श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ? मोरूचा आगाऊ दसरा ?

“नमस्कार पंत !”

“नमस्कार, नमस्कार ! काय रे मोरू, आज बरेच दिवसांनी शुक्राची चांदणी…..”

“काय पंत, मी तुम्हाला चांदणी वाटलो की काय ?”

“सॉरी सॉरी मोरू, अरे पेपर मधे तो आपला चांदणी बार……”

“आपला चांदणी बार ?”

“अरे तसं म्हणायची एक पद्धत असते मोरू, आपला या शब्दाचा अर्थ तसा शब्दशः घ्यायचा नसतो !”

“ते माहित आहे मला, पण तुमच्या त्या चांदणी बारच काय ?”

“मोऱ्या, माझा कुठला आलाय चांदणी बार, आम्ही सगळे…… “

“अरे हो, मी विसरलोच पंत, तुमचे ‘खाऊ पिऊ मजा करू’ हे पेन्शनरांचे मित्र मंडळ दर महिन्याला वेगवेगळ्या बार मधे जाते ना !”

“अरे हळू बोल गाढवा, हिच्या कानावर गेलं, तर आत्ता दिवसा ढवळ्या मला चांदण्या दाखवायला कमी करणार नाही ही !”

“ओके, पण त्या चांदणी बारच काय सांगत होतात तुम्ही पंत ?”

“काही नाही रे मोरू, त्या बारची एक बातमी आली आहे पेपरात, ती वाचत असतांना नेमका तू टपकलास, म्हणून चुकून तुला चांदणी म्हटलं एव्हढच !”

“कसली बातमी पंत, हॅपी अवर्सचा टाइम वाढवला की काय ?”

“मोरू एक काम कर, आता घरी जाताना हा पेपर घेवून जा आणि सावकाश चांदण्या बघत… सॉरी सॉरी.. सावकाश सगळ्या बातम्या वाचून, संध्याकाळी आठवणीने तो परत आणून दे ! आणि आता मला सांग इतक्या दिवसांनी, सकाळी सकाळी शुचिर्भूत होऊन किमर्थ आगमन ?”

“काही नाही पंत, सोनं द्यायला आलो होतो !”

“कमाल आहे तुझी मोरू, तू दुबईला गेलास कधी आणि आलास कधी ? चाळीत कोणाला पत्ता नाही लागू दिलास !”

“तसं नाही पंत, मी काय म्हणतोय ते जरा…. “

“आणि तुझ ही बरोबरच आहे म्हणा, तिकडे जायला वेळ तो कितीसा लागतो, फक्त अडीच तासाचा काय तो प्रवास ! अरे इथे हल्ली लोकांना दादर ते वाशी जायला तीन….. “

“पंत, सोनं काय फक्त दुबईला मिळत ?”

“तसंच काही नाही, पण दुबईला स्वस्त असतं असं म्हणतात आणि सध्या IPL पण चालू आहे ना, म्हणून म्हटलं तू एका दगडात दोन….. “

“पंत, खरं सोनं देण्या इतका मी अजून ‘सुरेश अंधानी’ सारखा श्रीमंत नाही झालो !”

“आज ना उद्या होशील मोरू, माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी !”

“पंत, नुसते आशीर्वाद असून चालत नाहीत, त्यासाठी कापूस  बाजारात उभे राहून, सूत गुंड्या विकणाऱ्या बापाच्या पोटी, मोठा मुलगा म्हणून जन्मावं लागत, त्याला एक धाकटा निक्कमा भाऊ असावा लागतो, जो परदेशातल्या भर कोर्टात हात वर करून, मी कफल्लक आहे, असं अर्मानी सूट बूट घालून छाती ठोक पणे सांगू शकेल आणि…. “

“अरे मोरू, तू सोन्या वरून एकदम अँटिलीया… सॉरी सॉरी… भलत्याच सत्तावीस मजली अँटिनावर चढलास की !”

“पंत, आता तुम्ही विषयच असा काढलात, मग मी तरी किती वेळ …. “

“बरं बरं, पण तू ते सोनं का काय ते…. “

“हां पंत, हे घ्या सोनं, नमस्कार करतो !”

“मोरू, अरे ही तर आपट्याची पानं, यांना सोन्याचा मान दसऱ्याच्या…… “

“दिवशी, ठावूक आहे मला पंत !”

“आणि अजून नवरात्र यायचे आहे, संपायचे आहे आणि तू आत्ता पासूनच हे का वाटत फिरतोयसं ?”

“अहो पंत, त्या दिवशी यांची किंमत खऱ्या सोन्यापेक्षा कितीतरी जास्त असते ना, म्हणून !”

“धन्य, धन्य आहे तुझी मोरू !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments