☆ जीवनरंग ☆ लघु कथा – मरवा … ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆

घरात ते दोघेच … आजी आणि आजोबा. बाल्कनीत गुलाब,मोगरा, अनंत ह्या बरोबरच तुळस आणि मरवा. अजून पर्यंत तरी ह्या बागेचे नुसतंच बाहेरून दर्शन. आजी – आजोबांची नुसती नजर ओळख… ती सुद्धा बाल्कनीत बसून चहा घेताना. हळूहळू जाता येता हात उंचावून चौकशी, मग बोलणं सुरु झालं. ओळख वाढली. एके दिवशी ऑफिस मधून घरी येता येता आजींनी घरात बोलावलं. बाल्कनीत बसून चहापान झालं.मंजिरींनी लगडलेल्या तुळशीच्या बाजूलाच असलेल्या कुंडीत हिरवा गार मरवा होता. मंद असा घमघमाट बाल्कनीत पसरला होता. आजोबा बोलते झाले … “ह्या मरव्याचं कसं असतं माहीत आहे कां?” माझी प्रश्नार्थक नजर बघून आजोबा हसले. म्हणाले, “ऐक…  हा मरवा ना… नुसतं नावालाच  झाड. ना फळं, ना फुलं. पण मंद का होईना सुगंध अप्रतिम.आपल्याकडे काहीही नसताना आपल्या अस्तित्वाने मात्र दुसऱ्यांना प्रसन्न करण्यात आपलं जगणं घालवणार.” हे सांगताना मात्र आजोबा एकदम खिन्न झाले…

घरा बाहेर पडत असताना माझी नजर एका फोटो कडे गेली.अपघातात गेलेल्या त्यांच्या मुलाचा फोटो होता. मी सुन्न. संसारवेलीवरचं उमललेलं फूल गळून पडलं होतं. मी घरातून बाहेर पडलो. डोक्यात विचार घेऊन…. आज काय होतं त्या वृद्ध दांपत्याकडे ..? मनाचं पंगुत्व? परावलंबित्व? की दैवाने दिलेली हतबलता? नाही.नक्कीच नाही. नशिबाचे फासे उलट पडलेले असताना समोरचा क्षण आपला मानून तो इतरांबरोबर साजरा करायचा आणि  आपल्या स्वभावातल्या गोड सुगंधाने दुसऱ्यांना प्रेमळ पणे आपलंस करायचं. त्या कुंडीतल्या मरव्या सारखं. माझ्या घरात शिरताना सहज मागे वळून बघितलं…

कुंडीतला तो मरवा अजूनच हिरवाकंच दिसत होता. त्याचा तो मंद सुगंध त्या  घरासोबत माझ्याही मनात दरवळत होता… माझ्या घरात शिरू पहात होता.

 

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments