डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 20 – महासमाधी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्रनाथ यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला होता. श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद घडवित होते. नरेंद्रनाथांच्या प्रापंचिक अडचणी हळूहळू कमी होत होत्या. पुस्तकाची भाषांतरे आणि काही काळ नोकरी करून ते आर्थिक बाजू सावरत होते. एव्हाना १८८३-८४ या काळात श्रीरामकृष्ण कलकत्त्यातील सर्वांच्या परिचयाचे झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि उपदेश ऐकण्यासाठी झुंडीच्या झुंडी येत असत लोकांच्या,

विसाव्या शतकातील एक आदर्शाचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण समजले जात. म्हणूनच संन्यासीश्रेष्ठ स्वामी विवेकानंदानी समस्त समाजाला घनगंभीर आवाजात ऐकविले होते, “जर तुम्हाला डोळे असतील तरच तुम्ही पाहू शकाल. जर तुमच्या हृदयाचे दार उघडे असेल तरच तुम्हाला ते जाणवू शकेल. ज्याला समयाची लक्षणे, काळाची चिन्हे दिसू शकत नाहीत, समजू शकत नाहीत, तो अंध, जन्मांधच म्हटलं पाहिजे. दिसत नाही की काय, दरिद्री ब्राम्हण आईबापाच्या पोटी एका लहानशा खेड्यात, जन्मलेल्या या मुलाची आज तेच सारे देश, अक्षरश: पूजा करीत आहेत. की जे शतकानुशतके मूर्तिपूजेविरुद्ध सारखी ओरड करीत आले आहेत”.

नरेंद्रनाथांना देवदेवतांची दर्शने होत होती. पण ही सगळी साकार रुपे होती. त्यात त्याचे समाधान होत नव्हते. अद्वैताचा अनुभव देणारी निर्विकल्प समाधी त्यांना हवी होती. ज्ञान, साधना आणि गुरूंचे समर्थ मार्गदर्शन यांच्यामुळे नरेंद्रनाथांनी अनेक वेळा आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला. निर्विकल्प समाधीचा अनुभव पण त्यांनी घेतला.

१८८६ मध्ये ,या सगळ्या काळात श्रीरामकृष्ण यांची तब्येत बिघडली. घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. उपचारासाठी कलकत्ता आणि नंतर काशीपूर मध्ये एक घर घेऊन तिथे उपचारासाठी त्यांना ठेवण्यात आले. सर्व भक्त मंडळी चिंतेत होती. श्रीरामकृष्णांच्या सेवा सुश्रुशेचा बंदोबस्त, त्यांची निगा राखणे यासाठी नरेंद्र नाथांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि घर सोडून श्रीरामकृष्ण यांच्या सेवेसाठी काशीपूरला येऊन राहिले जेणे करून चोवीस तास सेवा करता येईल.

इतर भक्त पण येऊन राहत असत. हे घर आता नुसते निवास न राहता तो एक मठ आणि विश्वविद्यालय होऊन बसले होते. भक्तगण साधना, निरनिराळ्या शास्त्रांचे पठण करत. रामकृष्ण यांच्या सेवेच्या निमित्ताने सर्व भक्त एकत्र राहत असल्याने सर्वजण एका आध्यात्मिक प्रेमबंधाने एकमेकांशी जोडले गेले. इथेच भावी श्रीरामकृष्ण संघाची मुहुर्तमेढ रोवली गेली म्हटले तरी चालेल. शुभ दिवस पाहून श्री रामकृष्ण यांनी सर्व कुमार शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास देण्याचा संकल्प केला. 

गुरूंचा आजार बळावला होता. श्री रामकृष्ण यांच्या अखेरच्या दिवसातले त्यांचे उद्गार, लौकिक-अलौकिक, पार्थिव-अपार्थिव, क्षणिक-चिरंतन अशा दोन्ही बाजूंची स्पष्टता करणारे होते. मात्र हे जग सोडून जातांना आपला अनमोल वारसा कोणाकडे सोपवून जायचा, तो जपता यावा म्हणून त्याच्या मनाची कशी सिद्धता करायची याचा विचार शेवटपर्यंत त्यांच्या मनात असे.

अशा परिस्थितीतही सदासर्वकाळ ते बालक भक्तांना उपदेश देण्यात दंग असत. कधी नरेंद्रनाथांना जवळ बोलवून सांगत, “नरेन ही सारी मुले मागे राहिलीत. तू या सार्‍यापरिस बुद्धीमान आणि शक्तिमान आहेस. तूच त्यांच्याकडे पहा. त्यांना सन्मार्गाने ने. हे सारे आध्यात्मिक जीवन घालवतील. यातला कुणी घरी जाऊन संसारात गुंतणार नाही असे पहा. मी आता लवकरच देह सोडीन. त्यांच्या वारसदारांच्या अग्रणी नरेंद्र च होता. ‘नरेंद्र हा तुमचा नेता आहे’ असे रामकृष्ण शिष्यांनाही सांगीत.

महासमाधीच्या तीन-चार दिवस आधी, श्री रामकृष्णांनी नरेंद्रला आपल्या खोलीत बोलावले, आपली दृष्टी त्यांच्यावर स्थिर केली. आणि ते समाधीत मग्न झाले. जणू एखादा विजेचा प्रवाह आपल्या शरीरात शिरतो आहे, असा भास नरेंद्रला झाला. त्याचे बाह्य विश्वाचे ज्ञान नष्ट झाले. पुन्हा भानावर आल्यावर पाहतो तो, श्री रामकृष्णांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या आहेत. काय झालं असे नरेंद्र नाथांनी विचारताच, रामकृष्ण म्हणाले, “नरेन माझ्याजवळ जे काही होतं, ते सारं मी तुला आज देऊन टाकलं आणि आता मी केवळ एक फकीर झालो आहे. माझ्याजवळ दमडी देखील उरलेली नाही. मी ज्या शक्ति तुला दिलेल्या आहेत,त्यांच्या बळावर तू महान कार्य करशील आणि ते पुरं झाल्यावर तू जिथनं आला आहेस तिथं परत जाशील”.

 शेवटी शेवटी क्षणाक्षणाला त्यांच्या वेदना वाढत होत्या. कोणत्याही औषधाचा काहीच उपयोग होत नव्हता. श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तेव्हढ्यात त्यांची समाधी लागली. नरेंद्रनाथांच्या सांगण्यावरून नरेंद्रसहित सर्वांनी, ‘हरी ओम तत्सत’ चा घनगंभीर आवाजात गजर सुरू केला. काही क्षण भानावर येऊन त्यांनी नरेंद्रला अखेरचे काहीतरी सांगीतले आणि कालीमातेचे नाव घेऊन शरीर मागे टेकवले. त्यांच्या चेहर्‍यावर एक ईश्वरी हास्य होते आणि ते अखेरच्या समाधीत गेले होते. त्यांनी पार्थिव शरीराचा त्याग केला. शिष्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. त्यांच्या जीवनातला चालता बोलता प्रकाश हरपला होता. महासमाधी ! 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments