कविराज विजय यशवंत सातपुते

माझ्या गावी भेट दिलीच पाहिजे कारण….

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  का  मराठी आलेख  “माझ्या गावी भेट दिलीच पाहिजे कारण….” अत्यंत हृदयस्पर्शी  है।  श्री विजय जी को जितना प्रेम अपने साहित्य से है उनके गाँव से उनका प्रेम उनके साहित्य से किसी भी दृष्टि से कम नहीं है। उनके गाँव से जुड़ी स्मृतियों से सजी इतनी भावप्रवण रचना के लिए उनकी लेखनी को नमन।)

गाव बदललं, गावातली माणसं बदलली, पण मनातल गाव, गावातलं घर, ते मात्र जसंच्या तसं राहिलं. आठवण झाली  . . . कुठं काहीही कार्यक्रम नसताना, कविसंमेलनाच कारण सांगून घराबाहेर पडलो, नीट तडक गावची एसटी धरली.

जवळ जवळ दहा वर्षांनंतर गावी येत होतो. गावच्या घरापर्यंत  आता टमटम जात होत्या. मला गाव पहायचा होता. गावातले बदल जवळून पहायचे होते. तेली आळीतला लाकडी घाणा. वेशीवरचा मारूती, शाळेजवळचा पिंपळाचा पार, दत्त मंदिर, राम मंदिर, बाजारपेठ, लालू शेठची पतपढी,कासार आउट, मोमीन  आउट, पोस्ट ऑफीस, ग्रामपंचायत कार्यालय, सार सार नजरेखालून घालायचं होत. गावात उतरलो अन् टवाळ पोरागत भिरभिरत्या नजरेने गाव बघू लागलो.

माणस भेटत होती. ओळखीचं हसत होती. जुजबी चौकश्या करीत  आपापल्या कामाला लागत होती. पारावरचे म्हातारेही हातची तंबाखू,  अन तोंडचा विषय सोडायला तयार नव्हते. .

”एकलाच आलासा जणू? पोराबाळांना तरी  आणायचं,  आरं, आंबे, फणसाचा सिझन हाय. . . गावचा रानमेवा तुमची पोरं खाणार कवा ?घेऊन यायचं त्यानला बी , म्होरल्या बारीला ध्यानी ठेव बर. ” असा जिव्हाळ्याचा संवाद करीत,गावच्या मातीचा सुगंध मनात भरून घेत गावच्या घरात शिरलो.

गावाकडं एक बरं असत. . .  अचानक जाऊन भेटण्याची मजा काही औरच  असते. थोडी गडबड, धावपळ, धांदल  उडते. काहिंची थोडक्यात चुकामूक होते, त्यांना भेटण्या साठी मुक्काम वाढवण्याचा  आग्रह होतो. मी ही मुक्काम वाढवला. कार्यक्रम  उशीरा संपणार असल्याची  आणखी  एक लोणकढी थाप पचवली.अन गावी जाण अपरिहार्य  असल्याचं पटवून दिलं.अन् गावच्या माणसात हरवून गेलो. मनातल्या गावातनं ,प्रत्यक्ष वास्तवात जाताना थोड  अवघड जातं. पण जुन्या आठवणी न भेटलेल्या माणसांची  आठवण भरून काढतात.

माझ्या गावाने. नुकतेच तंटामुक्त गाव म्हणून नावलौकिक प्राप्त केला होता. दारू नको दूध प्या सारखे  उपक्रम गावातली युवक मंडळी पुढाकार घेऊन राबवीत होती. गावात पिढ्यान पिढ्या पैलवानकी करणार्‍या कुटुंबातील नवयुवक सैन्य दलात भरती झाल्याचे कळले. अभिमानाने  उर भरुन  आला. सामुदायिक विवाह, प्रोढ शिक्षण,  बचत गट, बालवाडी, अंगणवाडी अशा उपक्रमातून गावातील महिला मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

अरू काकाचा मतीमंद पोरगा, गावातल्या वातावरणात स्थिरावला होता. कोंबड्या पाळायचा,चार म्हशी, दोन दुभत्या गायी, चरायला न्यायचा. त्यांची देखभाल करायचा. धारा काढायचा. चार घरी दूध पोचवायचा. गतीमंद होता पण मतीमंद नव्हता. निसर्गाच्या सानिध्यात, मनसोक्त जगायचा. वेड वाकड का होईना, पोरगं नजरेसमोर हसतयं यात  आई बापाला समाधान वाटत होत.

गावातल्या घरान गावकी, भावकी जीवापाड जपली होती. वाटण्या झाल्या होत्या. वेळप्रसंगी  मन दुखावली तरी  माणस दुरावली नव्हती. माझ जाण नसल तरी भाऊ , पत्नी,  आई , वहिनी, काका, काकी, आज्जी, यांनी घरोबा जपला होता. वाडवडिलांनी राखलेली वाडी,  फुलवलेलं परसदार, आजही  सणावाराला वानवळ्याच्या रूपात भरभरून प्रतिसाद देत होतं.

भावकीतले चार हात शेतीत, फुलमळ्यात,फळबागेत, परसात, राबायचे, त्यांच्या कष्टान काळ्या मातीचं सोनं व्हायचं. ज्या मातीत लहानपणी खेळत लहानाचे मोठे झालो ती माती राबणारा हातांना भरभरून यश देत होती. माझं गावाकडं प्रत्यक्ष येणं नसलं तरी गावची भावकी संपर्कात होती. घरातले कुणी ना कुणी तरी गावाकडे फेरफटका टाकायचे. त्यामुळे ख्याली खुशाली कळायची. पण रानवारा प्रत्यक्ष श्वासात भरून घेण्याचा  आनंद काही औरच  असतो. त्याचा आनंद मी घेत होतो.  जमेल तितके गाव नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो.

शहरातील बरीचशी खरेदी माझ्याच सल्ल्याने व्हायची. कथा, कविता, जशी माणसाला जगायला शिकवते ना तसा हा निसर्ग, गावच घर जोडून ठेवण्यात यशस्वी ठरला होता. कुणी फुले, फळे, दूध, दही, ताक, लोणी, तूप, खवा, खरवस,  अंडी ,नारळ ,सुपार्माया मागायला यायचं. बाहेर पेक्षा निम्मा किमतीन परसबागेत फुलवलेलं विकलं जायचं. धार्मिक कार्यात तर सढळ हाताने हा दानधर्म व्हायचा.

साहित्यिक जसा साहित्यात रमतो ना, तसं गावच घर या निसर्गरम्य परिसरात व्यस्त झालं होत. लेखकाने कागदावर लेखणी टेकवावी अन  (मोबाईलची बटणे दाबावीत..) अन प्रतिभा शक्तीने भरभरून दान पदरात घालाव तशी गावच्या घरी चारदोन जण मशागत करायची. घरातली जुनी जाणती परसबाग फुलवायची. कुणाला रोजगार मिळाला होता. कुणाला आधार मिळाला होता. गावचा निसर्ग माझ्या आठवणींशी स्पर्धा करीत मला  एकट पाडीत होता. निसर्ग त्याच काम चोख करीत होता.  करवंद , आंबा, काजू, फणस, केळी, पेरू, नारळ, पोफळी यांची वर्णन मी जितक्या उत्स्फूर्ततेने करायचो, तितक्याच  उत्कटतेने निसर्ग त्या त्या ऋतूत भरभरून फुलायचा.

दोन दिवसांनी जेव्हा भरभरून रानमेवा घेऊन घराकडे निघालो ना, तेव्हा त्या जडावलेल्या पिशव्यां सारखंच मनही भरून  आलेलं. दहा वर्षानंतर अचानक मला पाहिल्यावर आजीच डोळही असंच भरलेलं. निसर्गाच हे देणं, मांगल्याचं समृद्धीचं लेण अजमावून घेण्यासाठी मी ठरवल.  माझ गाव जमेल तस विकसित होत होत. गाव त्याच्या परीने गावातील माणसांना  आपलेपणाने बांधून ठेवत होत.  गावातून शिक्षणासाठी बाहेर पडलेला मी…. माझ्या कडे गाव मोठ्या  आशेने बघते आहे. मायेने साद घालते आहे  असा भास सारखा होत होता.  पाय जडावले होते.

 

आता जास्तीत जास्त वेळा, वेळ काढून गावाकडे यायचंच. माझ्या या गावी भेट दिलीच पाहिजे. . जमेल तेव्हा जमेल तसा वेळ काढलाच पाहिजे. माझ नाव मोठ करताना गावाच नाव देखील मोठ झाल पाहिजे माझा विचार सर्वांना बोलून दाखवला तोच दारातली बकुळीची फुलं अंगावर पडली… परतीचा  अहेर द्यावा  असं सुगंधी लेणं लेवून मी सर्वांचा नाही निरोप घेतला.

अचानक पणे गावात जाण्याचा योग मनात गावासाठी काहीतरी करायला हवे हा विचार मनात दृढ करीत गेला. त्याकरिता काय काय करता येईल याचा विचार करीत शहरातील घरी परत आलो.  परतीचा प्रवास करताना हाच दरवळ मनात ठेवून गावच घर,  आणि बाजूचा निसर्ग यांचे  आभार मानत शहरातल्या प्रापंचिक घरात प्रवेश केला. निसर्गाच हे अविरत देणं मनात साठवीत…. प्रसन्न मनाने माझ्या दुनियेत परतलो. काही जिवंत अनुभूती सोबत घेऊन. . . . !  माझ्या गावात पुन्हा पुन्हा यायला हवं.

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments