श्रीमती सुधा भोगले

? विविधा ?

☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-१] ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हरिपूर, हे कृष्णा -वारणा नद्यांच्या काठी वसलेले गाव! सांगलीहून वहात आलेली कृष्णा, हरिपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या, डाव्या अंगाने, शेताच्या पल्याड हरिपूरकडे वहात जाते. या कृष्णाकाठी, सुपीक जमिनीने, समृद्ध झालेला हा परिसर, निर्सगाच्या हिरवाईने नटल्यामुळे, प्रसन्न आणि रम्य भासतो.

१७६८ मध्ये गोविंद हरि पटवर्धन यांनी आपल्या वडिलांचे स्मारकाकरिता सांगलीची सहाशे बिघे जमिन स्वतंत्र काढून हरिपूर हे गाव वसविले. ते गाव शंभर ब्राह्मणांना (अग्नहार) दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे गाव वसविण्यास अनुमती दिली. यानंतर हरिपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार गावाची, त्यावेळी लोकसंख्या दोन हजार होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक हजार होती. त्यावेळी हरिपूर हे सांगलीपेक्षा मोठे होते.

हरिपूरची जमीन ब्राह्मणांना दान दिली होती, त्याबद्दल एक आख्यायिका आहे. ही जमीन दान दिल्यानंतरच्या काळात सांगलीकर राजे हरिपूरच्या वेशीवर पाय धुवत, हेतू असा की, दान दिलेल्या जमिनीतील माती सुध्दा, पावलासंगे परत येऊ नये. हरिपूरच्या संगमेश्वर देवालयातील घंटेवर कोण्या बाबाजी रामचंद्र गुरव याचा नामनिर्देश असून त्यावर शक १६२२ (इ.स.१७००) चा उल्लेख आहे.

हरिपूरच्या शेजारील सांगली त्यापुढील शतकात फारशी वाढलेली नव्हती. १८५० साली हरिपूर हे गाव बुधगावकर पटवर्धनांकडे गेले.  कृष्णा वारणा संगमावर, पुरातनकाळापासून असलेले गमेश्वर हे शिवाचं पवित्र स्थान, हरिपूरचे आराध्य दैवत आहे. प्रभु श्री रामचंद्र दंडकारण्यात जाताना इथे थांबले होते. त्यांनी वाळूचे लिंग स्थापन करून शिवप्रतिष्ठापना पूजे स्तव केली होती अशी कथा आहे.

कालांतराने काही गुराखी गाई चरण्यासाठी घेऊन येत. एक गाय रोज वेगळी चरत थोड्या लांब जाई. हे गुराख्याच्या लक्षात आल्यावर, तो गाईच्या मागे जाऊ लागला, तर ती गाय ठराविक स्थानी जाऊन आपल्या दूधाचा अभिषेक करीत असे. त्याने ही गोष्ट आपल्या राजापर्यंत पोहचवली. मग इथे तपासाअंती उकरून पाहिल्यावर वाळूचे शिवलिंग दृष्टोत्पत्तीस पडले, तेच हे संगमेश्वर देवालयातील स्थापित शिवलिंग होय. पुढे त्याकाळी तेथे देवालय उभं राहिले.

मिरजेला मार्कडेय नावाचा राक्षस होता .तो या लिंगाची भक्ती करीत असे. गुरूचरित्राच्या अध्यायात असं म्हटले आहे, मिरजेच्या मार्कडेय नामे संगमेश्वर पूजावा! संगमेश्वराची मूळ पिंड वालुकामय आहे. आताच्या स्थितीत या वालुकामय पिंडीवर दगडाचे लिंग करून नंतर बसविलेले आहे. यापिंडीवर पाण्याची धार धरली असता,बांबूंच्या कामटीने आतवर किती पाणी गेले हे बघत असत.

अशा या संगमेश्वराच्या पवित्र वाने पुनित झालेले हरिपुर गाव अध्यात्माचे अधिष्टान आहे. याच हरिपूरच्या वेशीतून आत प्रवेश केल्यावर कृष्णाचे मंदीर डाव्याबाजूस आहे. काव्यविहारी वासुदेव गद्रे, बुधगाव सरकारकडे होते. अक्काताई भट यांनी या कृष्ण देवालयाची स्थापना केली. पुढे ते गद्रे कुटुंबीयांचे मंदीर म्हणून नावारूपाला आले. इथे कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सव श्रावणात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भजन, किर्तन, गायन ह्यांची सातदिवस उपासना व भक्ती केली जाते. अष्टमीदिवशी रात्री  जन्मकाळाचे किर्तन होते. पारण्याचा नैवेद्य महाप्रसाद असतो. वर्षभर ह्या मंदिरात बरेच उपक्रम भक्ती व उपासना यावर आधारलेले चालतात. ग्रंथ वाचन पारायणे होतात. असे अध्यात्म्याचे अधिष्टान आणि परंपरा पुढील पिढीनेही अंगिकारलेली आहे.

संगमेश्वराचे मंदीराबाहेर, विष्णूमंदीर आहे. पुढे आल्यावर पंचायतन मंदीर आहे. तसेच वेशीच्या अलिकडे श्रीराममंदीर, विठ्ठलमंदीर आहे. हरिपूरच्या प्रवेशीचे बाहेरील बाजूस श्री हनुमान मंदीर आहे.

बागेतील गणपती हे गानकोकिळा लताबाई मंगेशकरांचे श्रध्दास्थान आहे. त्या सांगलीत आल्यावर इथे दर्शनास येतात. या देवालयाच्या स्थापनेची आख्यायिका अशी की, सांगलीच्या संस्थापिकाचे मूळ पटवर्धन घराणे कोकणातील कोतवड्याचे, जिथे दुर्वाचा रस प्राशन करून त्यांच्या पूर्वजातील कोणा एकाने उपासना केली. त्यांना दृष्टांत झाला. ‘तू चालत राहा, मागे वळून पहायचे नाही. तोवर मी तुझ्याबरोबरच असेन. मागे वळून पाहिलेस तर तेथेच माझी स्थापना कर!’ त्याप्रमाणे इथंवर आल्यावर मागे वळून पहाता देवाने इथे स्थापना कर असे सांगितल्याप्रमाणे नदीकाठी देव स्थापित झाला. सन १७६५ चे फाल्गून प्रतिपदा ते पंचमी या दिवसात प्रतिष्ठापना झाली असे ऐकिवात आहे.

या भक्तांची अखंड मांदियाळी आहे.संकष्टीस देवदर्शनास व रोजचेही दर्शन घेणारे भक्त आहेत. माघातील गणेश जन्म असतो. जन्मकाळ, महाप्रसाद सर्वच मोठ्या प्रमाणावर नवसाला पावणारा असा हा गणपती आहे.

श्रावण सोमवारची संगमेश्वराची जत्रा फार पुरातन काळापासून असते. माझ्या सासुबाई त्यांचे लहानपणी आणा, दोन आणे घेऊन चालत इथल्या जत्रेला जात असत. (साल साधारण १९२० ते १९२५ चे सुमारास) अशी आठवण आम्हाला सांगत असत. अजूनही इथली जत्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होते. असंख्य भक्तगणांची पहाटे पासून रीघ लागलेली असते ती रात्री पर्यंत ! बाहेरील आवारात जत्रेत असतात तशी खेळणी, पुंग्या, कलाकुसरीची चित्रे आदींचे विक्रेते असतात. घाटाच्या बाजूस चक्र, मुलांसाठी चे करमणुकीची खेळणी यांची रेलचेल असते. अशी श्रावणातले सर्व सोमवारी जत्रा असते.

इथे घरोघर कार्तिक व्दादशीला तुळशीचं लग्न दारात रांगोळी, ऊसाचा मंडप घालून केले जाते. आपण त्यासुमारास फेरफटका मारला तर हे सुंदर दृश्य गावातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या दारात शोभिवंत असं दिसून येते. शहरात अशी अंगणे पहायला मिळत नाहीत त्यामुळे इथे सर्व पहाण्यासारखेच असते. ही परंपरा खरोखरच सामान्य माणसांनी जपली आहे.

(क्रमशः)

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments