श्री उद्धव भयवाळ

संक्षिप्त परिचय 

सेवानिवृत्त बँक अधिकारी

  • विनोदी कथा, एकांकिका, बालकथा , बालकवितेपासून लावणी प्रकारापर्यंत लिखाण .
  • “इंद्रधनू” हा कवितासंग्रह आणि “हसरी फुले” हा बालकवितासंग्रह  “तारांबळ” हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
  • “हसरी फुले” या बालकवितासंग्रहास  “अंकुर वाड्मय पुरस्कार-२००८” प्राप्त.
  • “सुभद्रा प्रतिष्ठान” सेलू (जि. परभणी) यांचा कवितेसाठीचा प्रतिष्ठेचा “गौरव पुरस्कार” .
  • नाशिक येथील “कलाकुंज”  प्रकाशनाच्या वतीने साहित्यसेवेबद्दल नाशिक येथे सत्कार.
  • भारतीय नरहरी सेना {महाराष्ट्र प्रदेश} यांचा ‘नवरत्न’ पुरस्कारांपैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार.
  • ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे मी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या “साने गुरुजींच्या छान छान गोष्टी” या पुस्तकाचा समावेश.
  • अ.भा.सानेगुरुजी कथामाला,जालना यांच्या बालकुमार कविसंमेलन अध्यक्षपद.
  • “सलिला साहित्यरत्न सन्मान” प्रदान.”अहिंदी भाषी क्षेत्रामध्ये हिंदी भाषेतील साहित्य निर्मिती” यासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान.

☆ विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

एका पाहणीनुसार भारतामध्ये साठ वर्षांवरील जनसंख्या आठ कोटी आहे. याचा अर्थ आज घडीला भारतातील सात टक्के लोक ‘ज्येष्ठ नागरिक’ या व्याख्येत येतात. आणि दरवर्षी वेगवेगळ्या आस्थापनांमधून साधारणपणे सात लाख लोक निवृत्त होत आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेदिवस वाढत जाणार हे निश्चित. यावरून कुणाचा असा समज होऊ शकतो की, या ज्येष्ठ नागरिकांपुढे जगण्यासाठीच्या खूप समस्या असणार आहेत. काही प्रमाणात ते खरे असेलही. पण निवृत्तीनंतरचे जीवन सुखी, आनंदी आणि चैतन्यमय कसे करायचे ते आपल्या हातात आहे.

निवृत्त जीवन आनंदाने जगण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

१. आर्थिक स्थैर्य  २. आरोग्य   ३. प्रेमाची माणसं  (आप्तेष्ट, मित्र इत्यादि )

त्यापैकी आर्थिक स्थैर्य हवे असण्यासाठी निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची हमी पाहिजे. दरमहा मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त बँकेमधील ठेवीवर मिळणारे मासिक व्याज हासुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. आपण कष्टाने कमावलेल्या पुंजीचा आपल्याला निवृत्तीनंतर चांगला उपयोग व्हावा म्हणून जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी पैसा गुंतवावा. मात्र त्या गुंतवणुकीत कमीत कमी जोखीम असावी. कारण जसजसे वय वाढत जाते, तसतशी जोखीम घेण्याची मानसिकता कमी होत जाते. त्याचप्रमाणे अचानक उद्भवणाऱ्या आजारपणासारख्या गोष्टींसाठी थोडे पैसे बाजूला काढून ठेवावेत म्हणजे ऐनवेळी त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य. ते चांगले राहण्यासाठी आपणास झेपेल तसा नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे आणि स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. जसे की, नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये आपले काही छंद जोपासायचे राहून गेले असतील तर आता ते आपण करू शकतो. कारण अशा गोष्टींमुळे आपला मेंदू तरतरीत राहतो. त्याचप्रमाणे स्वत:चा आणि जोडीदाराचा आरोग्यविमा आपण नोकरीमध्ये असतांनाच काढून ठेवणे हेसुद्धा आवश्यक आहे.

सुखी निवृत्त जीवनासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाची माणसे. यामध्ये ज्याप्रमाणे आपले कुटुंबीय आहेत, त्याचप्रमाणे नातेवाईक आणि मित्रही आहेत. या सर्वांना आपल्याविषयी प्रेम आणि काळजी वाटत असतेच. पण ते प्रेम वृद्धिंगत कसे होईल हे पाहणे आपल्याच हातात आहे. यासाठी आधी काही पथ्ये आपण पाळणे आवश्यक आहे. एक म्हणजे घरामध्ये कुणालाही अनाहूत सल्ला देण्याचे टाळावे. मुलांना त्यांचा संसार त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. त्यात अनावश्यक ढवळाढवळ नको. घरातील मुले, सुना, नोकरीस असतील तर नातवंडांची काळजी घेणे हे आपणास जमू शकते. त्याचप्रमाणे विजेचे किंवा टेलिफोनचे बील भरणे इत्यादी छोटी छोटी कामे आपण करू शकतो. त्यामुळे कुटुंबियांना आपली मदतच होते. दुसरे म्हणजे नोकरीमध्ये व्यस्त असतांना आपण जास्तीत जास्त वेळ नोकरीच्या ठिकाणी  घालवलेला असतो. कुटुंबियांना देण्यासाठी तेव्हा वेळच नसतो. आता निवृत्तीनंतर मात्र आपण जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसाठी द्यायला हवा. कुटुंबियांसोबत पर्यटनाला जाणे, सर्वांनी एकत्र बसून नाटक, सिनेमा पाहणे हे आपण करू शकतो. आपल्या जोडीदाराच्याही काही इच्छा, आकांक्षा आपल्या नोकरीच्या व्यग्रतेमुळे पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर आता त्या पूर्ण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण प्रेम दिल्याने प्रेम वाढत असते ही गोष्ट सदैव ध्यानी असू द्यावी.

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यासाठीसुद्धा थोडा वेळ आपल्या दिनक्रमातून काढला पाहिजे. कारण ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचेही आपण देणे लागत असतो. तसेच नवनवीन मित्र मिळविणे, एखाद्या सामाजिक संस्थेशी स्वत:ला जोडून घेणे, सदैव उत्साही राहण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी नक्कीच आपले निवृत्त जीवन सुखी बनवितील यात शंका नाही.

© श्री उद्धव भयवाळ

औरंगाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अरुण वि. देशपांडे

छान माध्यम आहे, लेखन सहभाग जरूर असेल