डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  पु. ल.देशपांडे ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

“क्रियापदाचे मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे आहे त्याच्यावर अवलंबून असते.”

हे वाक्य ज्या कर्तृत्ववान कर्त्याने उच्चारले त्याचे स्वतःचेच कर्तृत्व इतके महान आहे की अवघ्या काही मिनिटात त्याच्यातील व्यक्तीचीच काय पण वल्लीचाही परिचय करुन देणे म्हणजे ‛नस्ती उठाठेव’ करण्यासारखे आहे.

पु. ल., पी.एल्. किंवा भाई या संबोधनाने जी व्यक्ती ओळखली जाते ती म्हणजे महाराष्ट्राचे कोट्याधीश ‛पु. ल. देशपांडे.’! त्यांची जन्मशताब्दी या वर्षात आपण साजरी करत आहोत.

कोट्याधीश या उपाधीबद्दल एकदा पुलना विचारले असता ते म्हणाले,“विनोद हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि विनोदनिर्मिती होते.” याच विसंगतीतून त्यांनी विनोदी लेखन, नाटके, चित्रपटांसाठी पटकथा – संवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांची ‛पुरचुंडी’ आपल्या गाठीशी बांधली.

अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, विठ्ठल तो आला आला सारखी नाटके, अपूर्वाई-पूर्वरंग सारखी प्रवासवर्णने, असा मी असामी, बटाट्याची चाळ, हासवणूक, मराठी वाङ्मयाचा ( गाळीव) इतिहास अशी ‛अघळपघळ’ लेखननिर्मिती केली.

१९५६-५७ या कालखंडात त्यांनी नभोवाणी- आकाशवाणीसाठीसुद्धा काम केले. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये नोकरी केली.

आता ‛उरलंसुरलं’ क्षेत्र म्हणजे संगीत! त्याची तर भाईंना आधीच उत्तम जाण आणि ज्ञान असल्याने संगीतकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटगीतांना संगीत दिले . ‛देवबाप्पा’ चित्रपटातील ‘ नाच रे मोरा’ हे गाणे आजही अनेकांच्या बालपणातील स्मृती चाळवते. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे तर भाई सबकुछ होते.कथा-पटकथा-संवाद-संगीत आणि अभिनयसुद्धा!

आयुष्यातील विसंगतीची ‛खिल्ली’ उडवतानाच समाजातील विसंगती नष्ट करण्याचा त्यांनी अंशतः प्रयत्न केला.सक्रिय शक्य नसले तरी अनिल अवचट यांच्या ‛ मुक्तांगण’ व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या ‛निहार’ या संस्थेला भरभरुन आर्थिक सहकार्य दिले. हे ‛गणगोत’ मात्र त्यांनी काळजापासून जपले. म्हणूनच मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात-

“ रोज आठवण यावी असं काही नाही

रोज भेट व्हावी असंही काही नाही

पण मी तुला विसरणार नाही

ही झाली खात्री

आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री

शेवटी काय हो,

भेटी झाल्या नाहीत तरी

गाठी बसणं महत्वाचं !”

हीच गाठ भाई तुम्ही आम्हा रसिकजनांच्या हृदयात इतकी घट्ट मारली आहेत की ‛ काय वाट्टेल ते होईल’ पण ‘पु.ल.- एक साठवण’ ची आठवण पिढ्यान् पिढ्या कायम राहील.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

व्यक्तीतील वल्लीचा नेमका परिचय.