श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ विविधा: ललित – आठवणींच असच असतं…☆

संपादकांचा फोन आला आणि नाही म्हटलं तरी मी सुखावलोच. दिवाळी अंकासाठी काही ना काही लिहून पाठवल्याशिवाय ते काही गप्प बसणार नाहीत,हे माहित होत मला. आता मस्त एखादी दीर्घकथा लिहावी आणि द्यावी पाठवून अशा विचारात मी होतो. पण यंदाचा दिवाळी अंक अगदी छोटासा निघणार आहे, त्यामुळे काहीतरी छोटंसं पाठवा, एखादी जुनी आठवणही चालेल असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी जरा हिरमुसलोच. तरी त्यांना होकार दिला आणि फोन ठेवला.

आता छोटंस काय बरं लिहावं? जुनी एखादी आठवण लिहायची म्हटलं तरी ते सोपं नव्हतं. कारण थोडं जरी मागे वळून बघितलं तरी आठवणी कशा झुंडीन पुढं येतात. त्यातली नेमकी कोणती सांगायची हे ठरविणं खूप अवघड असतं.  प्रत्येक आठवणीच महत्व,सौंदर्य वेगळंच असतं. खर तर,सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की जरा गोंधळायलाच होतं. अशा वेळी आठवणी या स्त्री सारख्या वाटू लागतात.

खरंच, आठवणी या स्त्री सारख्याच असतात. स्त्रीची जशी अनेक रुपं पहायला मिळतात,तशीच आठवणींनाही विविध रुपं असतात. अल्लडपणानं बागडणारी बालिका,उमलत्या कळीप्रमाणे षोडशा,यौवनाने बहरलेली युवती, तारुण्याच्या उंबरठ्यावरून सौख्याचं माप ओलांडून संसारात पदार्पण करायला उत्सुक असणारी नवोढा, मातृत्वाने तृप्त झालेली माता, सर्व काही सोसून प्रौढपणाची जबाबदारी संयमाने पेलणारी गृहिणी आणि वृद्धत्वाकडे झुकत असताना नातवंडांच्या आगमनाने उल्हासित होणारी आजी ! स्त्रीची किती ही विविध रूप!

आठवणींचही असच असतं. त्यांच प्रत्येक रूप मोहविणारच असतं. बालपणीच्या आठवणींनी मन बागडत नाही असं कधी झालय का ? तारूण्यातल्या आठवणी त्यावेळच्या स्वप्नांना घेऊन येत असतात. तुमची स्वप्न सत्यात उतरलेली असोत किंवा नसोत, त्यांच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा तुम्ही पुन्हा त्या काळात जाऊन पोहोचता. तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारी एखादी आठवण असेल तर तुमच्या मनाला नव्याने बहर येईल. तुमच्या कर्तृत्वाच्या आठवणी, तुम्ही भोगलेलं, तुम्ही सोसलेलं, तुम्ही मिळवलेलं आणि काही वेळेला तुम्ही अगदी गमावलेलं सुद्धा ! सगळं सगळं तुम्हाला जेव्हा आठवायला लागतं तेव्हा त्या त्या काळातंल ते ते चित्रच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तुमचं वय जसं वाढत जाईल तशी या आठवणींची किंमत वाढतच जाईल. म्हणून तर या आठवणी मनाच्या खोल कप्प्यात अगदी नाजूकपणे जपून ठेवायच्या असतात. सौख्याच्या आठवणी सर्वांना वाटाव्यात तर सोसलेलं सारं आपल्यासाठी ठेवावं.

आणि हो, या आठवणी आणखी एका बाबतीत अगदी स्त्री सारख्या असतात बरं का !

तुमची खरीखुरी सखी जशी तुमच्यापासून दूर जात नाही तशाच या आठवणी सुद्धा तुम्हाला कधी अंतर देत नाहीत. अगदी शेवटपर्यंत तुमच्याच होऊन राहिलेल्या असतात. आणि मग ? मग आपल्यानंतर आपण स्वतः दुसर्यासाठी आठवण बनून जातो. आठवणी जपण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी. !

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली
मो 9421225491

image_print
3.4 5 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
दयासागर बन्ने-

आठवणी त्यांची विविध रूपे आणि तुलना असं सुंदर ललित खूपच भावलं सुहास पंडित जी लेखन समर्पक रम्य..

सुहास रघुनाथ पंडित सांगली

,धन्यवाद