श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ शब्दरंगी रंगताना… ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘शब्दरंगी रंगताना… साध्य आणि साधना’

शब्द हे भाषेचे अलंकार असतात.शब्द सूचक असतात.मार्गदर्शक असतात.ते अर्थपूर्णही असतात आणि कधीकधी फसवेही.शब्दांची अशी असंख्य रुपे असतात. शब्दांच्या या सगळ्या भाऊगर्दीत असा एक शब्द आहे जो त्याच्या वेगळेपणामुळे उठून दिसतो.तो ज्यांना हवं असेल त्यांना नेहमीच भरभरुन देतो आणि देताना गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, खेडवळ-शहरी असा कोणताही भेदभाव करीत नाही. त्याला आपलंसं करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला तो आदर्शवत बनवू शकतो. या अर्थाने खूप वेगळा आणि म्हणूनच मला मोलाचा वाटणारा  हा शब्द म्हणजे ‘बिनचूक’!

बिनचूक हा शब्द ऐकताच तो फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्याशी संबंधित आहे असेच वाटते. विद्यार्थीदशेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर बिनचूकच लिहिता यायला हवे या दडपणाखाली वाहिलेल्या अभ्यासाच्या ओझ्यामुळे  तो अभ्यास,त्या परीक्षा, प्रश्नपत्रिका,आणि या सर्वांच्या धास्तीमुळे निर्माण झालेली अस्वस्थ घुसमट हे सगळं ‘बिनचूक’ या शब्दाला इतकं घट्ट चिकटून बसलेलं आहे की हा शब्द फक्त प्रश्नोत्तरांशीच संबंधित आहे असंच कुणालाही वाटतं. पण ते तसं नाहीय.’बिनचूक’हा शब्द फक्त चूक आणि बरोबर या टीचभर परिघासाठी आकाराला आलेलाच नाहीय. त्याची नाळ थेट एकाग्रता, नीटनेटकेपणा, निर्णयक्षमता या सगळ्यांशीच अतिशय घट्ट जुळलेली आहे.

बिनचूक म्हणजे जसं असायला हवं तसंच.अचूक. अतिशय काटेकोर.नीट. व्यवस्थित.नि:संदिग्ध ! बिनचूक या शब्दाचे खात्रीचा,विश्वसनीय, भरवंशाचा.. असेही अर्थ आहेत. या सर्व अर्थछटांमधील सूक्ष्मतर धाग्यांची परस्परांमधील घट्ट वीणच एखाद्या व्यक्तीमत्त्वाचा गुणविशेष ठरणारा बिनचूक हा शब्द आकाराला आणते. यातील ‘खात्रीचा’,’विश्वसनीय’, ‘भरवंशाचा’ ही सगळी वैशिष्ट्ये त्या व्यक्तीची अचूक निर्णय घेण्याची क्षमता,कार्यपद्धतीतील पारदर्शकता,त्याची सर्वसमावेशक वृत्ती यामुळे सभोवतालच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमांची प्रतिबिंबेच म्हणता येतील. याउलट सतत चूका करणारी एखादी धांदरट व्यक्ती कुणालाच खात्रीची, भरवंशाची वाटत नाही. ती बेभरवंशाचीच वाटते. एखादे महत्त्वाचे अवघड काम एखाद्यावर तातडीने सोपवायची वेळ आली तर अशी धांदरट व्यक्ती ते काम बिनचूक पूर्ण करू शकेल याबद्दल कोणालाही विश्वास वाटणे शक्यच नसते. त्यामुळेच ती व्यक्ती जबाबदारीच्या, महत्त्वपूर्ण कामांसाठी अविश्वसनीयच ठरते.

अशा धांदरट व्यक्तींकडून होणाऱ्या चूका आणि कामचुकार माणसाने केलेल्या चूका यात अवगुणात्मक फरक नक्कीच आहे. धांदरट व्यक्ती आत्मविश्वासाच्या अभावी बिनचूकपणा पूर्णतः अंगी बाणवू शकणारही नाही कदाचित,पण आपल्यामुळे होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव असते. त्यामुळे स्वतःमधे सुधारणा घडवून आणण्यासाठी अशी व्यक्ती त्याच्यापरीने प्रयत्नशीलही असते. आळशी आणि कामचुकार व्यक्तींचं तसं नसतं. त्या वेड पांघरून पेडगावला निघालेले प्रवासीच असतात. कामं टाळायच्या वृत्तीमुळे आपल्या अंगाला तोशीस लावून घ्यायची त्यांची मुळात तयारीच नसते. येनकेन प्रकारेन त्यांचा कामे टाळण्याकडेच कल असतो.

अशा कामचुकार व्यक्तींना बिनचूकपणा अंगी बाणवणे हे अशक्यप्रायच वाटत असते. त्यामुळे ‘मी आहे हा असा आहे’ असं म्हणत स्वतःच लटकं समर्थन करीत रहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे एकतर ते खऱ्या अर्थाने समाधानी नसतात आणि ते आयुष्याच्या परीक्षेतसुध्दा काठावरही पास होऊ शकत नाहीत.

याउलट बिनचूकपणा अंगी बाणवणे हे ज्यांच्यासाठी  जाणीवपूर्वक ठरवलेले ‘साध्य’ असते ते आवश्यक कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे प्रत्येक काम अचूक, दोषरहित व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्यासाठी ही एक साधनाच असते.अर्थात ही साधना ते स्वखुशीने मनापासूनच करीत असल्याने त्यांच्यासाठी ती कधीच कष्टप्रद, त्रासदायक नसते तर हळूहळू अतिशय नैसर्गिकपणे ती त्यांच्या अंगवळणी पडत जाते. अशी माणसे कधीच चूका करीत नसतात असं नाही. त्यांच्या हातूनही अनवधानाने क्वचित कधी चूका होतातही. पण ते अशा चुकांमधून काही ना काही शिकत जातात. एकदा झालेल्या चुकीची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग रहातात. स्वतःची चूक मान्य करण्यात कधीही कमीपणा मानत नाहीत. आपली चूक मनापासून स्वीकारतात आणि नेमकं काय आणि कसं चुकलंय हे समजूनही घेतात.’बिनचूकपणा’ हे साध्य प्राप्त करण्यासाठीची ही त्यांची साधनाच असते !

हे सगळे कष्ट घ्यायची तयारी नसलेलेच कामचुकारपणा करायला प्रवृत्त होत असतात. त्याना परिपूर्णतेची आस कधी नसतेच.अशा लोकांसाठी बिनचूकपणा हा कोल्ह्याला आंबट वाटणाऱ्या द्राक्षांसारखाच असतो.अन्यथा बिनचूकपणा किंवा नीटनेटकं काम त्यांना अशक्यप्राय वाटलंच नसतं. याउलट परिपूर्णतेचा ध्यास घेतलेली माणसं साधी साधी कामेही मन लावून करतात. त्यातच त्यांचा आनंद आणि समाधान लपलेलं असतं. अनवधानाने झालेली चूकही त्यांना अस्वस्थ करीत असते आणि मग त्या चूकांमधून ते स्वतःत सुधारणा घडवून आणायला प्रवृत्त होतात. स्वतःच्या शिस्तप्रियतेमुळे अंगी बाणलेला हा बिनचूकपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी प्रमुख घटक ठरत असतो.

परिपूर्णतेचा,अचूकतेचा असा ध्यास घेणाऱ्या व्यक्तींचेही दोन प्रकार असतात. जी माणसे कामात अगदी शिस्तशीर,बिनचूक असतात त्यातील कांहीना  त्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानाचे रुपांतर कधीकधी अहंकारात होत जाते. त्यामुळे  त्यांच्या वागण्याला एक काटेरी धार येऊ लागते जी इतरांना जातायेता सहज ओरखडे काढत जाते. त्यामुळे इतरांना त्यांच्या कामाबद्दल किंवा परफेक्शनबद्दल एरवी कितीही आदर वाटला तरी ते त्यांच्याजवळ जायला घाबरतात. त्यांच्यापासून थोडं अंतर राखूनच वागतात. हा दोष अर्थातच त्या व्यक्तींच्या अहंकाराचा.त्यांच्या बिनचूकपणाचा नव्हे. अशा अहंकारी व्यक्ती इतरांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे,श्रेष्ठ आहोत या कल्पनेत सतत तरंगत असतात. आणि स्वतःचा जगण्यातला आनंद मात्र हरवून बसतात.

या उलट यातल्या दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना त्यांच्या बिनचूकपणाचा कधीच दुराभिमान नसतो. सर्वांना सामावून घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सगळ्यांना सोबत घेतात,त्यांना नेहमीच आपुलकीने समजावून सांगत स्वतःच्या कृतीने त्यांना कार्यप्रवृत्त करतात.जगणं असं कृतार्थ होण्यासाठी बिनचूक पणाचा अट्टाहास नव्हे तर असोशी आवश्यक असते!

विद्यार्थीदशेतील प्रत्येकाचीच वाटचाल ‘चूक की बरोबर?’ या प्रश्नाशीच बांधलेली असते. तिथे परीक्षेत येऊ शकणारे ‘अपेक्षित प्रश्न’ जसे सहज उपलब्ध होऊ शकतात, तशीच त्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे इन्स्टंट पुरवणारी गाईडसही. आयुष्यातल्या जगण्याच्या वाटचालीत मात्र निर्माण होणारे असंख्य प्रश्न बऱ्याचदा अनपेक्षित असतात. त्या प्रश्नांचे नेमके आकलन आणि आपण शोधलेल्या त्या प्रश्नांच्या उत्तरांचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणाम याचा सारासार विचार करूनच त्या प्रश्नांची उत्तरे ठरवावी लागतात. अर्थातच ही उत्तरे निर्णयप्रक्रियेतूनच तयार होत असल्याने त्या उत्तरांची बिनचूकता हे ज्याच्या त्याच्या निर्णयक्षमतेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणजेच बिनचूक निर्णय घेणे हेही कामातील बिनचूकपणा आणि प्रश्नांची बिनचूक उत्तरे देण्याइतकेच महत्त्वाचे असते. अचूक निर्णय घेण्याची निर्णयक्षमतासुध्दा ‘बिनचूक’ या शब्दाने अशी गृहित धरलेली आहे. निर्णयक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी स्वयंशिस्त, परिस्थितीचे अचूक आकलन आणि प्रत्येक प्रश्नाकडे पहाण्याचा ति-हाईत दृष्टीकोन हे घटक महत्त्वाचे ठरतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी या ना त्या कारणाने निर्णय घ्यायची वेळ येतच असते. अशा प्रत्येकवेळी दुसऱ्यावर अवलंबून न रहाता ते निर्णय ज्याचे त्यालाच घ्यावे लागतात. तत्काळ निर्णय घ्यायची अशी कसोटी पहाणारी वेळ अचानक पुढे येऊन ठेपण्याची शक्यता अपवादात्मक नसतेच. अशावेळी कोणताही निर्णय घेताना मनात चलबिचल असेल तर ती निर्णय प्रक्रियेसाठी घातक ठरु शकते. काहीवेळा सखोल विचार न करता आतयायीपणाने निर्णय घेतले जातात. असे निर्णय चुकीचे तर ठरतातच शिवाय ते नवे प्रश्न निर्माण करायला निमित्तही ठरत असतात.त्यासाठीच अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन आणि सारासार विचार हे घटक महत्त्वाचे ठरतात. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रयत्नपूर्वक सरावाने प्राप्त करणे मग फारसे अशक्य रहात नाही.

आपल्या आयुष्यात निर्माण होणारं दु:ख असो किंवा असमाधान हा बऱ्याचदा आपण स्वतःच त्या त्या वेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचाच परिपाक असतो.त्यामुळे अचूक निर्णयक्षमतेचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही.

सारांश हाच की बिनचूकपणा अंगी बाणवणे हे मनापासून स्विकारलेले साध्य आणि त्यासाठी कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही साधना जगणं आनंदी आणि कृतार्थ होण्यासाठी अपरिहार्यच ठरते !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments