सुश्री मीनाक्षी सरदेसाई

जीवन परिचय

नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.

☆ विविधा: ललित : पर्णसंभार  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆

(१९ तारखेच्या ई-अभिव्यक्ती मराठीच्या अंकात सुश्री मीनाक्षी सरदेसाई यांचा ‘पर्णसंभार’ हा लेख  नजरचुकीने पूर्ण आला नव्हता. तो संपूर्ण लेख आता प्रकाशित करीत आहोत.-संपादक, ई-अभिव्यक्ती .)

झाडं झाडांसारखी दिसतात ती त्यांच्या गर्द पानांमुळे.जंगलं गडदगहन होतात ती हिरव्या पर्णराजीमुळे. शिशिरात पानं संप केल्या सारखी झाडांना सोडून जातात तेव्हा झाडं विरहगीत गातात. “रंग न उरला गाली ओठी,—–श्रुंगाराचा साज उतरला” अशी त्यांची अवस्था होते. पोपटी ,कोवळ्या पालवी पासून काळपट  हिरव्या राठपणापर्यत सर्व अवस्थांतील पर्णसंभार हे झाडांचं वैभव.ह्या श्रीमंतीचा उपभोग आपण वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो.

मला आठवतंय, सकाळी उठल्यानंतर काही न बोलता आम्ही केळीशी जायचो.तिच्या पानांवरच दंव केसांना लावायचो. का?तर केस तिच्या सोपटासारखे लांब होतात असं आईने सांगितलेलं. त्यात काय औषध होतं माहीत नाही, पण केळीचा तो रसरशीत सहवास मनाला खूप आनंद द्यायचा. टवटवीत, हिरव्या पानावरच्या ब्रेललिपी सारख्या उठावदार, समांतर शिरा, हळूहळू  अरुंद होत जाणारी नि टोकाशी संपणारी कोरीव पन्हळ, काही गडद हिरवी तर काही गर्भरेशमी पोपटी विशाल पानं,केळीबाईचं हे रुपलाघव बघताना भान हरपायचं.

सणावारी अशा पांनांवरचं लाल,पिवळं,शूभ्र,रसभरीत जेवण, म्हणजे स्वर्गसुखच.देवाचा नैवेद्य, कावळ्याना घास, हे सगळं केळीच्या फाळक्यांवर.आमची पाच वर्षांची लली एकदा त्या प्रशस्त पानावर झोपली. “किती गाल वात्तय” म्हणाली. हिरव्या पानावरची, गोरी उघडी लली म्हणजे एक निसर्गचित्र होऊन बसललं.

वड, पळस, फणस यांच्या पानांच्या पत्रावळी म्हणजे  हिरव्या डिशेस. पानं जोडण्यासाठी नारळाच्या झावळ्यांच्या काड्या. झाडं इतकी परिपूर्ण असतात की दुसरीकडे जावच लागत नाही. गप्पा मारता मारता हात चालू. हा हिरवा कचरा पुन्हा झाडं सत्व म्हणून घेतात. वर्तूळ पुरं. घासापुसायचं कामच नाही.

सणासुदीला आंब्याची पानं तोरण होतात.पानांची एखादी फांदी दाराला शोभा आणतात. कर्दळी चौरंगावरच्या पूजेला आणखी मंगल शोभा आणते.कोकणातली मुलं अंगणातल्या फणसाच्या पानांचे बैल करतात. मळ्यात खर्ऱ्या बैलांची औत नि अंगणात मुलांची औतं फिरत भाताची लावणी लावतात. थंडीत ह्याच पानांची शेकोटी वत्सल ऊब देते.

पानांच्या साथीने साधीसुधी पक्वान्न किंवा न्याहरी बनते. हळदीच्या पानावर गुळपीठ सारवायचं.ती पान वाफवायची. लवंग वेलचीचं  कामच नाही. हळदीचा वासच पानग्याना खमंग करतो. चातुर्मासात कांदा लसूण वर्ज,पण ओव्याची पानं उणीव भरून काढतात. त्यांची भजी खमंग, चविष्ट होतात. पानांचा छाप भज्याच्या आत उमटलेला.

एक सुंदर सजावट.पूर्वी तान्हया बाळांच्या आया बाळाच्या टाळूवर कापसाच किंवा एरंडाचं पान टोपर्ऱ्याखाली सारून ठेवत.कडक उन्ह बाधू नये म्हणून. संध्याकाळपर्यंत पान कुरकुरीत व्हायच.बाळाच्या मेंदू पर्यंत उष्णता पोचायची नाही.

पान खाणारे आपल्या चंचीत विड्याच्या पानांच्या चळती नोटांसारख्या जपून ठेवतात. पानाच व्यसन असणाऱ्याना ती पानं पैशासारखी मौल्यवानच की. अशी  ही पानं.घर सजवतात, औषध करतात, खेळणी होतात, स्त्रियांच्या नटण्याथटण्यालाही मदत करतात. मेंदी नाही का स्त्रियांचे हात, पाय केस रंगवते. अंगणात श्रावण सजलाय.त्यामुळेच मनात रंगला हा हिरवा पानांचा उत्सव.

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
तुमच्या शब्दांनी सजलेले पर्णसंभार खूपच लोभसवाणा.