सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ गोडी अमृताची, झळाळी सुवर्णाची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

१५ ऑगस्ट १९४७ ‘स्वतंत्र भारता’ ची पहिली पहाट झाली. प्राचीवर केशरी रंगाची उधळण, सूर्यकिरणांची शुभ्र प्रभा आणि स्वतंत्र भूमातेची हिरवाई या सर्वांमध्ये असंख्य स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, त्याग, बलिदान यांचे पवित्र असे ‘नीलचक्र’ यांच्या संगमातून जणू सर्वत्र भारताचा तिरंगा ध्वज लहरत होता. सर्वत्र आनंदी आनंद भरून वाहत होता. स्वतंत्र भारतात सर्वजण मुक्त श्वास घेत होते. स्वातंत्र्यलढ्यातून स्वातंत्र्यप्राप्तीची यशश्री लाभली होती.

हा लढा सोपा नव्हता. असंख्यांचे अतुलनीय शौर्य, असीम त्याग आणि परम बलिदान यामुळे हा दिवस उजाडला होता. म्हणूनच या सर्वांचे मंगल स्मरण आणि त्यांच्या कार्याचे पावित्र्य राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. देशहीत जपणाऱ्या चांगल्या कृतीतून त्यांना आपण मानवंदना दिली पाहिजे.

आज देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होत आहे. देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. मोठी प्रगती केली आहे. वेगवेगळ्या वाटा चोखाळत यशाची शिखरे गाठली आहेत.

या टप्प्यावर थोडे सिंहावलोकन केले, थोडे सद्य परिस्थितीचे अवलोकन केले तर काही गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा हे लक्षात येते.

आपल्या देशाचा प्राचीन इतिहास अतिशय वैभवशाली, समृद्ध असा आहे.नंतर देशाला दीर्घकालीन अशा पारतंत्र्याला तोंड द्यावे लागले. त्यासाठीच दीर्घकालीन स्वातंत्र्यलढा सुरू होता. असंख्य क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, निस्सीम देशभक्तांच्या परम बलिदानाने, धैर्याने, शौर्याने, त्यागाने देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली.

स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही प्रस्थापित झाली. देशाने या दीर्घ कालखंडात अनेक राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. मत-मतांतरे, विविध वैचारिक धारा यातून देशाला वाटचाल करावी लागली. तरीही देशाने अखंड प्रगतीची वाट सोडली नाही.

मुळामध्ये आपल्याला आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, बौद्धिक, वैचारिक बैठक भक्कम लाभलेली आहे. या पक्क्या पायावर प्रगतीचा आलेख चढत गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, वैद्यकशास्त्र, संरक्षण शास्त्र, दळणवळण अशा कितीतरी क्षेत्रात देशाने प्रगतीची नवी नवी शिखरे गाठलेली आहेत. अणूचाचणी आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातली प्रगती तर अत्युच्च अशी आहे. संशोधन क्षेत्रातही खूप मोठे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानात तर जगातील अव्वल देशांत आपला समावेश आहे.

आत्ताच्या कोव्हिड -१९ च्या महामारीवर स्वतःची लस तयार करून यशस्वी मात करणे हे तर देशाचे अभूतपूर्व यश आहे. जगाच्या इतर देशांमधील, अगदी प्रगत देशांमधील परिस्थिती पाहिल्यावर आपली कामगिरी अगदी कौतुकास्पद आणि अभिमानाचीच आहे.जगण्याच्या प्रत्येक स्तरावर प्रचंड विभिन्नता असणाऱ्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशाने जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि धैर्याने सामूहिकरित्या संकटांचा यशस्वी प्रतिकार केलेला आहे.

स्वातंत्र्याबरोबरच सदैव धगधगती सीमा सुरक्षा देशाच्या वाट्याला आलेली आहे. देशाने युद्ध, दहशतवादी कारवाया यांचा धैर्याने सामना करीत यशस्वी प्रतिकार केलेला आहे.  आज लष्कराच्या तिन्ही दलांची अद्ययावत बांधणी, प्रभावी शस्त्रसज्जता यामुळे देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत मजबूत स्वयंपूर्णता आलेली आहे.

या देशात तरुणाईची संख्या खूप मोठी आहे ही आपली मोठी जमेची बाजू आहे. या हुशार, सक्षम तरुणवर्गाला योग्य ध्येय, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी मिळणे खूप आवश्यक आहे. यासाठी जाणकारांनी, ज्येष्ठांनी प्राधान्याने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे.  अगदी लहान मुलांना चांगले संस्कार,  देशप्रेमाचे धडे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. सोशल मीडिया, नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातील गंभीर धोके समजावून सांगितले पाहिजेत.

आपल्या देशाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. तिन्ही ऋतू आपल्याकडे समानच असतात. भरपूर पाऊस, खळाळत्या नद्या, स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हिरवी गर्द वनराई ही आपली समृद्धी आहे. पण वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणाच्या नादात आपले तिकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जल, वायू प्रदूषण, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम दिसत आहे. परिणामतः निसर्गाचे चक्र बिघडते आहे. बदलत्या हवामानाने सतत शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होते आहे. यासाठी निसर्गाला जपले पाहिजे. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात आणले पाहिजेत. शेतकरी वर्गाची परिस्थिती सुधारून शेती व्यवसाय पुन्हा भरभराटीला आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.

इतरही सर्व गोष्टींमधे देशात सर्व काही चांगलेच, सुरळीत सुरू आहे असे नाही. परकीय शक्तींचे आक्रमण, दहशतवादाचा वाढता धोका या पासून सावध राहायला हवे. मुकाबला करण्यासाठी सतत सज्ज असायला हवे.

इतरही अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत. वाढता भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, धर्मांधता, अज्ञान, दारिद्र्य, कुपोषण, अस्वच्छता, रोगराई अशा कितीतरी गोष्टींवर खूप काम व्हायला हवे. म्हणजे मग समाजाच्या सर्व स्तरातील अंतर कमी होत एकसंध समाज निर्माण होण्यास मदत होईल. या सर्व अभियानांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभागी होत आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजे मग देश नक्कीच प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील यात शंका नाही.

देशाची एवढी प्रचंड लोकसंख्या, इतक्या विविध प्रांतातील नैसर्गिक, सामाजिक वेगळेपण, विभिन्न भाषा, विचारसरणी, राहणीमान यामुळे कोणतीही गोष्ट सहजासहजी साकार होत नाही. राजकीय हेतूने आरोप-प्रत्यारोप, विरोध अडचणी  ठरलेल्या असतात. यातूनही मार्ग काढत कितीतरी चांगल्या गोष्टी देशाने केलेल्या आहेत. व्यापक देशहीताचा विचार करून लोकांनी यासाठी पुढे आले पाहिजे. जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.  भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे कुठलेही दुष्कृत्य घडू नये यासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपल्या घराप्रमाणेच देशाचीही काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या देशातील चांगल्या गोष्टींचे गोडवे गात न बसता त्याच गोष्टी आधी आपल्या देशात आपण पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.

आज आपला देश प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे, सुधारणा सुरू आहेत. मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे, तंत्रज्ञानाची मोठी झेप घेत देश जगातल्या प्रमुख देशातला महत्त्वाचा देश नक्कीच बनेल. त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. हे यश आपणा सर्वांचे असणार आहे. यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्या छान समन्वयाची वज्रमूठ बांधली गेली तर प्रगतीचा हा  गोवर्धन उचलणे शक्य होणार आहे. शेवटी ही श्रीकृष्णाची भूमी आहे.

स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करून’शतक महोत्सवी” वर्षात देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर असेल हे निश्चित.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments