सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “ऋतूनां कुसुमाकर…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

वसंत हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः’ असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये जणू पुन्हा रुजून येतो.

कात टाकणारे साप, धुळीची, किरणात नाचणारी बाळे, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा हे सारे आजूबाजूला दिसू लागले की कळते आता बसंत आने को है..अन् मन, सावरीच्या कापसासारखं अलवार होऊन वाऱ्याच्या झुळकी होतं… अशा एक ना दोन अनेक जादू घडत गेल्या आणि या सगळ्या वसंताच्या आगमनाच्या सुचना आहेत हे वयपरत्वे कळत गेले… फुलांचा संभार सांभाळत उभा असलेला चाफा बघणं मला आवडतं… असं वाटतं ,रात्रीच्या वेळी त्याच्या फुलांमधून चांदण्यांचे झरे झिरपतात आणि मुरतात त्याच्या सालीमध्ये…, वाटतं जणू चाफा म्हणजे चांदण्यांचं घरच आहे की काय? तर कधी वाटतं, एखादी सोनपरी आपले इवले पंख पांघरून येईल कुठूनशी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेत राहील… देवघरात झुल्यावर बसवलेल्या गोैरीसारखी…

खरंच हा वसंत एकटा येत नाही कधी. तो घेवून येतो नवीन पालवीची जादू… जी तो पखरत जातो कोमेजलेल्या फांद्यांपासून कोमेजलेल्या मनांपर्यंत… आणि उत्फुल्ल करून टाकतो सारा आसमंत… आपल्या पेटार्‍यातल्या रंगबिरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडी बाज आपल्या रंगांच्या पंचमीत… चाफा, मोगरा, अमलताश, पलाश, बहावा सारेच त्याचे साथी आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखा, वाटायचं हा वसंत जसाकाही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधिका; जी कान्हाच्या स्वागतासाठी सारी मरगळ झटकून साजशृंगार करते आहे. पाखरांच्या गळ्यातून तिच्या कान्हाजीचे स्वागत करते आहे, म्हणते आहे…

ऋतू वसंत तुम

अपनेही रंग सो

पी ढुंढन मै

निकसी घर सो

ऋतू बसंत तुम..

जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि तिने म्हणावे…

सजण दारी उभा… काय आता करू? घर कसे आवरू? मज कसे सावरू? हाच तो क्षण बहाव्यानं आपल्या सोनसळी फुलांनी सजण्याचा आणि पलाश,पांंगार आणि गुलमोहराने बहरण्याचा. वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!

आकाश हेच घर असणाऱ्या तेजाने सगळीकडचा अंधार,उदासिनता दूर सारून प्रकाशानं आसमंत उजळून टाकावा आणि या तेजाचे काही कण पिऊन समस्त सृष्टीने नवा जन्म घ्यावा..असंच काहीसं वाटतं वसंताच्या येण्यानं..जणू फुलणाऱ्या प्रत्येक कळीतून नवीन जीवन जन्माला यावे आणि त्याने आपल्या रंग,गंध,रसातून उधळून द्यावे जीवनासक्तीचे तुषार जे शिशिराच्या वृद्ध उदास पानगळीलाही जगण्याचा मोह पाडतील..हीच तर वसंताची जादू आहे..वसंत म्हणजे सकारात्मकता.वसंत म्हणजे उत्साह. वसंत म्हणजे यौवन..वसंत येतो, दवांत न्हातो… दर्वळ दर्वळ होतो. जणू एखाद्या लाजऱ्या पानसखीचे मंथर गाणे गातो..कधी फुलात हसतो,वनी लगडतो, झऱ्यांत झुळझुळ वाहतो..तर कधी गंध कोवळा  माखून घेऊन आभाळी पसरतो..कधी वाऱ्यावर लहरत सूर सोहळा होतो तर कधी तृणांच्या मखमालीवर गवतफुलाबरोबर उमलताना सोनसावळा होऊन खुलतो..एखाद्या आमराईत सहज वाऱ्याच्या हिंदोळ्यावर आंबवती झुलताना कोकीळाच्या गळ्यातील पंचम तान होतो  असा हा ऋतूनाम् कुसुमाकरः वसंत येतो अन् आपल्या ऋतूवैभवाने चिंब भिजवतो..मला, तुम्हाला आणि साऱ्या चराचराला..तेव्हा आठवतं, ‘गगन सदन तेजोमय’ …तेव्हा नक्कीच स्वागत करूया या ऋतूराजाचं जीवनातल्या नवीन बहरासाठी..

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments