श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
संक्षिप्त परिचय
वेगवेगळ्या दिवाळी अंकातून कविता व लेख प्रसिद्ध,
“मनपंख” हा कथा व लेख संग्रह प्रसिद्ध.
☆ विविधा ☆ भरली ओंजळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
ओंजळ ती केवढी; भासते छोटी; मात्र ही असते खूप मोठी. आपली सुखदुःख तिच्यात मावतात.मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीतच पेलता येतात. ओंजळीत मायेचं चांदण मावत. आणि ओंजळ भरून आपण जेव्हा धान्य पेरतो. तेव्हा आपल्याला निसर्ग ते राशीच्या रुपाने परत करतो.ओंजळीत आकाश उतरतं व सप्तसागरांच पाणीही मावू शकतं. ओंजळीत म्हणे ब्रम्हांडही मावतं. झोपेतून जाग सकाळी आपण करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. बोटांच्या अग्रावर लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती, आणि मुळाशी गोविंद आहे. करदर्शन करताना आपण त्यांच स्मरण करतो. मगच आपण उद्योगाला लागतो.दारी आलेल्या अथितीला विन्मुख न पाठवता आपण त्याला पसाभर धान्य /पीठ देतो. आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा आशिर्वाद ओंजळीतूनच घेतो. सुर्याला अर्घ्य अर्पण करतात ते ही ओंजळीतूनच…
साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल तेवढेच अन्न पुरेसं असत. त्यापेक्षा जास्त खाल्ल तर अजीर्ण होत. तेवढच पाणी माणसाची तहानही भागवतं. उषःपानही ओंजळीनंच करायचं असत. माणसाच्या अनेक क्रुतींशी व भावनांशी ओंजळीच फार घट्ट नात असतं. ओंजळ हे दात्रुत्वाचं रुप आहे. समर्पणाच्या भावनेच द्योतक आहे. स्रीची लाजही ओंजळीतच मावते. सुवासिनीची ओटी आपण ओंळीनेच भरतो.
ओंजळ स्विकारली तर ती परतही करावी लागते. ओंजळ कधीच रिती होत नाही. ती पुन्हा पुन्हा भरत जाते.ओंजळ सांगते, ‘आधी द्या मगच घ्या’. ओंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या, झिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या…!
जगणे आता उत्सव व्हावे
आनंदाच्या ओंजळीने भरुन जावे
पैसा अडका याही पेक्षा
ओंजळभर आंनद मिळावा
मन समाधानाने भरुन जावं
दुखरे क्षण सोडून द्यावे
जगणे सारे आनंदी करावे
आनंदाने, समाधानाने भरल्या ओंजळीने मरण यावे.
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
शब्द ओंजळभर पण अर्थ खूप खूप मोठा.