☆ विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

आविष्कार एका सृजनाचा

छान किती दिसते फुलपाखरू

मी धरु जाता येई न आता…. फुलपाखराचं असं यथार्थ वर्णन एका कवितेत केलेलं आहे. रंगीत फुलपाखरांची दुनिया मोठी अजब असते. काही दिवसांचे छोटेसे आयुष्य असणारी फुलपाखरं जन्म घेतात ती एकदम मोठी होऊनच! इतर प्राण्यांसारखा ‘बालपण’ हा टप्पाच नसतो त्यांच्या आयुष्यात; आणि या कीटकवर्गी जीवाचा जन्म सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होतो. अंडी-अंड्यातून अळी-अळीचा कोष आणि कोषातून फुलपाखरू असा तो प्रवास! मागे एकदा एका फुलपाखरू उद्यानात फुलपाखराच्या या जीवनावस्था जवळून प्रत्यक्ष पाहता आल्या होत्या. झाडांची कुरतडलेली, अर्धवट खाल्लेली पानं ही बरेचदा फुलपाखराच्या अळीचा प्रताप असतो हेही तेव्हा कळलं होतं. तेव्हापासून अशी पानं पाहिली की ही कोणत्या बरं फुलपाखराच्या अळीने खाल्ली असतील या विचाराने कुतूहल जागृत होऊ लागले..  भविष्यात एका सुंदर फुलपाखराला जन्म देण्यासाठी झाडाची पानं विद्रूप करणाऱ्या अळीला पानावरून झटकून टाकण्याची भावना नाहीशी झाली.. असो..

गवतावर बागडणारी पिवळी फुलपाखरे प्रत्येकाने पाहिली असतील. ‘ग्रास यलो’ फुलपाखरे म्हणतात त्यांना. यातही बरेच प्रकार आहेत. याच प्रकारच्या एका फुलपाखराच्या जन्माची ही गोड कहाणी….

माझ्या घरातल्या कुंडीतील शिरीषाच्या रोपावर एक दिवस तीन चार हिरव्यागार उदबत्तीच्या पातळ काडी सारख्या जेमतेम एक सेंटीमीटर लांबीच्या अळ्या दिसल्या. जेमतेम अर्धा फूट उंचीचे ते रोप आणि त्याला चार-पाच चिंचेच्या पानासारखी संयुक्त पानं, छोटी छोट पर्णदलं असणारी.. या एवढ्याच विश्वात या अळ्या दोन-चार दिवस मनसोक्त हुंदडत होत्या; बाजूच्या इतर झाडांकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या. त्या इटुकल्या झाडाच्या पानांचा फडशा पाडत होत्या आणि दिवसागणिक लठ्ठ होत होत्या. ‘खादाड’ हाच शब्द अगदी बरोबर लागू पडतो त्यांना. मी वाट बघत होते आता पुढे काय होणार? ही अळी कोष कुठे बनवणार? रोज सकाळी उठल्यावर आधी झाडाचे निरीक्षण करत होते. एके दिवशी पाहिलं तर एकही अळी दिसेना! म्हटलं कोष बनवायला दुसरीकडे गेल्या की काय? म्हणून आजूबाजूची झाडं न्याहाळू लागले पण काsही दिसेना.. मग पुन्हा शिरीषाच्या रोपाचंच पान अन् पान बारकाईने पाहू लागले; आणि काय? अगदी पानासारखे दिसणारे, पानाच्या आकाराचे दोन हिरवे कोश मला दिसले आणि एका हिरव्या देठाला बिलगून असलेली एक लठ्ठ अळी, हालचाल न करता अगदी निपचीत पडून असलेली; पटकन दिसणारच नाही अशी! तिच्याकडे पहात मी तशीच उभी राहिले अन् तेवढ्यात अळीची जोरदार हालचाल सुरू झाली!! अळीच्या  शरीराचे एक टोक देठाला चिकटून राहिले आणि दुसरे टोक  अधांतरी लोंबकळत; त्यातून भराभर स्त्राव पाझरू लागला आणि त्यात अळी गुरफटली जाऊ लागली. वीस-पंचवीस सेकंदांचा खेळ!! अळी ‘अळी’ राहिलीच नाही, त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा त्रिकोणी आकार दिसू लागला. त्रिकोणाचे अधांतरी टोक तेवढ्यात वर देठाकडे सरसावले आणि पुन्हा खाली आले. पाहते तर काय? एका बारीक धाग्याने आता ते टोकही देठाला जोडले गेले होते! विस्फारलेल्या नजरेने मी हा सगळा प्रकार पाहत होते. अगदी अद्भुत!!! हुबेहूब पानासारखा दिसणारा तिसरा कोष आता त्या इवल्याशा रोपावर लटकत होता; खादाड अळी कोषात बंदिस्त झाली होती….

आता रोज मी त्या कोषाचे निरीक्षण करू लागले. चार दिवस उलटले. प्रत्येक दिवसागणिक कोषाचा रंग पालटताना दिसत होता. हिरवा कोष सुरुवातीला पिवळसर होत गडद पिवळा झाला. आणखी एक-दोन दिवसांनी त्या पिवळ्या कोषात काळी कडा उमटलेली दिसली. मी निरखून पाहत होते काही हालचाल दिसते का ते आणि माझे अहोभाग्य की निसर्गाच्या सृजनाचा एक मनमोहक आविष्कार माझ्या डोळ्यासमोर साजरा झाला. एका क्षणात या कोषाच्या, धाग्याने जोडलेल्या टोकातून पिवळी पिवळी लड खाली घरंगळली. रेशमी कापडासारख्या त्या पिवळ्या गुंडाळीतून ताबडतोब दोन काळ्या अँटिना(स्पृशा) उंचावल्या आणि आणि दोन इवल्या पायांची पकड कोषावर घट्ट बसली. पिवळा अपारदर्शी कोष आता रिकामा होऊन पारदर्शक झाला. पिवळी गुंडाळी आता हळूहळू मोकळी होऊ लागली आणि काही सेकंदात काळ्या किनारीचे ठिपकेदार पिवळे पंख पसरले गेले. आपल्या पायांच्या तीन जोड्यांच्या आधाराने कोषाला बिलगलेले, पूर्ण वाढ झालेले ग्रास यलो फुलपाखरू या जगात अवतरले होते.

अर्ध्या-एक मिनिटात घडलेले हे अद्भुत पाहून मी आनंदाने ओरडायचीच बाकी होते. एक बाय अर्धा सेंटीमीटर आकाराच्या कोषातून चांगले तीन सेंटीमीटर लांब पंख असलेले फुलपाखरू बाहेर आले होते. जवळ जवळ तासभर ते तसेच रिकाम्या कोषात पाय रोवून होते; अधून-मधून पंखांची उघडझाप करत होते. एका क्षणी ते झटकन कोष सोडून उडून गेले आणि दूर पसार झाले…

दिवाळीच्या मुहूर्तावर अशाप्रकारे दोन सुंदर जीवांचा आमच्या घरी जन्म झाला होता, दिवाळीचा आनंद त्यांनी दशगुणित केला होता.

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
विद्याधर शंकर काठे

सृजनशील तत्व अतिशय उत्तमरीत्या व्यक्त झालं आहे.
आविष्कार एका भव्य सृजनाचा
एका साहित्यिक तरल मनाचा
आनंद अपार हा निर्मितीचा
कोषातुंन उलगडले मन पाखरु
छान किती दिसते फुलपाखरू
दोंन सुंदर जीवांची गद्य हे रमले
नाव तीचे स्नेहा विनायक दामले
???