☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-3 ☆ श्री आनंदहरी ☆

बिरोबाच्या शिवाराची वाट चालता चालताच तिला सासूची आठवण झाली तसे तिला सारे आठवले.. तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं.. तिने डोळ्यांना पदर लावून डोळ्यातलं पाणी टिपलं. विचारांच्या नादात ती बिरोबाच्या देवळाजवळ येऊन पोहोचली होती. देवळाजवळ येताच ती विचारातून भानावर आली. तिने क्षणभर थांबून देवासन्मुख होऊन मनोभावे देवाला हात जोडले आणि आपल्या वावराकडं गेली. पेरा चांगलाच उगवून आला होता..  पण रानात तण पण बऱ्यापैकी होतं .. तिची आई म्हणायची, ‘ ईचारा बिगार मन आन तणाबिगर रान असतंय वी कवा ? ‘  आईची आलेली आठवण तिने मनाच्या आतल्या कप्प्यात सरकवली आणि  खुरपं घेऊन भांगलायला सुरवात केली. सगळ्यांचाच भांगलणीचा घायटा असायचा. गावंदरीच्या रानात भांगलायला कुणीतरी यायचं किंवा भांगलणीचा पैरा करायला तयार असायचं पण एवढ्या लांब बिरोबाच्या शिवारात कुणी भांगलायला यायलाही तयार नसायचं. सासू होती तेंव्हा दोघीच सगळे रान भांगलून काढत असत.

तिने भांगलायला सुरवात केली. तिच्या सासूचा कामाचा झपाटा दांडगाच होता.. भांगलताना इतर बायकांची एक पात भांगलून व्हायच्या आधीच सासूची दुसरी पात निम्म्यापेक्षा जास्त भांगलून झालेली असायची.. पण तिचे कामही सासूच्या तालमीत तयार झाल्यासारखंच, सासूच्या पावलावर पाऊल ठेवल्यासारखंच होतं. दिवस मावळतीला येस्तोवर ती एकटीच भांगलत राहिली आणि मग घरी परतली होती.

दारात आली तेंव्हा सोयाबीनचा पेरा चांगलाच उगवून आल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरुन पावसाच्या थेंबासारखं निथळत होतं. तिने दारातल्या बॅरलमधलं पाणी घेऊन हात-पाय धुतलं. तोंडावर पाणी मारून पदराने पुसलं. खाली ठेवलेल्या पाटीतील खुरपं घेतलं आणि ती गोठ्याकडे गेली. हातातलं खुरपं तिनं गोठ्यात असणाऱ्या आडमेढीच्यावर गवतात खुपसून ठेवलं. म्हशीसमोर वैरणीची  पेंडी सोडून टाकली आणि ती पाटी घेऊन सोप्यातनं मदघरात आली..हातातली पाटी भीतीकडंला असलेल्या कणगीवर ठेवली आणि सैपाकघरात जाऊन ती चुलीम्होरं बसली. चूल पेटवून त्यावर चहाचं भुगूनं ठेवलं. गुळाचा गुळमाट चहा प्याल्यावर तिला आणखीनच बरं वाटलं. चहाचे भुगूनं वैलावर सरकवून तिने चुलीवर कालवणाची डीचकी चढवली..

ती खुशीत होती पण दिवस जसजसे पुढं सरकू लागले तसतसे तिच्या मनातली खुशी फुलासारखी सुकू लागली. मनातली चिंता वाढू लागली.. उगवण चांगली झाली होती पण पावसाचा मागमूस नव्हता.. रानात चांगलं हिरवंगार दिसणारं सोयाबीन दिवसेंदिवस तिच्या मनातल्या स्वप्नांना सोबत घेऊन सुकत चालले होते. फुलोऱ्यात यायच्या आधीच पावसाच्या मायेविना उन्हानं सुकून,करपून जाणार असे वाटायला लागलं होतं. रानातल्या सोयाबीनकडे पाहिलं की तिच्या डोळ्यांत पाणी दाटून येत होतं.     ‘ उगा रानात जायाचं तरी कशापायी ?’ असे मनात येत होतं पण त्याच मनाला राहवतही नव्हते.. वारकऱ्यांच्या पावलांनी आपसूक पंढरीची वाट चालावी, तशी तिची पावलं रानची वाट चालत होती पण मनात वारकऱ्यांची ओढ, असोशी, आनंद नव्हता.

जीव जाईल आता असे वाटत असतानाच अचानक जीवाने उभारी धरावी तसे झाले. सोयाबीन पार वाळून जाईल असे वाटत असतानाच अचानक पावसाची रिमझिम आली आणि तिच्या करपलेल्या मनाने आणि रानात करपू लागलेल्या सोयाबीनने पुन्हा उभारी घेतली. पाऊस आला. अधून मधून येत राहिला. पुन्हा साऱ्या शिवरानं आणि तिच्या मनाने हिरवाई ल्याली  होती.

क्रमशः ——–  भाग 4

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments