सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ आई नावाचं विद्यापीठ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नऊ दहा वर्षाची सुमन आज आजीबरोबर कामाला आली होती.

” कशी आहेस सुमन? शाळा चांगली चाललीय ना? आज कशी काय आलीस तू?”

“अहो वहिनी,आत्ता शाळेला आठवडाभर सुट्टी आहे.म्हणून आता सुट्टीत आजीच्या मदतीला येणार आहे मी.”

तिच्या बोलण्यात प्रौढत्वाची झलक डोकावत होती. मी बघत होते.कधी सुमन भांडी घासत होती तर कधी विसळत होती. आजी तिला भांडे कसे आणि कुठे जोर देऊन घासायचे,तर कसे चोळून विसळायचे हे काम करता करताच दाखवून देत होती. धुणे कसे धुवायचे, कसे पिळायचे, कसे झटकून वाळत घालायचे हे समजावून देत होती. आजीच्या हाताखाली हळूहळू तयार होणाऱ्या सुमनमधे मला उद्याची हुशार, चुणचुणीत, कामसू गृहिणी दिसत होती.

आमच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील वॉचमनबाईची सकाळी कामाची नुसती धांदल सुरू असायची. आज तिच्या मुलींचा दंगा ऐकू येत होता. म्हणून खिडकीतून डोकावले तर  वाॅचमनबाई धुणे धूत होती.होती जवळच तिची चार पाच वर्षांची मुलगी सावकाशपणे पुढ्यातली भांडी यथाशक्ति घासत, विसळत होती. तिला मधून मधून आईच्या सूचना सुरू होत्या. तर छोटी दीड दोन वर्षाची मुलगी पाण्यात खेळत होतीऋ अचानक तिने ओरडून रडून आईकडून हट्टाने अंगातला फ्रॉक काढून घेतला आणि तो ती पाण्यात बुडवून धूवू लागली. मधूनच ती तो फ्राॅक चोळत होती ,तर मधूनच उठून  आपटत होती. त्या नादात तिचा तोल जात होता. मला तिचे खूप कौतुक वाटले. आईचे अचूक निरीक्षण करून तिची प्रत्येक कृती सुरू होती.

मनात विचार आला आई एक’ चालतं बोलतं ‘विद्यापीठ असते.जगण्याचे शास्त्र आणि प्रात्यक्षिक यांचा असा एकत्र सुंदर मिलाफ कोणत्याच शाळेत नसतो आणि असा अंत:करणापासून शिकवणारा दुसरा प्रेमळ गुरूही  अन्य कोणीच नसतो.  आईची ही शाळा आयुष्यभर अशीच सुरु असते. फक्त अभ्यासाचे विषय बदलत असतात आणि आपल्या मुलांना उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी आई आयुष्यभर धडपडत असते.

अशा विचारात मी आत वळले तर माझी दोन्ही छोटी मुले खोलीच्या सफाईला लागली होती.

“अग रेवा, तुम्ही हे काय करताय ?”

“आई, काल शाळेत बाईंनी  आम्हाला ‘शामची आई’ धडा शिकवला. मला शामची गोष्ट खूप आवडली. छोटा शाम आईला किती मदत करायचा ना !आता सुट्टीत मी पण तुला मदत करणार आहे.

” मी पण”,  छोट्याने ताईची री ओढली. मला मुलांचे खूप कौतुक वाटले.

आज मुली उच्च शिक्षण घेऊन घराबाहेर पडत सर्वच क्षेत्रात उत्तम करिअर करीत आहेत. सर्वोत्तम स्थान मिळवत आहेत. त्याचवेळी त्या घरातली जबाबदारीही नीटनेटकी पार पाडतात.ही दुहेरी कसरत त्यांना जमते.मग मुलांना का नाही जमणार?शिक्षणासाठी,  नोकरीसाठी परदेशी किंवा घरापासून लांब राहताना मुलांनाही घरातली सर्व कामे व्यवस्थितपणे करता आली तरच निभाव लागतोय. नाहीतर खूप हाल होतात.मुलांची कामे आणि मुलींची कामे अशी विभागणी आजकाल राहिलेली नाही.

म्हणूनच आज काळाची गरज झाली आहे की फक्त मुलींकडूनच नव्हे तर मुलांकडून सुद्धा घरातल्या सर्व कामांचा गृहपाठ गिरवून घेतला पाहिजे.उद्याची कुशल ‘आदर्श गृहिणी’ कशी बनेल या संस्कारातच मुलगी लहानाची मोठी होत असते.मुलांवर सुद्धा बालपणापासूनच हे कामाचे संस्कार होणे आवश्यक आहे. उद्याचा समंजस जोडीदार बनण्यासाठी आणि घराच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा.

“अग रेवा, या इकडे. मी दाखवते तुम्हाला दोघांना सफाई कशी करायची ते.”  असे म्हणत मी हातात झाडू घेतला.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments