श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ५४ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – आता प्रतीक्षा होती ती फक्त तिकडून येणाऱ्या फोनची!.. आणि त्यादिवशी फोनचा रिंगटोन वाजताच तिकडचाच फोन असणार ही खात्री असल्यासारखा मी फोनकडे धावलो…
फोन तिकडचाच होता… !
“मामाs.. मी अजित बोलतोय.. “
त्याच्या उत्तेजित झालेल्या स्वरांनी माझा थरकाप उडाला. त्याच्या आवाजातली थरथर मला स्पष्ट जाणवली आणि मी थिजून गेलो… त्याला ‘बोल’ म्हणायचं भानही हरवून बसलो. माझ्या थरथरणाऱ्या हातातला रिसिव्हर कसाबसा सावरत मी तसाच उभा होतो…. !)
” कुणाचा हो फोन?” बाहेर येत आरतीने विचारले.
“अजितचा.. ” मी कसंबसं एवढंच बोललो.
” हॅलो.. , मामाच ना… ? “अजितने अधिरतेने विचारलं.
” हो अजित… बोल. ” अखेर मी मन घट्ट केलं…
” मामा, एक खूsप आनंदाची बातमी आहे… “
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. दुःख आणि वेदनांशी सर्व पातळ्यांवर सतत प्रतिकार करीत थकून गेलेल्या माझ्या ताईच्या घरून आलेल्या फोनवर आनंदाची बातमी? किती विचित्र आणि तरीही हवासा वाटणारा विरोधाभास होता हा.. ! आता मात्र मला धीर धरवेना…
“आनंदाची बातमी.. ? काय रे.. ?”.. माझी उत्सुकता शिगेला पोचली.
“ओळख बघू. तू ओळखूच शकणार नाहीस.. ” अजित म्हणाला. मला कांंही सुचेचना. तरीपण बातमी कांहीही असली तरी ती ताईच्या आजारपणाशीच संबंधित असणार ही खूणगांठ मनात होतीच.
“ताईची तब्येत सुधारतेय.. हो ना?.. तिचं ऑपरेशन करायची गरज राहिलेली नाही असं म्हणालेत ना डॉक्टर.. ?” मी उत्सुकतेने विचारलं. कारण यापेक्षा ताईच्या घरून आलेली दुसरी कुठलीच बातमी माझ्यासाठी अधिक आनंदाची असूच शकणार नव्हती.
“नाही रे… ” अजितचा आवाज पडला. “कालच्या चेकपचे रिपोर्टस् आलेत. ते फारसे एन्करेजींग नाहीयेत अरे. ऑपरेशन करावंच लागणाराय. पण आई खूपच अशक्त झालीय. तिच्या अंगातलं रक्तही खूप कमी झालंय. त्यासाठी महिनाभराची औषधं लिहून दिलीयत. मग पुन्हा चेकअप होऊन ऑपरेशनची तारीख ठरणाराय.. “
आता यापुढं आणखी काही ऐकायची माझी इच्छाच मरून गेली. आरती समोरच बसली होती.
” अहोs, काय झालं? गप्प कां आहात तुम्ही? बोला नाs त्याच्याशी… “
” नको.. ” माझा आवाज भरून आला. “.. घे.. तूच बोल.. “मी कसंबसं बोललो न् रिसिव्हर तिच्या हातात दिला. एखाद्या मूक साक्षीदारासारखा तिच्यासमोर बसून राहिलो.
“अजित, बोल रे.. मी मामी बोलतेय. ” आरती म्हणाली. त्यानंतर एक दोन क्षणच गेले असतील आणि…
“काय सांगतोयस काय.. ?” आरतीने उत्तेजित स्वरांत विचारलं आणि पुढे दोघं बराच वेळ बोलत राहिले. आश्चर्य आणि आनंदाने चिंब भिजलेली तिची अवस्था पाहून मला पटकन् समजेचना काय झालंय? बोलणं संपताच तिने रिसिव्हर ठेवून दिला तरी ती अजून त्याच आनंदात तरंगत होती!
” काय गं? काय म्हणत होता अजित? कसली आनंदाची बातमी? “
” अहो, ताईंना महाराष्ट्र राज्य लाॅटरीचं पाच लाख रूपयांचं बक्षिस लागलंय. “
हे अनपेक्षितच होतं.
” काsय.. ?”माझा विश्वासच बसेना. हे शक्यच नव्हतं. ताई आणि लॉटरी? कसं शक्य आहे हे? अतिशय स्वाभिमानानं जगणारी माझी ताई कोणत्याही प्रश्नाचं असं सोपं, सोईचं उत्तर शोधणं शक्य तरी आहे कां? सरळ, साधं आयुष्य जगण्यात आनंद मानणारी माझी ताई लॉटरीचं तिकीट काढेलच कशाला? माझ्या मनातली ही लगेचची प्रतिक्रिया मनातच विरून गेली आणि क्षणकाळ बधीर होऊन गेलेलं माझं मन थोडं हलू बोलू लागलं. त्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झालेली होती. आजवर पैशाकडेच पैसा जातो हेच ऐकलेलं.. पाहिलेलं. पण इथं नेमक्या निकडीच्या वेळीच तो गरजवंताकडे गेलाच कसा? आणि तोही नेमक्या हव्या त्या क्षणी आणि अशा राजमार्गाने? हे खरं म्हणावं तर लॉटरीचं तिकीट कुणी, कधी आणि कां काढलं असेल? केशवरांच्याकडे रिटायरमेंटनंतर आलेले साडेतीन लाख रुपये होते, शिवाय तशीच वेळ आली तर आम्ही सर्वजण खर्च करायला तयार होतो, मग लॉटरीचं तिकीट काढण्याइतकी हतबलता तिला कां जाणवली असेल?…
प्रश्न अनेक होते. पण.. सगळेच अनुत्तरीत.. !
खूप लहानपणी कधीकाळी वाचलेली लाकूडतोड्याची गोष्ट मला आठवली. आम्ही सर्वांनी मदतीच्या रूपाने देऊ केलेले पैसे, आपले नव्हेत म्हणून ताईने आणि काकांनी नम्रपणे नाकारलेले होते. म्हणूनच कां या पाच लाखाच्या बक्षिसाच्या रूपातल्या सोन्या-चांदीच्या कु-हाडी त्यांना अशा प्राप्त झाल्या? कसाही विचार केला तरी या घटनेमागचा समाधानकारक असा कार्यकारणभाव माझ्या लक्षातच येईना.
हे सगळं कसं घडलं याचा शोध घेताना मन थकून गेलं. ‘योगायोग’ हे एकच सोयीचं पण घासून गुळगुळीत झालेलं उत्तर माझ्या मनाचं समाधान करेना.
“ताईंची इच्छाशक्ती जबरदस्तच म्हणायची” आरती एक दिवस सहज म्हणाली आणि माझ्या विचारांना योग्य दिशा मिळाली. पण त्या दिशेने भरपूर पायपीट करूनसुद्धा समाधानकारक उत्तर सापडेचना. ताईशी मोकळेपणाने बोललो तर सगळंच नीट समजेल असं वाटलं खरं, पण पुढच्या सगळ्याच भेटी नंतर दवाखान्यात ताई निकरानं मृत्यूशी झुंज देत असतानाच्याच. तिथे तिला कांही विचारणं, बोलणं शक्यच नव्हतं. तिथे फक्त समोर उभं राहून तिचं एकाकी लढणं आम्ही ति-हाईतासारखं पहात होतो! त्या पहाण्यातला प्रत्येक क्षण न् क्षण मला हतबल करणारा, माझा पराभव करणाराच होता!
… आणि एक दिवस… मलाच शह दिल्यासारखी ताई गेली! ऑपरेशन यशस्वी होऊनही नंतर जवळजवळ महिनाभर आतल्याआत जळत आणि तळमळत अखेर ती गेलीच!!
ती गेली ते असं चटका लावून, मला नको इतकं हळवं करून आणि कधी नव्हे ते मनाला अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न माझ्या मनात निर्माण करून!!
ती गेल्यानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेले केशवराव म्हणाले होते, “अखेर ती माझं काही न घेताच, मला मात्र जाताना खूप कांही भरभरून देऊन गेलीय. “
तिच्या साऱ्या यातनांची, तिच्या मनाच्या तळात सुरू असणाऱ्या उलघालीची केशवरावांइतकीच माझी आईसुद्धा एक महत्त्वपूर्ण साक्षीदार होतीच. आणि तिचं तिथं असणंच माझ्या मनात निर्माण झालेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधण्यास मला माझ्याही नकळत सहाय्यभूत ठरणार आहे याची पुसटशीही शक्यता त्याक्षणी मात्र मला जाणवलेली नव्हती एवढं खरं!
(क्रमशः – दर गुरुवारी)
————————
©️ अरविंद लिमये, सांगली
(९८२४७३८२८८)
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈