(सारा व तिची ताई)

☆विविधा ? साराची भूतदया ? श्री गौतम कांबळे ☆

एक पाच वर्षाची खूप प्रेमळ गोंडस मुलगी. तिचं बोलणं ऐकत राहावं असं. कल्याणमधील खडकपाडा येथे वसंत व्हिला रस्त्यावर वृंदावन पॅराडाइज या आलिशान वस्तीत राहते. तिच्यासाठी आणलेला खाऊ; मग ते साधे चॅाकलेट असूदे, प्रत्येकाला हवं का? म्हणून विचारल्याशिवाय खात नाही. गंमत म्हणून कुणी हवं म्हणालं तर त्याला देण्यात तिला आनंदच वाटतो.

खेळत असतानाही तिचं सगळीकडं बारीक लक्ष असतं. घरात आजी, आजोबा, आई वडील व मोठी बहीण सुहानी असं छोटं कुटुंब. सारा आजोबाना आप्पा म्हणते. एका अपघातात आप्पांच्या लहान मेंदूला इजा झालेली. त्यामुळे त्यांचा शरीरावर ताबा राहत नाही. आधाराशिवाय उठले तर तोल जाऊन पडण्याचा धोका असतो.  चुकून आप्पा उठलेच तर सगळ्यात अगोदर लक्ष असतं ते साराचंच. मग काय, आप्पा उठले, आप्पा उठले असा दंगा करून सगळ्याना सावध करते.

वृंदावन पॅराडाइजमध्ये तीन विंग्ज आहेत. मध्ये मोठे ग्राउंड आहे. बाजूला क्लब हाऊस व छोटासा स्विमिंग टॅंक आहे. त्या ठिकाणी एखादा छोटा कार्यक्रम असला की समोरच्या ग्राउंडवर मंडप घालून केला जातो. असाच एक कार्यक्रम होता. मंडपवाले मंडप घालण्यात व्यस्त होते. सारा, सुहानी आणि त्यांचे दोन मित्र तेथे खेळत होते.

त्याच इमारतीवर जिथं जागा मिळेल तिथं काही कबुतरेही आहेत. त्यातील एक कबुतर मंडपाच्या आधारासाठी लावलेल्या बा़ंबूवर येऊन बसले. आजारी असल्यासारखे दिसत होते. थकलेलं वाटत होतं. खेळत असलेल्या साराचं लक्ष त्याच्याकडं गेलं.

तिथंच साराच्या वडीलांचे मामा व आणखी दोघे खुर्च्या टाकून बसले होते. सारानंच आणून दिलेले पाणी पीत होते.

“मामा, त्या कबुतरालाही तहान लागलीय. त्याला पाणी हवंय.” कबुतराला पाहून सारा म्हणाली.

“मग दे ना आणून.” असं मामा म्हणाले आणि सगळ्यानी हसण्यावारी नेलं.

साराही खेळण्यात दंग झाली असं सर्वांना वाटलं. पण तीचं लक्ष त्या कबुतराकडं होतं.

अचानक सारा “ओ सिक्युरिटी काका, ओ सिक्यूरिटी काका इकडे या” अशा हाका मारू लागली. तिला कुणी काहीतरी काम सांगीतलं असेल असं वाटून बसलेल्यानी ऐकून सोडून दिलं. सारा स्विमिंग टॅंक कडं गेली. सिक्युरिटी काका पण गेटवरून हलले नाही.

पुन्हा तशीच हाका मारत सारा आली. आता मात्र ती चिडलेली दिसत होती.

“सिक्यूरिटी काका लवकर या ना. तुम्ही काय कबुतराला मरून देणार आहात काय?” असं सारा वैतागून म्हणताच सिक्यूरिटी काका धावत गेले तर त्याना ते कबुतर स्विमिंग टॅंकमध्ये पडलेले दिसले. कोरोनामुळे कोणी पोहत नसल्याने त्यात पाणी थोडे कमी होते. तहानेनं व्याकुळ झालेल्या त्या जीवाने पाण्यासाठी टॅंकमध्ये झेप घेतली होती पण बाहेर यायला त्याला किनारा सापडत नव्हता. आणि त्याला पायऱ्याही नव्हत्या.

सिक्यूरिटी काकानी कचरा काढण्याच्या जाळीने कबुतराला अलगद बाहेर काढले आणि साराच्या चेहऱ्यावर हसू खुलले. एका पक्ष्याचा जीव वाचवल्याचे समाधान तिच्या डोळ्यात दिसत होतं.

©  श्री गौतम कांबळे

सांगली

९४२१२२२८३४

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments