⭐ विविधा ⭐

⭐ नवरात्र उत्सव ⭐  प्रा. विजय जंगम⭐ 

भारतीय वर्षा मधील नवरात्र उत्सव…  दसरा..हा सण विशेष महत्वाचा सण समजला जातो. आपला देश शेतीप्रधान देश या नावाने ओळखला जातो. म्हणून , आपली भारतीय संस्कृती ही शेती प्रधान संस्कृती समजली जाते. त्यामुळे आपण जे सण साजरे करतो,  त्या सणांच्या मूळाशी प्रामुख्यानं पर्यावरण, निसर्ग आणि हवामानाचा विचार केलेला आहे. या व्यतिरिक्त हे सण कोणत्या तरी पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक कथांशी , विचारांशी जोडलेले असल्याने ,ते साजरे करण्यामागे पारंपरिक श्रध्दा निर्माण झालेली आहे. म्हणूनच या सणांची आपणाला आपूर्वाई असते.

काल पासून सुरू झालेला नवरात्र उत्सव हा या सगळ्यांचंच प्रतिक आहे. हा उत्सव प्रामुख्याने स्त्री शक्तीची थोरवी सांगणारा आहे. महिषासुराशी नव दिवस युद्ध करून त्याचं मर्दन करणारी देवी ही साक्षात किती सबला आहे , याचं उदाहरण तमाम स्त्री वर्गाला प्रेरणादायी ठरेल याची खबरदारी आपल्या पूर्वजांनी घेतली आहे.

हा सण साजरा करताना , निसर्गाला किती प्रमाण मानले आहे , हेही आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर आप ,तेज ,वायू , आकाश आणि अग्नी या पंचमहाभूतांचाही किती खुबीने वापर केला आहे हे सुद्धा समजून येते.

नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते. हा घट म्हणजेच आकाश तत्व आहे. त्या घटात पाणी भरून ठेवले जाते .ते जल तत्व.घटा खाली काळी माती पसरली जाते .ते भूमी तत्व . त्या मातीत धान्य टोकलं जातं . तो त्या भूमीचा रजोगुण . नवरात्रात अखंड नंदादीप तेवत असतो. ते अग्नी तत्व. त्या घाटावर पिवळ्या फुलांची माळ रोज वाहिली जाते. पिवळा रंग हा रजोगुण आहे.

अशी नव दिवस पुजा करून , खंडे नवमीला शस्त्रांची म्हणजेच शेती अवजारांची पूजा केली जाते.शेवटी दशमीला शमी वृक्षाची , म्हणजेच आपट्यांची पानं सोन्याच्या मोलानं वाटली जातात. एका वृक्षाच्या पानांनां सोन्याची किंमत देणारा भारत देश जगात एकमेव देश असावा. आणि त्या देशात साजरे केले जात असलेले सणही त्याच किंमतीचे असावेत ,यात शंकाच नाही.

 

© प्रा. विजय जंगम

सांगली 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments