सौ ज्योती विलास जोशी 

☆ जीवनरंग ☆ रिंइन्व्हेंट ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

 

आज रविवार… म्हणून सहजच विद्याला सकाळ सकाळी फोन केला.

“काय विद्या काय चाललंय?”

“काही नाही गं !नेहमीचच जगण्यासाठीची धडपड …..

तिच्या या उत्तराने मी सटपटले.

” का ग ,काय झालं ?बरं नाही का?”

” मला काय धाड झाली.” पुन्हा तसाच सूर विद्याचा….

“गडबडीत आहेस का? नंतर फोन करते.”

तिचा मूड खराब आहे हे लक्षात आलं.

“नाही गडबड कसली? पण जिवाला शांतपणा म्हणून नाही बघ! सकाळी उठल्यापासून…….

“नुसती जगण्यासाठी धडपड असंच ना ?” मी तिला टोकले.

“नाहीतर काय अगं !”

पण झालं तरी काय सांगशील…..

“अगं अगदी रेसचा घोडा झाले बघ !!थांबायचं कुठं हे मला समजलं पण उपयोग काय त्याचा? लगाम ज्याच्या हाती त्याला तर समजायला हवं ना ?”

म्हणजे कामानं थकली आहेस म्हण….

“मला वाटलंच तुला असच वाटलं असणार!!”

सोड ना आता ती बँकेची नोकरी…व्हीआरएस घे . काय प्रॉब्लेम आहे ?

“तेच तर मला करायचं नाहीये ना”

दोन्हीकडून बोलतेस बाई! मनात तरी काय आहे तुझ्या? तुझा प्रॉब्लेम सोडवायचा तरी कसा?

“मला रिंइन्व्हेंट व्हायचयं ”

मी आ वासला .

“अगं खरंच फ्रस्ट्रेशन आलयं. इतकी वर्ष काम करते मी बँकेत .कधी म्हणून मला कंटाळा आला नाही ….अगदी आवडीचं काम आहे ते माझं. ना बॉसची कटकट न सहकाऱ्यांची पण आताशा नकोच वाटायला लागलयं सगळं .कधी एकदा आठवडा संपतो असं वाटतं आणि रविवारी सगळा राग घरातल्यावर निघतो ”

मला तरी अजून तुझा विषय समजलेला नाही. बोलून मोकळी हो बरं आणि री इन्व्हेंट म्हणजे काय हे ही सांग. “अगं काळाशी मिळतंजुळतं न घेणारी माणसे कालबाह्य होतात स्वतः ला री इन्व्हेंट न करणारी माणसे स्पर्धेतून बाद होतात”

अच्छा म्हणजे कामाचं प्रेशर आहे तर …मी अजून कोड्यातच !!

“तसं म्हण हवं तर!” असं म्हणून ती बोलू लागली.

” काय झालंय आताशा कोर बँकिंग सुरू झाले आहे. सगळं काही डिजिटल कॉम्प्युटराईजड!!… पेनलेस आणि पेपरलेस असं कामाचं स्वरूप आहे. इतके दिवस आम्ही जे मॅन्युअली करत होतो ते सगळं आता कॉम्प्युटर वर करावे लागते आम्हाला ते जमत नाही. बँकेने कॉम्प्युटर हाताळणारी प्रशिक्षित टीम अपॉईंट केली आहे आम्हा प्रत्येकाच्या मागे त्यातील एक कॅंडिडेट असतो. दिवसभर त्यांची मदत घेऊन आम्हाला काम करावे लागते .”

मग तुला प्रॉब्लेम काय आहे ?नवीन पिढीला महत्व दिलं म्हणून इतकी चिडली आहेस का ?

“जखमेवर मीठ चोळलसं माझ्या! तसं नाही गं, स्वतःबद्दल आम्ही मंडळी साशंक झालो आहोत. आम्हाला हे जमेल का? आकलन होईल का ?या मुलां इतका स्पीड येईल का? कस्टमर समोर सुद्धा बऱ्याच वेळेला की बोर्ड सहज हाताळता येत नसल्याने अपमान होतो .

बालवाडीत असल्यासारखं वाटतं. फरक इतकाच की त्यावेळी आम्ही निरागस होतो त्यामुळे अपमान हा शब्द आमच्या शब्दकोशात आलेला नव्हता .पण आताशा ‘इगो ”अपमान ‘असे शब्द आमच्या शरीराला चिकटलेले आहेत .एकदा वाटतं बस झालं व्हीआरएस घ्यावी पण मन हार मानायला तयार नाही .तुला काय वाटतं ?”विद्यानं मला बोलायला वाट करून दिली .

‘ विद्या मी तुला एक उदाहरण सांगते. बघ पटतंय का ते हरिणाला ठाऊक असतं की अत्यंत वेगवान अशा सिंहा पेक्षा जोरात पळाव लागेल नाहीतर आपण शिकार झालोच म्हणून समजा.त्याच प्रमाणे सिंहालाही ठाऊक असते की आपल्या पेक्षा जोरात पळणाऱ्या हरणाला गाठायचं असेल तर वेग वाढवायला हवा नाहीतर आपला उपवास ठरलेला! तुला वाटणारी ही रेस ही स्पर्धा म्हणजे जीवनाचा अपरिहार्य अविभाज्य असा भाग आहे. यथाशक्ती प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात आहे. तुझ्या वयात एक्सेप्टन्स असणं जरुरी आहे .

मन हार मानायला तयार नाही हे तुझं वाक्य सकारात्मक आहे….. मनाला ऊर्जा देणारे औषध आपल्या शरीरात आहे हे ध्यानात असू दे.

“थोडक्यात काय बँकेच्या दारा बाहेर अपमान अहंकार सोडून आत प्रवेश करते आणि स्वतःला युवापिढीच्या मदतीने रिंइन्व्हेंट करते. इतकं सोपं आहे ते”.

माझ्या एका सहज केलेल्या फोन मुळे विद्याचे चित्त शांत झालं याचं मला आत्यंतिक सुख वाटलं.

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4.3 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुनिता कुलकर्णी ..

एक जीवनमुल्य सांगीतलय..