श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  लागेबांधे ☆ श्री अरविंद लिमये ☆

वेळा सांगून येत नाहीत असं म्हणतात. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण, सुखद असो वा दु:खद तो स्थितप्रज्ञतेने स्विकारावा असं म्हणतात. पण ते शक्य होतंच असं नाही. बर्याचदा नाहीच होत. क्षण दु:खाचा, संकटाचा असेल तर नाहीच. अशीच एखादी अप्रिय घटना पुढे येणार्या संकटातलं गांभिर्य कमी करायला निमित्तही ठरु शकते. नव्हे नियतीनेच या घटनांमागचा कार्यकारणभाव नियत केलेला असतो. फक्त ते आपल्याला माहित नसतं एवढंच. पण समजतं, तेव्हा मनाला होणारा  दिलाशाचा स्पर्श,  अंगाची लाहीलाही करणार्या, असह्य

चटके देणार्या उन्हात अचानक थंड गारव्याचा शिडकावा करणार्या ओलसर काळ्या ढगासारखा सुखद भासतो. त्याचीच ही गोष्ट!

२०१६ मधे आम्ही पुण्याच्या  ‘क्वेस्ट टूर्स ‘तर्फे’ सेव्हन सिस्टर्स’

टूरला गेलो होतो. आसाम, मेघालय, अरुणाचल करुन आमचा मुक्काम काझीरंगा अभयारण्याजवळच्या एका लाॅजवर होता. टूरचे अकरा दिवस मजेत गेले होते. चाळीस जणांचा मोठा ग्रूप, पण प्रत्येकाला नावाने ओळखण्याइतका जवळ आलेला. आता नागालॅंड,  मणिपूर, त्रिपुरा होईपर्यंत ओळखी अधिक घट्ट होण्यापूर्वीच ती अप्रिय घटना घडली. त्यामुळे आम्ही जवळ आलो खरे पण असे ‘समदु:खी’ म्हणून. . !

कारण काझीरंगाला दुपारचं जेवण आवरुन आम्ही नागालॅंडसाठी प्रस्थान ठेवलं ती अनपेक्षित अरिष्टाची सुरुवात होती. आम्ही हास्यविनोद,

गप्पा, गाणी यात सर्वजण दंग असणातानाच नागालॅंड बाॅर्डरच्या खूप आधीच एका चेकपोस्टजवळ आमच्या गाड्या अडवण्यात आल्या. टूर मॅनेजर आणि ड्रायव्हर काय झालंय ते पहायला खाली उतरले आणि हताश होऊन परत आले. नागालॅंड बाॅर्डरपासून आत सर्वदूरपर्यंत सशस्त्रपोलिसांचा बंदोबस्त होता. अचानक सुरु झालेल्या आंदोलनाने उग्ररुप धारण केले होते. त्याच दरम्यान एके ठिकाणी बाॅंम्बस्फोट होताच १४४ कलम लागू केले होते. यामुळे पुढे जाणं

शक्यच नव्हते आम्ही पुन्हा मागे फिरुन काझीरंगाच्या त्याच लाॅजवर आश्रयाला आलो. टूरचा मनसोक्त आनंद घेत

असतानाच दूधात मिठाचा खडा पडावा तसं झाल़ं न् सगळ्यांचा आनंद विरजून गेला. इतर सर्वजण अगदी माझी पत्नीसुध्दा स्वत:चं वैषम्य लपवू शकले नव्हते पण मी मात्र स्वस्थचित्त होतो. त्यामागचं खरं कारण जाणवायला पुढे पुलाखालून बरंच पाणी जायला हवं होतं. पण त्याक्षणी मात्र आमच्यापेक्षाही कितीतरी पटीने टूर मॅनेजरच्यासमोर असंख्य प्रश्न आ वासून उभे असल्याचे मला जाणवले. विचार करण्यात वेळ न घालवता त्याने सगळी सूत्रे तत्परतेने हलवायला सुरुवात केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्वेस्टच्या मॅनेजमेंटशी त्वरीत संपर्क साधला. सविस्तर चर्चा करुन टूर पॅकअप करायचा निर्णय घेतला. अशा अपरिहार्य कारणाने

टूर अर्धवट सोडायला लागली तर करारानुसार टूरकंपनी पैसे परत करायला बांधील नसते. तरीही कंपनीमार्फत आम्हा सर्वांची परतीची मूळ रिझर्वेशन्स कॅन्सल करुन कंपनीखर्चाने लगेचची रिझर्वेशन्स लगोलग करुन दिली गेली आणि हिशोबाने होईल ती बाकी रक्कम प्रत्येकाच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्याचे आश्वासन दिले. (आणि नंतर ते पाळलेही!)

परतीच्या प्रवासासाठी निरोप घेताना, आनंदाऐवजी असा

विरसच सर्व प्रवाशांच्या मनात होता. अर्थात हे अपरिहार्यही होतंच. म्हणूनच सर्वानी मनाविरुध्द का होईना ते स्विकारलंही.

परतीचा प्रवास सुरु झाला, तरी आरती, माझी पत्नी मात्र गप्पगप्पच होती. तिला बोलतं केलं, तर विषय तोच.

“खूप आधीपासून प्लॅनिंग करुन, एडवांस बुकिंग करुनसुध्दा काय झालं ते पाहिलंत ना?”ती म्हणाली.

“आपण नागालॅंडच्या लाॅजवर चेक इन केल्यानंतर कर्फ्यू लागला असता तर काय करणार होतो आपण?उरलेले दिवस आणि पैसे सगळंच फुकट गेलं असतं आणि आपण पुन्हा अधांतरीच. आत्ता आपण सुखरुप आहोत आणि मार्गीही लागलोय हे महत्वाचं. . “स्वत:चीच समजूत काढल्यासारखं मी बोललो तरी ते खरंही होतंच. पण नियतीने माझ्यापुरता नियत केलेला या घटनेमागचा नेमका कार्यकारणभाव मलातरी तेव्हा कुठे माहित होता?

आम्ही दोघे अकल्पितपणे खूप दिवस आधीच परत आल्याचं पाहून आमच्या दोन चिमुरड्या नातींच्या उत्साहाला तर उधाणच आलं. त्यांच्या त्या बालसुलभ उत्साहात आमचं ट्रीप अर्धवट राहिल्याचं दु:ख नकळत विरुन गेलं. चहापाणी, बॅगा आवरणं, आणि ट्रीपमधे आलेल्या अडचणीबद्दल सविस्तर सगळं सांगणं यात रात्रीची जेवणंही आवरत आली. गप्पात सून भाग घेत असली तरी नेहमीसारखी मोकळी वाटत नव्हती आणि सलील, माझा मुलगा कांहीसा गंभीर. माझं जेवण झालं तसं तो जवळ येऊन बसला.

“बाबा, तुम्ही टेन्शन घेणार नसाल तर एक सांगायचं होतं. ”

“बोल ना, काय झालंय?”

“उदयदादाचा काल कोल्हापूरहून फोन आला होता. पुष्पाआत्याबद्दल”

“तिचं काय?”मी मनोमन चरकलो होतोच. माझ्या आवाजातली थरथर त्यालाही जाणवली असणाराच. . .

ती माझी मोठी बहीण. आम्हा लहान भावंडांसाठी तिने खाल्लेल्या खस्तांवरच तर आमचं स्थैर्य उभं राहू शकलं होतं. तरीही स्वत: कांही केल्याचा टेंभा कधी मिरवला नाहीन. उलट आमच्या लहानसहान गोष्टींचंही कौतुक मात्र उदंड. अतिशय मितभाषी, हसतमुख. माझ्या तर विशेष जवळची. तिला कांही झालं असल्याच्या कल्पनेनेच मी कासावीस झालो.

“तुम्ही ट्रीपला गेला होतात.  तुम्ही तिकडे काळजी करीत रहाल म्हणून तुम्हाला फोन न

करता त्याने काल मला कळवलं होतं. ”

“झालंय काय पण?”

“आत्याच्या डाव्या हाताचं बोट खूप दिवसांपासून दुखत होतं म्हणे. आधी तिने फार लक्ष दिलं नव्हतं. बोटाला थोडी सूज जाणवली तेव्हा मग डाॅ. ना दाखवलं. बरेच दिवस औषध घेऊनही फरक पडेना म्हणून आर्थोपेडिकना दाखवलं.  एक्सरेमधे बोटाच्या हाडाला इन्फेक्शन झाल्याचं दिसून झा्

आलं. आठ दिवसांच्या अॅंटिबायोटीक्सनंतरही सूज वाढलीच. आता बोटाच्या हाडाचा भूगा होऊन इन्फेक्शन वाढत चालल्याने इतर बोटाना त्रास नको म्हणून बोट कापायचं ठरलंय.  दादाने दुसर्या आर्थोपेडिकचं सेकंड ओपिनीयनही घेतलंय आणि दोन दिवसानी सोमवारी आॅपरेशन करायचं ठरलंय. “ऐकता ऐकता मी गंभीर झाल्याचं पाहून सलिल बोलायचं थांबला क्षणभर.

“बाबा, आत्ता नऊच तर वाजलेत.  तुम्ही फोन करता का आत्याला? बोला तिच्याशी. म्हणजे तिला न् तुम्हाला दोघानाही बरं वाटेल. “मी मानेनेच नको म्हंटलं.  “मी उद्या कोल्हापूरला जाऊन येतो. समक्षच भेटतो. त्याशिवाय मलाच चैन पडणार नाही. . “मी शांतपणे सांगितलं खरं, पण ती शांतता वरवरचीच होती. आतून मात्र मी तिळतिळ तुटत होतो. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता.  माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या,  माझ्यावर उदंड प्रेम करणार्या माझ्या ताईचं माझ्या आयुष्यातल़ं नेमकं स्थान ती संकटात असल्याचं कळल्यानंतर असं

जाणवलं आणि हतबल मी कासावीस होत कूस बदलत राहिलो. तिचं हे दुखणं काय किंवा आॅपरेशनचा निर्णय काय, तिने नेहमीच्याच सहनशीलतेने आणि धिरोदात्तपणे स्विकारला असेलही कदाचित, पण मलाच ते स्विकारता येईना. ट्रीप अर्धवट सोडून यावं लागल्याने मला आधी समजलं तरी. आणखी दोन आठवड्यांनी आलो असतो तर तिचा बोट कापलेला हातच पहावा लागला असता. नुसत्या कल्पनेनेच अंगावर सरसरुन काटाच आला. पण मला आधी समजून तरी उपयोग काय?तिचं बोट मी वाचवू शकणाराय थोडाच?माझ्या हतबलतेने मी अधिकच अस्वस्थ झालो. उलटसुलट विचारांच्या ग्लानीत तरंगत असतानाच माझ्या

मिटू लागलेल्या नजरेसमोर

सांगलीच्याच डाॅ. परांजपेंचा मला आश्वस्त करणारा चेहरा तरळून गेल्याचा भास मला झाला आणि त्याच ग्लानीत झोप कधी लागली समजलंच नाही. सकाळी उशीरा जाग येत असतानाच नजरेसमोर तरळून गेलेला तो चेहरा आठवला न् मी कांहीतरी सापडल्याच्या आनंदाने  ताडकन् उठून बसलो.  मी सावरलोय हे पाहूनसलिललाही बरं वाटलं.

“लगेच चहा घेऊन आवरताय का?कोल्हापूरला जाऊन येऊ लगेच. “ही म्हणाली.

“नाही. . नको. दुपारनंतरच निघू म्हणजे तिचाही आराम होईल. “मी म्हणालो. सकाळी लवकरची अपाॅईंटमेंट घेऊन डाॅ. परांजपेना भेटलो. ताईच्या तक्रारीबद्दल सविस्तर कल्पना दिली.

“मला जखम बघावी लागेल. सगळे रिपोर्टसुध्दा. मगच कांही सांगता येईल. “डाॅ. म्हणाले आणि ते योग्यही होतंच.

“पण आज शनिवार. मी दुपारनंतर तिला भेटायला जाणाराय. तिला आणायचं म्हंटल़ं तर उद्या रविवार. सोमवारी तर ऑपरेशन होणाराय. ”

डाॅ. आमच्या घराजवळच रहातात. त्यामुळे त्यानी रविवारी घरी आलात तरी चालेल असं सांगितलं. मला तर तो शुभशकुनच वाटला.

दुपारच्या कोल्हापूरच्या भेटीत सविस्तर चर्चा झाली. माझ्या आग्रहाखातर त्यांनी डाॅ. परांजपेना भेटायची तयारी दाखवली. दुसर्या दिवशी माझा भाचा न् सून ताईला कारने घेऊन आले. जखम पाहून त्यानी सगळे रिपोर्टस् नजरेखालून घातले. ते काय बोलणार याची जीवाचे कान करुन वाट मी पहात राहिलो.

“बोट वाचेल. पण आत्ता १००% खात्री देत नाही. आत्ता फक्त ८०%. बाकी २०% माझी औषधं सुरू झाल्यानंतर मिळणार्या प्रतिसादावर अवलंबून असेल. तरीही तुमच्या आर्थोपेडिकना विश्वासात घेऊन हे सगळं सांगा. मला खात्री आहे, आॅपरेशन पुढे ढकलायला ते विरोध नाही करायचे. ”

डाॅ. परांजपेनी स्वत: तयार केलेलं एक विशिष्ठ तेल रोज बोटाला मसाज करण्यासाठी दिलं. ड्रेसिंग करायची न् मसाज करायची पध्दत, औषधाच्या गोळ्या घ्यायच्या वेळा, सगळं समजावून सांगितलं. ताईच्या सूनेनं ती सगळी जबाबदारी मनापासून स्विकारली आणि पारही पाडली. पुढे जवळजवळ सहा महिने हे प्रोसेस सुरु होतं. कणाकणानं सुधारणा होत अखेर बोट वाचलं. . !

त्यानंतरच्या प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबिजेला जेव्हा ताई मला ओवाळते तेव्हा त्या निरांजनांच्या प्रकाशात माझ्याही नकळत माझी नजर तिच्या हातातल्या तबकाखाली लपलेल्या त्या बोटाचा वेध घेत रहाते. . !

या घटनेनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय पण ही आठवण मात्र वाहून नाही गेली. जाणं शक्यही नाही. ट्रीप अर्धवट राहून परत यावं लागण्यात माझ्या न् ताईच्या लागाबांध्यातला एक हळवा धागा नियतीने असा अलगद गु़ंफलेला होता या  जाणिवेच्या दिलासा देणार्या गारव्याने मनाला मिळणारं अनोखं समाधान कधीच न विरणारं आहे. . . !

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments