श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ देवाणघेवाण… ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्द म्हणजे भाषेचं वैभव!भाषेचे अलंकार! या अलंकारांचं रंगरुप,कस,त्यांची जडणघडण भाषेचं मोल वाढवतात.भाषा लवचिक आणि सुंदर बनवतात.भाषेचं हे रंगरुप,सौंदर्य शब्दांच्या विविध रंगछटांवरच अवलंबून असतं.

कांही शब्द परस्परभिन्न अर्थ लेवूनच तयार झालेले असतात. रूप तेच पण अर्थरंग मात्र अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेले.

अशाच काही शब्दांपैकी ‘वाण’ हा शब्द.’ मूर्ती लहान पण किर्ती महान ‘ ही म्हण चपखलपणे लागू पडावी असा हा अगदी छोटा दोन अक्षरी शब्द ! वाण या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आणि त्या प्रत्येक अर्थात लपलेल्या असंख्य अर्थकळा पाहिल्या की ‘भाषेचे सौंदर्य शब्दांमुळे खुलते’ हे सहज पटावे.

‘वाण’ म्हणजे अभाव. कमतरता. ‘येथे कशालाच वाण नाही’ म्हणजे सगळे उदंड आहे. कशाचंच दुर्भिक्ष,कमतरता, अभाव नाही. अभावाला एक प्रकारचे रितेपण,पोकळी, उणेपणा, हेच अपेक्षित आहे.या अर्थाने वाण हा शब्द कसर, चणचण, ददात, वानवा, अनुपलब्धता असं बरच कांही सामावून घेतो.

‘वाण’ म्हणजे ‘रंग’ सुध्दा. फक्त दृश्यरुपातले रंग नाही,तर व्यक्तिमत्त्वातले गुणदोष स्वभावरंगही.’गुण नाही पण वाण लागला’ या म्हणीत अंतर्भूत असलेला ‘रंग’ इथे अभिप्रेत आहे.

‘वाण’ म्हणजे नमुना. झलक, वानगी,म्हणजेच उदाहरण! याचं व्यवहारातलं एक उदाहरण म्हणजे धान्याचे दुकान! तिथे दर्शनी भागात लहान लहान वाडग्यात तांदूळ, गहू , डाळी, यांचे विविध नमुने म्हणजेच ‘वाण’ ठेवलेले असतात. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करावी तसे त्या त्या धान्याचे ते वाण पाहून, तपासून कोणत्या प्रकारचे धान्य खरेदी करायचे याचा निर्णय घेणे सोपे जावे हा यामागचा उद्देश असतो.

‘वाण’ आणि ‘वसा’ या दोन शब्दांच्या संयुक्तरूपातून तयार होणारा ‘वाणवसा’ हा एक शब्द. वाणवसा म्हणजे ‘व्रत’. नित्यनेम म्हणून स्वीकारलेला एक आचार नियम!

वाण या शब्दाचा ‘घरी लागणारे किराणा सामान’ असाही एक अर्थ ‘वाणसामान’ या शब्दद्वयातून ध्वनीत होतो खरा पण मला तरी ‘वाणसामान’ हा शब्द वाण नव्हे तर ‘वाणी’ या शब्दाशी संबंधित असावा असे वाटते.वाणी म्हणजे दुकानदार. ‘वाण्याकडून आणावयाचे सामान’ ते वाणसामान या अर्थी हा शब्द बोलीभाषेतून तयार झालेला असावा आणि म्हणूनच वाण या शब्दाशी त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसावा असे वाटते.

‘वाण’ या शब्दाचा आणखी एक पूर्णपणे वेगळा अर्थ म्हणजे आहेर. आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक प्रथा-परंपरा माणसं जोडणाऱ्या आहेत. वाण देण्याची प्रथा ही त्यातलीच एक. ‘आहेर’ या शब्दाला भेट, उपहार, भेटवस्तू ,नजराणा, मानपान, शिष्टाचार, चोळी-बांगडी, घरचा आहेर असे अनेक कंगोरे आहेत.तसाच आहेर या शब्दाचा ‘वाण’ हा एक वेगळाच कंगोरा.एक अनोखा पैलू.वाण या शब्दात कोणत्याही विविध प्रसंगी दिलेले सगळ्याच प्रकारचे आहेर समाविष्ट होत नाहीत. लग्नमुंजीसारख्या समारंभात दिली जाणारी भेट किंवा भेटवस्तू म्हणजे आहेर.पण असे आहेर म्हणजे वाण नव्हे. काही विशिष्ट परंपरांमधील आहेरच ‘वाण’ म्हणून ओळखले जातात.’अधिक महिन्या’मधे जावयाला सन्मानाने दिला जाणारा आहेर म्हणजे अधिक महिन्याचं ‘वाण’. संक्रांतीचं वाण म्हणजे संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभात सुवासिनींना दिलेल्या नित्योपयोगी भेटवस्तू. या संक्रांतीच्या वाणाला ‘वस्तू लुटणं’ असंही म्हणतात. का माहित नाही. कदाचित ‘लयलूट’ याअर्थी असेल का?

वाण हा आपल्या      परंपरांमधला अतिशय मोलाचा सांस्कृतिक ठेवाच म्हणायला हवा. इथे वाण म्हणजे प्रेम,सन्मान, आपुलकी,सदिच्छा यांचे प्रतीक म्हणून दिला जाणारा आहेर.

भारतीय संस्कृतीत परस्परांमधील आपुलकीच्या  स्नेहबंधांसाठी ‘देवाणघेवाण’ अपेक्षित आहे. देवाण-घेवाण या शब्दातही ‘वाण’ हा शब्दही अंशरुपाने असणे हा निव्वळ योगायोग नसावा. आपल्या संस्कृतीत अपेक्षित असलेल्या प्रेम,आपुलकीची ‘देवाण-घेवाण’ काळानुरुप रितीभाती  बदलल्या तरी आपण विसरू नये एवढेच !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments