सौ ज्योती विलास जोशी 

B.Sc Microbiology, P.G.Diploma in Hospital Management

 ☆ विविधा ☆ गणगोत ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

माझी परसबाग हे माझ्यासाठी माझं नंदनवन! ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हे संतांचे वचन तंतोतंत पटावं अशी ही विसाव्याची जागा! मनमोकळं व्हायच ठिकाण जणू! मौनातून बरच काही सांगून जाणार विश्वच ते! सजीव सचेतन असं जिवाभावाचं कुटुंब….

परस दारावर जाईचा नाजूक वेल पसरलाय. उंबर्‍यावर पाय पडताच तिचा सुवास श्वासात भरून जातो. शुभ्र पांढऱ्या फुलांचे सात्विक तेज मन उजळून टाकतो.

परसाच्या मध्य भागी आपल्या सावळ्या मंजिऱ्या लेऊन नटलेली कृष्ण तुळस मन प्रसन्न करते. तिचे भक्ती रूप दर्शन नतमस्तक व्हायला लावते.

तिच्याच बाजूला जास्वंद नम्रतेने वाकून तिला लाल फुलं अर्पण करतोय असं काहीसं दृश्य दिसतं.

अबोली नावाप्रमाणेच अबोल आणि शांत..,,

परस दाराच्या मागच्या दारापाशी वेगवेगळ्या रंगात गुलाब हसतात. काटेरी भाले अंगावर घेऊन जणू आतील सर्व गणगोतांचे चे ते संरक्षण करतात.

गुलाब भालदार तर बकुळ चोपदार सावळीशी अशी ही नाजूक पण दाराशी खडा पहारा ठेवते तिच्या सुगंधाने आकर्षित होऊन निमिष भर थांबून घराकडे एक दृष्टीक्षेप टाकून पुढे जाणाऱ्या प्रत्येका पासून बागेला दृष्ट लागू नये म्हणून ही सावळी सर्वांना काळं तीट लावते जणू!

आंबा गर्द सावली ढाळतो ते केवळ माझ्या मनी साठीच, असे मला वाटते कारण मनी दिवसभर त्याच्या सावलीत पहुडलेली असते.

वृद्ध पारिजात अंगणाची शोभा वाढवतो पारिजातकाची नाजूक फुलं रोज तुळशीवर बरसतात आणि तिची यथासांग पूजा होते.

चाफा निमुटपणे पान पिसाऱ्यातून दर्शन घडवतो तो अगदी माझ्या झोपायच्या खोलीपर्यंत पसरला त्यामुळे मलाही जणू त्याचाच सुगंध.

अशीही माझी परसाबाग माझ्या जिव्हाळ्याची…..

त्या दिवशी मी खूप उदास होते. आईचं वर्षश्राद्ध नुकतच झालं आणि बाबांचं एक दोन महिन्यावर येऊन ठेपलं होतं.आईला सोडून बाबांना जणूं एकट राहणं जमलच नाही गेले पाठोपाठ तिला भेटायला. आम्हाला इथे एकटं सोडून…

दोघांच्या आठवणीने डोळे पाणावले. नकळत हळूहळू टीपं ढाळू लागले. अंगणातील मंडळींच्या नजरेतून हे सुटले नाही आणि मग प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.

“ताई काय झालं? का रडतेस? आमचं काही चुकलं का? काही तरी बोल बाई!” सर्वांनी एकदम गलका केला.

गुलाबाने री ओढली “ताई तू काळजी करू नकोस. तुझं सगळं दुःख मी पचवतो. सगळे काटे मी माझ्या अंगावर घेतो”

जास्वंद म्हणाले, “आता जाते कशी बाप्पाकडे आणि तुझी आणि त्यांची भेटच घडवते. मग हवं ते मग त्याच्याकडे”

चाफा म्हणाला, “रडू नको ताई. बोलून सगळे निपटूया. तू अगोदर तुझ्या मनात जे दाटलय ते मोकळं कर”

अबोली म्हणाली, “मी नावाचीच अबोली ग तुझी माझी बट्टी! सांग मला तुझ्या मनातलं आणि मोकळी हो.

बकुळ म्हणाली,“ दृष्ट लागली माझ्या ताईला, दृष्ट काढून टाकते आता ताबडतोब!”

आंबा म्हणाला,“अशी संतापू नकोस ताई शांत हो जराशी. ये पाहू माझ्या सावलीत आणि सांग मनातलं….”

मनी माझ्या दोन पायात घुटमळला लागली तिच्या झुबकेदार शेपटीने मला गोंजारायला लागली. मूकपणे मला बोलतं करायचा तिचा प्रयत्न होता.

तुळशी ने मौन सोडले. तिने माझ्या मनातलं जाणलं. “अगं ताई आई-बाबांच्या जाण्याने तू इतकी दुःखी झाली आहेस ते मला ठाऊक आहे तुझे अश्रूच ते सांगतात पण ‘उपजे ते नाशे’ या न्यायाप्रमाणे अशा घटना घडणारच.हे जीवन चक्र आहे. आपण वास्तव स्वीकारले पाहिजे. नाही का?

इतका वेळ शांत असलेला वृद्ध पारिजात बोलू लागला, “अगं बाळा मीच तुझा तात!

दारावरची जाई म्हणाली अगं राणी मीच तुझी आई!”

आई-बाबांना भेटल्याचा कोण आनंद झाला म्हणून सांगू?….. माझा मन मोर नाचू लागला.

इतक्यात वार्‍याची एक मंद झुळूक आली आणि गुलाब अबोली चाफा बकुळ जास्वंद सर्वांना घेऊन फेर धरून नाचू लागली. संपूर्ण आस मंतात एक मंद सुगंध दरवळू लागला. एक असा अप्रतिम गंध जशीअत्तराची कुपी सांडली जणू………

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments