सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

दोन्ही आजी आजोबांनी नातीचं बारसे दणक्यात केलं. ‘प्रतिक्षा’ नाव ठेवलं. आणि नातवाची प्रतिक्षा करत प्रतिक्षाचे लाड करत होते. तिचे दर महिन्याच्या महिन्याला वाढदिवस काय? प्रत्येक वाढदिवसाला नवनवीन केकचे प्रकार काय? नुसती चढाओढच. फ्राॅक काय, परकर पोलका काय? आपली हौस पुरवू लागल्या. तिचे बोरन्हाण, उष्टावन सगळंच थाटात. आता प्रतिक्षा वर्षाची झाली. तिचा वाढदिवस. हॉल बुक केला. केकची, वाडीची ऑर्डर दिली. आमंत्रण केली. आणिअचानक माझ्या पतीदेवांना दोन दिवसासाठी दिल्लीला अर्जंट कामासाठी जायचं म्हणून कंपनीने सांगितले. पुढे वाढदिवस करुन मग गेलं तर चालणार नाही का? म्हणून विचाराल  तर तो म्हणतो कसा, “सगळी तयारी तर झाली आहे. हॉल, केक, तिचा ड्रेस, वाडीची ऑर्डर, कॅटरिंग, फोटोग्राफर, आमंत्रण सगळे सगळे रेडी आहे. दोन दिवसाचा तर प्रश्न आहे. असा गेलो आणि असा आलो. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी हजर.”

हजर राहीन असं म्हणाला खरं पण त्याच्या ऐवजी त्याच्याबद्दलची बातमीच सकाळी घरी हजर झाली. त्याच्या गाडीला  दिल्ली मध्ये  अपघात झाला. ‘And he is no more’ असं कानावर शब्द आदळले. पायाखालची जमीनच सरकली. माझ्यावर  दुःखाचा पहाड कोसळला. सगळे नातेवाईक आले. भेटले गेले. ज्याला त्याला आपापले व्यवहार कामधंदा होताच की त्याना पण. शेवटी मलाच ताठ उभं रहावं लागलं. पदरी एक वर्षाची प्रतिक्षा, वयस्कर सासू सासरे  त्यांचा एकुलता एक जिवापलिकडे जपलेला मुलगा दोन दिवसात येतो म्हणून सांगून गेला तो कायमचाच. त्यांना सांभाळू की आपल्या एकुलत्या एका मुलीवर इतक्या लहान वयांत वैधव्य ओढवले म्हणून दुःख करणा-या माझ्या वयस्कर आईबापाची समजूत काढू. प्रतिक्षाचे भवितव्य आठवून तर डोके फुटायची वेळ आली. दुःख गोंजारणं तर सोडा पण विचार करून मन मोकळे करायला पण भक्कम आधारच नव्हता. जो एक होता तोच नेमका पूर्ण कळायच्याओळखायच्या आतच देवाने हिसकावून घेतला. परत  मी एकटी पडली. एकदम एकटी.

पण काळ आणि परिस्थिती हेच औषध असतं. सगळं दुःख बाजूला सारुन एका अर्भकाचा आणि चार वयस्करांचा विचार करुन उभी राहिले. नोकरीची गरज नव्हती म्हणून प्रतिक्षा झाल्यावर नोकरी सोडली होती. पण मन कशांत तरी  गुंतवायचे म्हणून घराजवळ एका कंपनीत अकाउंटस क्लार्कची पार्टटाईम नोकरी मिळाली. घर सांभाळून मी नोकरी करु शकत होते. प्रतिक्षाला बघायला दोन आज्या, दोन आजोबा होतेच. कारण माझे आईबाबा पण आता आमची बिल्डींग नंतर दोन बिल्डींग सोडून तिकडेच सहा महिन्यापूर्वी रहायला आले होते.

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares
4.5 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments