सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “हव्यास” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काल सांगाती समुहावर रिव्ह्यु मधे श्री.महेश पेंढारकर ह्यांची जुनी पण खूप मस्त पोस्ट परत एकदा वाचनात आली.ह्या पोस्ट मुळे कित्येक दिवसातील माझ्या वागणूकीची अटकळ येऊन डोक्यात लख्ख प्रकाशच पडला. हल्ली मला औषधे आणि खाण्यापिण्यासाठी लागणा-या आवश्यक गोष्टींच्या दुकानात सोडून दुसऱ्या कुठल्याही दुकानाची अक्षरशः पायरी सुद्धा चढायची  भिती वाटू लागलीयं.

खरोखर ह्या जवळपास तीस वर्षांच्या संसारात आवश्यक आवश्यक करीत कितीतरी वस्तू, गोष्टी ह्या आवश्यकतेपेक्षाही कितीतरी पटीने जास्त जमवून ठेवण्याचा, कित्येक वस्तूंचा संग्रह करून कवटाळून ठेवण्याचा माझा हव्यास आता माझ्याच डोळ्यात खुपायला लागला आहे.

जेव्हा स्वतःमधील दोष हे आपण स्वतःशीच मनोमन मान्य करायला लागलो की समजून जावं पाणी खूप जास्त डोक्यावरून वहायला लागलं आहे.कारण आपली सहज सरसकट प्रवृत्ती असते की दुसऱ्यांचे दोष,चुका अवगुण चटकन दिसतात, जाणवतात परंतु एकतर आपले स्वतःचे दोष,चुका, अवगुण मुळी चटकन दिसतच नाहीत, दिसले तरी कानाडोळा करण्याकडे कल असतो आणि अगदीच दिसले तरी आपलं मनं,आपला मेंदू ते मान्य करायला राजीच नसतो मुळी.त्यामुळे मी ज्याअर्थी माझे दोष वा माझ्या चुका मान्य करतेयं त्याअर्थी मला ताबडतोब माझा विचारांचा, वागणूकींचा ट्रँक बदलायला हवा आहे हे नक्की.

सर्वप्रथम घरातील भांडी बघून जीव दडपायला लागला आहे.ति. आईंची आधीची भांडी,माझ्या लग्नातील आणि लग्नानंतरची जमवलेली भांडी बघून मला माझीच स्वतःची जणू खवलेमांजर झाल्यागतं वाटतयं.काय ते डब्बे,काय ती क्राँकरी,जपता जपता वेड लागायचं फक्त बाकी आहे. स्वतःच्या वेड्या मनाची समजूत काढतांना खरच मी मलाच सांगतेयं,” कोणी आलंगेलं तर लागतील की”, पण खरं सांगा हल्ली हळुहळू एकमेकांच्या भेटीच मुळी उंबराच्या फुलागत होऊ लागल्यात आणि त्यातून ह्या अशा संकटांच्या काळात असे कितीसे माणसं एकमेकांकडे येणीजाणी करणार आहेत ?.

आता माझा मोर्चा वळला कपड्यांच्या ढीगांकडे.खरचं अती झालं आणि हसू आलं च्या ऐवजी अती झालं आणि रडू आलं ही परिस्थिती आलीयं.पंचवीस वर्षांपासून च्या माझ्या साड्या अजूनही जैसे थे असतांना ह्या साड्यांची थप्पी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अर्थात ही साड्यांची कृपादृष्टी माझ्या आणि अहोंच्या दोघांच्याही बहिणींची.व्यक्ती म्हणजे मी  प्रेमळ,शहाणी, चांगली आणि गुणी  असल्याने माझी आई,बहिण आणि नणंद ह्या तिघीही स्वतःपेक्षा जास्त साड्या मला घेऊन माझे लाड पुरवितात. भरीसभर कुठून दुर्बुद्धी सुचली अन् मध्यंतरी  पंजाबी ड्रेस घालायला लागले होते. बाकी काही नाही पण ह्यामुळे अजून काही नाही पण पंधरा वीस ड्रेस ची कपड्यांच्या इस्टेटीत भरच पडली. असो.

नाही म्हणायला माझ्या डोळ्यात अजून तरी पुस्तकांनी खचाखच भरलेली कपाटं मात्र डोळ्यात सलत नाहीत हे खरे.देवाने एक कृपा मात्र केली मला आँनलाईन शाँपींगच्या आवडीचा तसूभरही वारा माझ्या अंगाला लागू दिला नाही. अजून पर्यंत एक रुपयाचे देखील आँनलाईन शाँपींग केलेले नाही आणि आतातर ही उपरती झाल्याने ते करायची सूतराम शक्यताही नाही.

त्यामुळे अतिशय अल्प गरजा, कमीत कमी  सामान बाळगणा-या व्यक्तींचा मी प्रचंड आदर करते. आणि जर हा मोह,हव्यास आवरून कमीतकमी गरजांमध्ये,अल्प सामानांमध्ये जगणं शिकायचा कुठे क्लास असेल तर मी करावा म्हणतेयं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments