श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

पाखरांची चिवचिव आणि कोंबड्यांचं आरवणं दोन्ही रोजच्या वेळेपेक्षा खूपच लांबलं होतं. अखेर सूर्य उगवला, पण तो कमनुसाच होता.आजारातून  उठल्यासारखा.अशक्त. थंड पडलेला.बबन्या इतका वेळ मेल्यासारखा पडून होता पण मग याची जाणीव होताच कोणाचीतरी झापड बसावी तसा झामदिशी उठला.जनी कुशीवर झोपलेलीच होती.टिचभर लांबीचं महारवाड्यातलं बोळकांडातलं  झोपडीवजा घर त्यांचं.तीन महिन्यांच्या झिप्रीनं रात्रभर तिच्या केकाटण्यानं सगळ्यांनाच जागवलं होतं.त्यामुळे कांबळं सोडताना त्याची पाठ कुरकुरली.

डोळ्यातली ओली झोप लोचट मांजरासारखी ठाण मांडून बसू लागली तशी बबन्या सावध झाला. त्याने अंगभर आळस दिला आणि कुणीतरी खेचावं तसं तो उठला.त्याने चूळ थुंकली. मडक्यातलं लोटीभर पाणी तो गटागटा प्याला.

“जने….जागी हायस न्हवं? जातुय म्या..” झीप्री पाळण्यात चिडीचूप झोपली होती. ती त्याच्या आवाजाने दचकली.दीड वर्षाच्या शिन्या जनीच्या उबेला घट्ट झोपला होता. त्याच्यामुळे जनीला आपली कूसही बदलता येईना.ती अलगद उठून दाराबाहेर आली तोपर्यंत बबन्या दहा हात लांब गेला होता.

“लवकर या परतून.ऊनं उतरायच्या आदी या .लई यळ लाऊ नगासा.भाकरी लावून म्या वाट बगते..”

जनीनं पारोश्या तोंडानेच आवाज दिला. बबन्याने वळून हात हलवला आणि तो झपापा चालत राहिला.बबन्या गेला. पण त्याच्याबरोबर जन्मापासून त्याला सावलीसारखं चिकटून बसलेलं त्याचं ‘वंगाळ’ नशीबही होतंच. त्यानंच सगळं होत्याचं नव्हतं  करून टाकलं.

त्याचीच ही चित्तरकथा.. देवासाठी आणि देवाच्या साक्षीने घडलेली..!!

तालुक्याच्या गावकुसाबाहेरचा हा महारवाडा.गावाने पिढ्यानपिढ्या दहा हात लांब ठेवलेला.पण गाव आता जवळ येऊ लागलं होतं. काम निघेल, असेल तेव्हा का होईना पण अंतर कमी होऊ लागलं होतं. सरपंचाची माणसे, कधीकधी सरपंच स्वतःसुद्धा  या वस्तीत डोकावून जायचा.खोटं का होईना पण मिठ्ठास बोलायचा. नेहमी कसलं कसलं इलेक्शन असायचंच.ते नसेल तेव्हा दुसरी कांहीबाही कामं तरी निघायचीच.

आजसुध्दा एवढ्या सकाळीच चूळ भरून बबन्या रस्त्याला लागला होता ते सरपंचाच्याच सांगण्यावरून. झिप्री झाली तेव्हा हो नाही करता करता जनीने ऑपरेशन करून घेतलं होतं.त्याला आता तीन महिने उलटून गेले.झिप्री तीन महिन्यांची आणि तिच्यावरचा शिन्या दीड वर्षाचा.

बबन्याचा आणि जनीचा संसार शहरातल्या माणसासारखा असा चौकोनी होता. पण हा चौकोन त्यांनी जाणीवपूर्वक आखलेला नव्हता. तीही देवाची करणीच म्हणायची. कारण त्यांची पहिली तीन पिल्लं साथीतल्या उंदरांसारखी पटापटा मेलेली होती.चौथ्या खेपेचा शिन्या होईपर्यंत भरल्या अंगाच्या जनीचा सगळा चोथाच होऊन गेला होता.तरीही शिन्याला पाठीशी बांधून जनी बबन्या बरोबर शेतावर मजुरीला जायची. उन्हांतान्हांत राबायची.एक वेळेला का होईना, दोघाना भाकरतुकडा मिळायचा.

शिन्यासाठी छातीला दोन थेंब दूध तरी यायचं. पण झिप्री झाली आणि  जनीचं कंबरडंच मोडलं.

तिची छाती कोरडी पडली.

दिवसभर आळीपाळीनं तिच्या छातीला झोंबणारी शिन्या आणि झीप्री, तोंड ओलं होईना, तशी पेकाट मोडल्यासारखी केकाटू लागायची.तिकडे सरपंचाला ऑपरेशनची एखादी केस हवी होती आणि इकडे या दोघांना पैसा.तीनशे रुपयांची  हाव धरून उपासमारीची झीट आलेली जनी अखेर ऑपरेशनला तयार झाली.

ऑपरेशन झालं, पण यांच्यापर्यंत येऊन पोहोचले फक्त शंभर रुपयेच!त्या शंभरचंही त्यांना खूप अप्रुप वाटलं होतं. पण ऑपरेशननंतर जनीनं अंथरूण धरलं ते अद्याप पुरतं सुटलं नव्हतं.

पैसे आले आणि गेले.घरात खायप्यायची आबाळ पांचवीला पुजल्यासारखी पुन्हा सुरू झाली. पण आता फाटक्या पदरांत दुधाच्या तोंडाची दोन कच्चीबच्ची होती. त्यांना सोडून आणि मोडकी कंबर घेऊन जनीला शेतावर राबणं झेपेना.अखेर त्यांना देवासारखी सरपंचाची आठवण झाली.बबन्यानं त्याचे पाय धरले. मदतीची याचना केली सरपंचाने,’तू  ऑपरेशन करून घेतोस का’ म्हणून विचारलं. नियमाप्रमाणे म्हटलं तर जनीचं

ऑपरेशन झालेलं असल्यामुळे बबन्याला ऑपरेशनचे पैसे मिळू शकणार नव्हते.पण  सरपंच ‘त्येचं मी बघतो’. म्हणाला.नाव बदलून दाखवायचं ठरलं. डॉक्टर सरपंचाच्या खिशातलाच होता. त्यालाही ऑपरेशनची एखादी केस हवीच होती.

बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून

जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता.त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!

क्रमशः —————-

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments