जायचे इतरही मार्ग होते. आसाम च्या कामरूप हून, ब्रम्हदेशाच्या रस्त्याने भारतीय व्यापारी चीन ला जायचे. काश्मीर च्या सुंग-लिंग हून चीन ला जाणारा अजून एक मार्ग होता. दुसर्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत, दीडशे हून जास्त चीनी विद्वानांनी भारतातील संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद करायला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते. वेदांना चीनी भाषेत ‘मांग – लून’ (ज्ञान आणि बुध्दीचे विज्ञान) म्हटले जाते. अनेक ‘संहिता’ आणि ‘शास्त्रांचा’ अनुवाद चीनी भाषेत उपलब्ध आहे. गंमत म्हणजे यातील काही ग्रंथ असे आहेत, जे भारतात आलेल्या मुस्लिम आक्रांतांनी नष्ट केले होते, परंतु यांचा चीनी अनुवाद उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, ‘सांख्यकारिका’ हा ग्रंथ मूळ संस्कृत मध्ये कुठेही सापडत नाही. मात्र त्याचा चीनी अनुवाद – ‘जिन की शी लून’ (Jin Qi Shi Lun) उपलब्ध आहे. आता या चीनी ग्रंथाचा पुन्हा संस्कृत भाषेत अनुवाद केला गेला आहे. असे इतरही ग्रंथ आहेत.
आज सुध्दा चीन मध्ये, चीनी भाषा बोलणारे, परंतु हिंदू जीवन पध्दती आणि परंपरा मानणारे लोकं राहतात. यांची संख्या तुलनेने कमी आहे. म्हणून चीन च्या पाच प्रमुख पंथांमध्ये यांचा समावेश नाही. परंतु हा समुदाय आज सुध्दा भारतीय सण आणि उत्सव उत्साहाने साजरा करतो. ‘गणेश उत्सव’ हा चीनी पध्दती ने साजरा केला जातो.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈