? विविधा ?

 ☆ चिमणरावांचे लसीकरण ! ☆ श्री अभय नरहर जोशी ☆ 

पुणेरी मिसळ

चिमणरावांचे लसीकरण !

आदर्श मंडळी, आज लसीकरणाचा ढोस डागून घेतला. चि. मोरूच्या खटपटीने मज एकट्याला स्लॉट मिळाला. सकाळपासून अंमळ तयारी सुरू केली. सौ. काऊने सुगंधित तेलाने मालिश केले. चि. मैनेने उटणे लावले. मोरूने बळेबळे कढत पाण्याची दोन घंगाळी दिली. नाईलाजाने दोनदा स्नान करावे लागले. लसीकरण केंद्रात कोट-उपरणे काढावे लागते म्हणून दोनदा धुतलेला नवा गंजिफ्रॉक घातला. आधीचा गंजिफ्रॉक सच्छिद्र झाला होता. खरं तर त्यातून लस देणे सोपे झाले असते. पण काऊ दळभद्री लक्षणं तुमची, म्हणाली. असो. त्यानंतर नवा कोट-उपरणे परिधान केले. त्यावर मोरूने विशिष्ट सुगंधित स्राव फवारला. मी विचारले, हे काय चाललंय? मोरू उत्तरला, ‘फॉग चल रहा है’…असो. जाताना मोरूने डोळे मिचकावत सांगितले, की बाबा सवयीनुसार जेवायला बसण्याआधी जसे बनियन काढता, तशी गरज नाही. बिच्चारी परिचारिका चक्कर येऊन पडेल.  बाबा, तुमच्या बलदंड देहयष्टीपुढे गुंड्याकाकाही आता फिके पडतील.’ (या मोरूस अंमळ शिंगं फुटलीत.) तद्नंतर ड्रायक्लीन्ड पुणेरी पगडी घालून, काठी घेऊन आस्मादिक  निघालो. काऊने दारात चक्क ओवाळले. मैनेने दिलेली मुखपट्टिका परिधान करून अखेरीस निघालो. लसीकरण केंद्रात समस्त वैद्यकीय सेवकवृंद माझी वाट पहात होता. आल्या आल्या एका शुभ्रवस्त्रांकित सभ्य वैद्यकीय अधिकाऱ्याने मला गुलाबपुष्प दिले. नंतर शुभ्रवस्त्रांकित सुकांत (मुखपट्टीधारक) चंद्राननेेने म्हणजे सुंदर परिचारिकेने माझा हात धरून आत नेले. तेथे उपरणे-कोट उतरवून गंजिफ्रॉक माफक प्रमाणात वर केल्यावर त्या परिचारिकेने लस ढोस अलगद डागला. हात एवढा हलका, समजलेही नाही. तसाच तरंगू लागलो,  तरंगत घरी कधी परतलो, स्मरत नाही. काऊ थोड्या वेळाने गदागदा हलवत होती.तेव्हा भानावर येत असताना, तिने विचारले, लस कशी होती? मी ऐकले, नर्स कशी होती? फारच सुंदर होती, तरी मुखपट्टिकेमुळे अर्धीच दिसली, असे उत्तरलो. नंतर काऊने असे काही तरी केले. डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकले. दोन दिवस आजारी होतो, असे नंतर चि. मोरू सांगत होता. असो.

वास्तव

`अहो उठा, उठा…`काऊचा कर्कश आवाज आला. ‘त्या मोऱ्याने मोठ्या खटपटीने स्लॉट मिळवलाय. तर ती कोरोनाची सुई टोचून घ्या… पसरू नका..या आधीही दोन खेटा मारून झाल्यात केंद्रावर…’ खडबडून जागा झालो. मोऱ्या मोबाईलात गुगलात गुंगला होता. त्याला विचारलं, की माझाच आणि आजचाच स्लॉट मिळवलाय ना रे. त्याने मोबाईलवरून नजर न हटवता, नुसती मान डोलावली. नंतर कसबसे अंग विसळले. सच्छिद्र गंजिफ्रॉक देऊ नको, जरा धड गंजिफ्रॉक दे, असे काऊस  म्हणालो. तर म्हणते कशी, गपचूप आहे ते घाला. सच्छिद्र गंजिफ्रॉकमधून लस डागणे सोपे जाईल त्या सटवीला. मी अंमळ चमकलो. ही सटवी कोण, असे विचारता, ती लस टोचणारी नर्स, असे उत्तर मिळाले. खुंटीवरील कोट-उपरणं आण, असे मेैनेस म्हणालो. तिनं फणकाऱ्याने  आणून दिले. पगडी घालण्यास झटकली तसे दोन-चार ढेकणं टपाटप पडली. असो. निघालो, तसा मोरू म्हणाला, ‘बाबा बनियन बेतानेच काढा त्या नर्ससमोर.’ ‘मी अस्वल दिसेल का तिला?’ असं विचारलं. तो म्हणाला, ‘मुंगूस दिसता बाबा तुम्ही…’ निमूट केंद्रावर पोहोचलो. तर सामाजिक-शारीरिक अंतराची ऐशीतैशी करत रांगेत धक्काबुक्की सुरू होती.  कसाबसा आत पोहोचलो, तर ती गर्दीने त्रासलेली अर्धचेहरा वस्त्रांकित परिचारिका खेकसली. कपडे काढा…मी भलता लाजलो. ती म्हणाली, आजोबा लाजताय काय. निर्लज्ज कुठले. घाई घाईत कोट काढताना गंजिफ्रॉकही निघाला. नर्सताई ओरडली, ‘वेंधळे कुठले. दंड पुढे करा.’ तिनं दंडात करकचून लस टोचली. लस डागणे म्हणजे काय, हे  अनुभवले…नंतर मी काठी-कोट-उपरणे-पगडी सावरोनि पुढे पळतोय अन् मागून एक सुंदर परिचारिका ‘गडे लस घ्या ना…’ म्हणून पळत आहे, सभोवती वैद्यकीय पथक टाळ्या वाजवतंय, असे दिसो लागले. ती परिचारिका मला पकडून गदागदा हलवू लागली, भानावर आलो…काऊ मला उठवत होती. ‘अहो उठा. दळभद्री लक्षण मेलं. कुठून यांना लस दिली? दोन दिवस तापाने फणफणले आहात. ‘लस लस अन् नर्स नर्स…’ असे बरळताय. ‘लसलंपट’ म्हणू की ‘नर्सलंपट’ म्हणू तुम्हाला?’ अशा तऱ्हेनं ही कोरोना प्रतिबंधक लस आमच्या अंगी लागू जाहली. असो.

मी कोणती लस घेतली, हे सांगणे खुबीने टाळले, हे चाणाक्षांच्या लक्षात आलेच असेल. गुंड्याभाऊंसाठी हा सस्पेन्स कायम ठेवतोय…

 

श्री अभय जोशी ( विविधा – चिमणराव लसीकरण ) मो. नाम. ९८८११४१२४४.

— पूर्वप्रसिद्धी : दै. लोकमत, पुणे आवृत्ती

 

श्री अभय नरहर जोशी

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments