श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ५७ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – जगायचं कसं आणि कशासाठी हे शिकवणारे हे दोन्ही प्रसंग माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. ताई गेली तो दिवस होता १ मे १९९९. आज २५ वर्षं उलटून गेल्यानंतरही नुकतेच घडल्यासारखे ते प्रसंग माझ्या मनात ताजे आहेत!)
ताई गेली ते विरहाच्या दुःखाबरोबरच गजानन महाराजांच्या सांत्वन करणाऱ्या आशीर्वादांचं अमूल्य दान आम्हा सर्वांच्या असं स्वाधीन करून! पण तरीही त्या क्षणापासून माझ्या मनाला मात्र एक रूखरूख लागून राहिली होती. काही केल्या तो सल कमी होत नव्हता. होय. अज्ञान आणि अहंकारापोटी माझ्या हातून गजानन महाराजांचा अक्षम्य अनादर झाल्याची ती बोच होती. ताई गेल्याच्या हतबल करणाऱ्या दु:खाच्या पार्श्वभूमीवर तर ती मला अधिकच बोचरी वाटत होती!
“कोण गं हे गजानन महाराज?” असं मी ताईला विचारलं होतं ती गोष्ट ताई आजारी पडण्यापूर्वीच्या कितीतरी वर्षं आधीची. त्यामुळे एरवी त्याचा ताईच्या आजारपणाशी आणि जाण्याशी तसा अर्थाअर्थी कांही संबंध जोडावा असं वाटलंही नसतं. पण गजानन महाराजांवरील अतूट श्रध्देपोटी, ताईनं स्वतःचा काडीमात्रही स्वार्थ नसलेलं असं पोटतिडकीनं त्यांच्याकडे कांहीतरी मागणं, केवळ आपल्या पश्चात आपल्या आजारपणामुळे नवऱ्याला सगळं कांही हरवून गेलेल्या निष्कांचन अवस्थेत परावलंबी आयुष्य जगण्याची वेळ येणाराय या कल्पनेने असहाय्य अशा मनोवस्थेत मनाला त्रास देत राहिलेली स्वत:ची ही कैफियत तिने बिनतोडपणे महाराजांपुढं मांडणं, आणि मुख्य म्हणजे त्याबदल्यात स्वतःचे भोग आणि असह्य वेदना आतल्याआत सहन करण्याची तयारी तिने दाखवणं आणि आश्चर्य म्हणजे महाराजांनीही तिला जे हवं ते असं राजमार्गानं तत्काळ देणं हे सगळंच मला हलवून जागं करणारंच ठरलं होतं. ताईला ‘कोण गं हे गजानन महाराज?’ असं मी विचारणं हे कुतुहलापोटी नव्हतं यांची बोचरी जाणीव मला ताई गेल्यानंतरच्या त्या अस्वस्थ मन:स्थितीतच झाली आणि सतत टोचतही राहिली. माझं विचारणं कुतूहलापोटी नव्हतंच. ताई माझ्याकडे दुर्लक्ष करून खूप वेळ ती पोथी वाचत बसली होती या रागापोटी आणि शिवाय ‘पूर्वापार आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा मार्ग सोडून ही अशी पोथी तिने कां वाचावी?’ या नकारात्मक विचारामुळे नकळत मनात उभारलेल्या अहंकारापोटीच मी तिला उपहासाने ‘ कोण गं हे गजानन महाराज?’ हा उर्मट प्रश्न विचारलेला होता. हेच जर केवळ अज्ञानापोटी, कांही नवीन जाणून घ्यायच्या उद्देशाने मी विचारलं असतं तर ताईने तेव्हाच मला खूप छान समजावून सांगितलं असतं. पण तो आनंद माझ्या नशिबात नव्हता हेच खरं. माझ्या विचारण्याचा रोख तिच्या लक्षात आला तेव्हा ती कांहीशा नाराजीनेच माझ्याकडे पाहून फक्त एकच वाक्य बोलली होती. ‘तू स्वतःच ही पोथी वाच एकदा, म्हणजे तुला समजेल हे गजानन महाराज कोण ते. ‘ ती म्हणाली होती !
ताई गेली आणि हा सगळा भूतकाळ आठवून मी स्वत:लाच कोसत राहिलो. माझ्या मनातला तो अहंकाराचा कणभर काटा मी अलगद उपटून फेकून दिला, तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अगदी ‘ती पोथी खरंच एकदा तरी वाचायलाच हवी’ असं मला उत्कटतेने वाटलं तरी त्यानंतरही माझं मन स्वस्थ नव्हतंच. ‘आपण स्वत: शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं, स्वत:ची चूक कबूल करून त्यांची क्षमा मागायची ‘, असं तीव्रतेने मनात आलं खरं पण ते तातडीने अंमलात आणणं जमणार नव्हतंच. कारण ताईच्या आजारपणात सलग बरेच दिवस मी रजेवर होतो. आता याक्षणी कर्तव्याला प्राधान्य देऊन लगोलग ऑफीस-ड्युटीवर हजर होणंच गरजेचं होतं. अर्थात मी हाच निर्णय अंमलात आणला खरा पण तो मात्र मनोमन गजानन महाराजांना साक्षी ठेवूनच. त्या रात्री मी देवापुढे बसून डोळे मिटले. हात जोडून महाराजांना प्रार्थना केली. मी तोवर कधी त्यांचा फोटोही पाहिलेला नव्हता. त्यामुळे मिटल्या नजरेसमोर महाराजांचं मूर्तरूपही नव्हतंच. त्यांच्या नावाच्या रूपातलं अमूर्त रूप होतं ते फक्त माझ्या अस्वस्थ अंत:करणात!
‘मला शेगावला येऊन आपलं दर्शन घ्यायचंय. अनवधानानं कां होईना माझ्या हातून घडलेल्या आपल्या अनादराबद्दल मला तिथं येऊन मनःपूर्वक आपली क्षमा मागायचीय. माझ्या हातून अल्पशी कां होईना आपली सेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. आपला आशीर्वाद असू दे. ‘
मी मनोमन अशी प्रार्थना केली तेव्हा कुठे मनातली रूखरूख थोडी कमी झाली.
त्या क्षणी मला हे माहितही नव्हतं की अचानक एखादं अस्मानी संकट यावं तशा अनेक अनपेक्षित घटना माझ्या सरळरेषेतल्या सुरळीत अशा बॅंकेतल्या नोकरीमधल्या तोवरच्या माझ्या दिनक्रमात अनेक अडथळे निर्माण करणार आहेत! आश्चर्य म्हणजे याचा प्रत्यय मला रजा संपून ऑफिसमधे जॉईन होताच लगेचच आला!
तेव्हा मी ऑडिट डिपार्टमेंटला होतो. ताईचं
दिवस-कार्य संपवून मी कामावर रुजू झालो त्याच दिवशी अहमदनगर ब्रॅंचमधे माझी ट्रान्सफर झाल्याचं आदेश-पत्र माझ्या हातात पडलं! तोवर सुरळीत चालू असलेल्या माझ्या रुटीनचा विचार केला तर त्याला अचानक मिळालेलं हे वळण माझ्यासाठी अनपेक्षित आणि कांहीसं अडचणीचंच ठरणारं होतं. अर्थात ऑडिट डिपार्टमेंटमधला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ उलटून गेलेला असल्याने तिथून बदली होणार होतीच पण ती इतक्या तातडीने आणि तेही अहमदनगरला होणं हे माझ्यासाठी फारच गैरसोयीचं ठरणार होतं. अर्थात रूटीनचाच हा एक अपरिहार्य भाग म्हणून ते स्विकारणंच आवश्यक होतं!
मी नगरला लगेचच जॉईन झालो आणि पहिल्याच दिवसापासून तिथे साचून राहिलेल्या पेंडिंग कामांच्या व्यापात गुंतून गेलो. पहिले मॅनेजर मी येण्यापूर्वी पंधरा दिवस आधीच अकौंटंटकडे चार्ज देऊन रिलिव्ह झालेले होते. त्यामुळे ब्रॅंचचं संपूर्ण काम विस्कळीत होऊन गेलेलं होतं. ते पंधरा दिवस श्वास घ्यायलाही फुरसत न मिळालेल्या अकौंटंटने मला पहाताच सुटकेच्या निश्वास सोडला आणि त्याच क्षणापासून माझी मात्र घुसमट सुरू झाली!
ताई गेल्याचं दु:ख मनात कोंडून तिथल्या नवीन चक्रांत अक्षरशः भिरभिरत राहिलो. तिथं बऱ्यापैकी बस्तान बसायलाच दोन तीन आठवडे उलटून जावे लागले. तोवर बाहेरचं जेवण, रात्रीची जागरणं, दिवसभरातली बँकेतल्या कामाची गडबड यातून घरगुती जेवणाची सोय बघायला थोडीही उसंत मिळाली नाही. नंतर तिथल्याच आमच्या एका स्टाफच्या ओळखीने घरगुती जेवणाचे डबे देणाऱ्या एका गरजू कुटुंबात माझी दोन्ही वेळच्या ताज्या जेवणाची अखेर सोय झाली. ही माझ्यासाठी एक सुखद घटनाच होती. त्या रात्री मी अंथरूणाला पाठ टेकली तो खूप दिवसांनंतर मला लाभलेला एक शांत, निवांत क्षण होता! त्या क्षणी ‘ शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची क्षमा मागण्याचा ‘ बरेच दिवस मनाच्या तळांत पडून राहिलेला विचार झेपावत वर आला. या विचाराचा स्पर्श झाला आणि कांहीतरी राहून गेल्याची रूखरूख मन अस्वस्थ करू लागली. अर्थात माझी इच्छा कितीही तीव्र असली, तरी माझी दैनंदिन कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांनाच प्राधान्य देणं सध्या आवश्यक आहे हे मीच मला समजावलं. ‘याबाबतीत जे करायचं ते महाराजच करून घेतील’ हा विश्वासच मनातला अंधार नाहीसा करणारा ठरला.
माझी जिथे घरगुती जेवणाची झालेली होती ते घर आणि त्या घराशी माझे जुळलेले भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्याक्षणी तरी मला कल्पना नव्हती!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈