श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक अज्ञ,अजाण माणूस ☆ श्री अरविंद लिमये ☆

एक अज्ञ,अजाण माणूस

कोणताही दुर्गुण वाईटच. पण त्यातही अहंकार अधिक बोचरा. काटेरी. अहंकारी व्यक्तीच्या सहवासात येणाऱ्या कुणालाच तो सुखावह नसतो. तो टोचणारा,अस्वस्थ करणाराच असतो. गंमत म्हणजे या अहंकाराचे काटे अहंकारी व्यक्तीला मात्र त्याचे मन बधीर केलेलं असावं तसे कधीच बोचत  नसतात.अर्थात या बधिरतेमुळे ती बोच जाणवली नसली, तरी त्या अहंकाराचे दुष्परिणाम मात्र त्याला सोसावे लागतातच.

‘हा अहंकार नेमका येतो कुठून?’ हा वरवर गहन वाटणारा प्रश्न. पण अहंकार मुळात बाहेरून कुठून येत नसतोच. कुणीतरी ओवाळून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं म्हणतात.ते अनवधानाने जर कुणी ओलांडलं, तर त्याला ‘लागीर’ होतं असा एक (गैर)समज आहे. यालाच ‘बाहेरचं’ लागीर असं म्हणतात.तसंच अहंकाराला ‘आतलं’ लागीर म्हणता येईल.

सद्गुण आणि षडरिपू दोन्हीही प्रत्येकाच्या मनोभूमीत बीजरूपाने अस्तित्वात असतातच. आजूबाजूची परिस्थिती, संस्कार, विचार करायची पद्धत, यावर त्यातील सद्गुण अंकुरणार की षड् रिपू हे अवलंबून असतं. सुसंगत, घरचं आणि आजूबाजूचं आनंदी वातावरण, परस्पर-सामंजस्य, यामुळे विचारांनाही एक चांगलं वळण लागतं, जे सद्गुणांच्या जोपासणीला पूरक ठरतं.ती सकारात्मकता अर्थातच  षड् रिपूंच्या वाढीला मारक ठरणारी असते.कुसंगत,आत्मकेंद्री विचार, स्वार्थ, संस्कारांचा अभाव, यासारख्या अनुकूल घटकांमुळे निर्माण होणारं वातावरण मात्र दुर्गूणांच्या वाढीस पोषक ठरतं.अशा वातावरणात षड् रिपूंपैकी  ‘मद’ म्हणजेच गर्व स्वतः अंकुरतानाच अहंकारालाही स्वतःसोबत मिरवीत वाढू लागतो.

अनपेक्षित यश आनंददायी असतंच. सूज्ञ माणसं त्या आनंदाची क्षणभंगुरता जाणून असल्याने ते त्यात फार काळ तरंगत रहात नाहीत. त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवरच टिकून रहातात. अहंकारी माणसाला मात्र एवढंसं यशही पचवता येत नाही. आनंदाने बेभान झालेल्या त्याला मग स्वर्ग फक्त दोन बोटेच उरतो.

अहंकार कशाचाही असू शकतो.स्वतःच्या देखण्या रूपाचा, वडिलोपार्जित धनसंपत्तीचा, कार्यकर्तृत्त्वाचा, यशाचा,पद आणि प्रतिष्ठेचा, त्यामुळे मिळत असणार्‍या मान-मरातबाचा, सत्तेचा.. अगदी कशाचाही.अहंकार त्या व्यक्तीच्या दृष्टीने मारकच. अहंकार असेल तिथे समाधान राहूच शकत नाही.

माणूस खरंतर समाजप्रिय प्राणी.एकटेपण त्याला कधीच रुचत नसतं. माणसाच्या जगण्याचा परीघ लहान असो वा मोठा तो सच्चे मित्र, हितचिंतक, नाती-गोती यांनी समृद्ध असावा असंच प्रत्येकालाच वाटत असतं. अहंकारी व्यक्तीलासुद्धा ही अभिलाषा असतेच. पण त्याच्याच अहंकारीवृत्तीमुळे माणसे त्याच्यापासून नकळत दुरावत जातात. त्याच्याभोवती गर्दी नसते असे नाही, पण ती असते फक्त त्याचा अहंकार कुरवाळणाऱ्या ‘होयबां’चीच! त्यामुळे मनात आकारू लागलेला अहंकाराचा कांटा योग्यवेळी उपटून फेकून देण्याऐवजी, तोंड देखल्या  स्तुतीने तो वाढतच जातो. आणि त्या क्षणापासूनच अहंकारी व्यक्तीची विनाशाकडे वाटचाल सुरु होते.

अहंकार म्हणजे अहंभाव नव्हे तर अहंभावाचा अतिरेक. अहंभाव भल्याबुऱ्या प्रत्येकाच्या मनात असतोच. आणि तो वाईट असण्याचा प्रश्नही नाही कारण तो ‘आपला’ चाॅईस नसतोच. ‘मी’ आणि ‘माझं’ याची जाण प्रत्येक माणसाला त्याच्या न कळत्या वयापासून नैसर्गिकरीत्याच असते.आपले आणि परके यातला फरक त्या वयापासूनच त्याला व्यक्त करता आला नाही तरी समजत असतोच. म्हणूनच आईला चिकटून बसलेल्या बाळाला जर गंमतीने कुणी ‘आई  माझीs’ असं म्हटलं तर ते बाळ लगेच कावरंबावरं होत आपल्या बोबड्या बोलांनी ‘नाईsआई माजीs’ असं म्हणत ओठ काढून रडवेलं होतं. आई,बाबा,ताई, दादा,खेळणी,ठराविक दुपटं,वय वाढेल तसे स्वतःचे कपडे,गोष्टींची पुस्तकं, पांघरूण,खेळणी, वाटणीचा खाऊ हे सगळं मनोमन ‘माझं माझं’ म्हणून जपतच ते लहानाचं मोठं होत असतं. ‘मी’पणा, अहंभाव हा असा न कळत्या वयापासून आपला प्रत्येकाचाच स्थायीभाव असतो. हा अहंभाव हेच अहंकाराचे बीज! ते अंकुरलं,वाढत गेलं,तरच त्याचं अहंकारात रूपांतर होतं.आणि अर्थातच ते हानिकारक ठरतं. 

ठराविक मर्यादेपर्यंतचा अहंभाव म्हणजे स्वाभिमान.तो मात्र व्यक्तिविशेष ठरणारा असतो. पण त्या पुढे होणारी अहंपणाची अतिरेकी वाढ स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात व्हायला कारणीभूत ठरते.

यापासून बचाव व्हावा म्हणूनच ‘अहंकाराचा वारा न लागो ‘ अशी प्रार्थना प्रत्येकानेच स्वत:साठी करायला हवी आणि त्यादिशेने प्रयत्नही !

अहंकाराची लागण न होण्यासाठी प्रत्येकाने जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. जगायचं का? कशासाठी?कसं? हा विचार करून प्रत्येकाने जगण्याचं प्रयोजन ठरवायला हवं.

जगणं म्हणजेच जीवन. मग ते येईल तसं, जमेल तसं जगायचं कि अट्टाहासाने फक्त स्वतःसाठी जगायचं ते व्यक्तिपरत्त्वेच ठरत असतं.

ज्याना जीवन खर्‍या अर्थाने कळलेले आहे ते आनंदासाठी जगत नसतात, तर आनंदाने जगत असतात. त्यांच्या प्रत्येक पावलावर, लहान-सहान गोष्टीतही त्यांना आनंद सापडत जातो. तो फार शोधावा लागतच नाही.न शोधताही सापडतो.

आनंद तर प्रत्येकाला हवाच असतो. पण प्रत्येकाच्या आनंदाची त्याच्या गुणात्मकते नुसार प्रतवारी मात्र ठरलेली असते.सगळ्यांचे सगळेच आनंद सारख्या प्रतीचे नसतात. आनंद क्षणभंगुरच असतात,पण त्या अत्यल्प काळातही ते मनाला रिझवून, समाधान पेरुन जातात. असे आनंद निर्भेळ असतात. कर्तव्यपूर्तीतून मिळणारा आनंद कृतार्थता देणार असतो. दुसर्‍याचं दुःख हलकं करून मिळणारा आनंद उदात्त असतो. दुसर्‍याच्या आनंदाने स्वतःही आनंदी होण्यातला आनंद दुसऱ्याचा आनंद द्विगुणित करणारा असतो.

आनंद कुठे कसा शोधायचा, मिळवायचा हे प्रत्येकाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. ज्यांना जीवन म्हणजे काय हे कळले आहे, ती वरवर सरळ साधी वाटणारी माणसंही जगताना स्वतःचा विचार करतात तसेच आपल्या सोबत असणाऱ्या इतरांचाही.

आत्मकेंद्री,अहंकारी माणसं मात्र फक्त स्वतःचाच विचार करीत आनंद मिळवायचा अट्टाहास करतात. त्यामुळे तो आनंद निर्भेळ नसतो.भेसळयुक्त असतो. वरवर पहाणार्‍याला जरी असा आत्मकेंद्री माणूस यशस्वी, श्रीमंत, सुखी-समाधानी वाटला तरी आतून तो एकलकोंडा, दुःखी,पोखरलेलाच असतो. 

अहंकारी माणूस ‘जीवन म्हणजे काय हे न कळलेला’ या अर्थाने मला अज्ञ,अजाण वाटतो. कारण त्याचा विचार स्वतःपलिकडे कधी जाऊच शकत नाही.

जीवन कळलेल्या माणसाचं नेमकं जगणं कवीवर्य बा.भ. बोरकर यांनी त्यांच्या एका कवितेत अतिशय सुंदर रीतीने शब्दबद्ध केलेले आहे.त्या कवितेतली या मोजक्याच ओळीही मी अहंकारी माणसाला ‘अज्ञ’, ‘अजाण’ कां म्हणतो ते अधोरेखित करणारी आहे.

‘जीवन त्यांना कळले हो

मीपण ज्यांचे पक्व फळापरी

सहजपणाने गळले हो

जीवन त्यांना कळले हो ‘

असं असताना ‘मी’पणालाच कवटाळून बसणाऱ्या अहंकारी माणसाला ‘अज्ञ’च म्हणायला हवं ना?

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments