☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -3 ☆ सौ. अंजली गोखले ☆

आपल्याला वाटेल लहान जीवांना कसला आलाय कठीण प्रसंग?लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं.  आई बाबा, आजी आजोबा यांच्या प्रेमाच्या  मऊ उबे मध्ये वाढत असताना त्यांना कशाचा होणार त्रास?पण आलीकडे ही प्रेमाची मऊ दुलई फार लवकर काढली जाते आणि पाळणाघर नावाच्या वेगळ्याच शिस्तीच्या धगे ला त्यांना सामोरे जावे लागते, इच्छा असो वा नसो, ही परिस्थिती ते वाढणारे मूल बदलू शकत नाही. त्या नवीन वातावरणामध्ये ते रमले तर ठीक, नाहीतर अशाही फुलपाखराचे सुरवंट व्हायला वेळ लागत नाही.

तीच परिस्थिती शालेय जीवनामध्ये.  खरेतर लहान मुलांना शिकायला खूपच आवडते.  त्यांची इवलीशी नजर बघा, नव्याचा शोध घेत असते. एखादी गोष्ट त्यांना आवडली की त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला ती चमक दिसते. त्यांचा मेंदू विलक्षण तजेलदार असतो.  स्पंज जशा पाणी शोषून घेतो, तसा त्यांचा मेंदू नवनवीन गोष्टी स्वीकारायला आसुसलेला असतो. अशावेळी या मेंदूला योग्य ते खाद्य मिळाले तर ठीक. पण जर का कु संगत लाभली तर आयुष्याचा सुरवंट झालाच म्हणून समजा. अशावेळी त्याला त्यामधून बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची, आजूबाजूच्या लोकांची आणि त्याच्या शिक्षकांची असते.

शाळेच्या इयत्ता जसजशा वाढत जातात, तस-तशी त्यांची निरीक्षणशक्ती वाढते. त्या निरीक्षणाचे अनुकरण करण्याचे ते निरागस वय. घरी घरी आई बाबा जसे वागतात, बोलतात, ते ही मुले बरोबर टिपतात आणि त्याप्रमाणे त्यांचे वागणे असते.  एखादेवेळी आईने एखादा खोटा शब्द बोललेला त्यांच्या लक्षात आले, तर ते नेमकेपणाने लक्षात ठेवतात. आणि आपल्या सोयीसाठी खोटे कसे बोलावे, वागावे हे हेरतात आणि मोठ्यांच्या नकळत त्यांच्या गाडीचा ट्रॅक बदलत जातो.  हे असे न होण्यासाठी योग्य आणि सचोटीने वागण्याची जबाबदारी असते, ती घरातील आजूबाजूच्या वयाने मोठे असलेल्या थोरांची !

उमलत्या वयातील मुला-मुलींची आयुष्याकडे बघण्याची उत्सुकता पराकोटीची वाढलेली असते.  आत्तापर्यंतचा मित्र किंवा काल पर्यंत ची मैत्रीण यांच्या वागण्या-बोलण्यात झाले ला बदलत्यांना फार लवकर समजतो.  पण कारण समजत नाही.  मैत्री तर हवीहवीशी असते, पण अचानक निर्माण झालेली दरी कासावीस करते.  शाळेमध्ये अभ्यासाचा ताण वाढत जातो, अनेक नवनवीन गोष्टी समजायला लागतात.  समाजा मधल्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते.  भोवताली घडते ते सारेच चांगले वाटायला लागते.  एखादी चुकीची गोष्ट आई-बाबांनी, शिक्षकांनी दाखवून दिली, समजवण्याचा प्रयत्न केला तर तो अपमान वाटतो.  त्यांच्याशी बोलणेच नको इथपर्यंत मजल जाते.  त्यांचा  सहवास टाळावा असा वाटतो.  अशा या संवेदनशील वयामध्ये सच्चे मित्र मैत्रिणी खूप उपयोगाचे अन महत्त्वाचे ठरतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments