सौ. सुचित्रा पवार

आठवणीतील संक्रांत… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

कार्तिक महिन्यातील दिवाळीला सुरू झालेली थंडी पौष महिन्यात अजूनच वाढायची.

ठिकठिकाणी पहाटे पहाटे शेकोट्या पेटायच्या.पावट्यांच्या मोहराचा अन शेंगांचा घमघमाट सगळ्या रानातून दरवळत असायचा.करड्याची लुसलूस रोपे टच्च भरलेल्या हरभऱ्याच्या डहाळ्याना सोबत करायचे.दाट धुक्यात शेते शिवारे गुडूप व्हायची,गव्हाची शेते हिरव्यागार ओंब्या डोक्यावर घेऊन आनंदात डोलायची,शाळूची हिरवीगार ताटे एका पानावर येऊन टपोरी कणसे प्रसवायच्या तयारीत असायची,आंब्याचे मोहोर मधमाशांना न् कीटकांना धुंद करायचे आणि या निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात हळूच संक्रांत सामील व्हायची.

संक्रांतीला पंधरा तीन आठवडे  राहिले असताना कोकणपट्ट्यातून (बहुतेक)संक्रातीच्या(नव्या मडक्याच्या)बैलगाड्या भिलवडी नाक्यातून गावात प्रवेश करायच्या.भिलवडी नाक्यातच आमची शाळा असल्याने आम्हाला त्या येताना दिसायच्या आणि संक्रांत जवळ आल्याची जाणीव व्हायची. खूप खूप आनंद व्हायचा.

तीन -चार गाड्या शिगोशिग भरून त्यावर भाताचे काड आणि जाळी लावून हळू हळू चालत चालत त्या इतक्या लांब प्रवास करत.गाडीच्या उभ्या दांडीवर गाडीवान बसायचे,त्याच दांडीखाली कापडाची किंवा पोत्याची मोठी खोळ ,त्यात चार स्वैपाकाची भांडी असायची .बाजूला एक कंदील लटकवलेला असायचा आणि कधी पुढं तर कधी बरोबर  त्यांचे पाळीव कुत्रेही इतक्या लांबून चालत चालत यायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगरू संथ चालीत खूळ खूळ नाद करत वाजायची. एक गाडी नाक्यातच मोकळ्या मैदानात उतरायची,एक आमच्या घरामागच्या मोकळ्या मैदानात आणि दोन गावात कुठेतरी थांबत असत.आम्ही लहान असल्याने त्यांचे नेमके ठिकाण माहीत नाही.वर्षानुवर्षे या गाड्या त्याच ठराविक ठिकाणी थांबायच्या; किती वर्षांपासून त्या येत होत्या माहीत नाही पण कळत्या वयापासून आम्ही त्या पहात होतो.

आमची शाळा सकाळ सत्रात असायची .शाळा सुटून घरी आलो की दप्तर टाकून गाडीजवळ जायचो.भाताच्या काडात अलवार  शिगोशिग भरलेल्या गाडीवर जाळे लावून करकचून बांधलेलं असायचं जेणेकरून मडक्यांना तडा जाऊ नये.इतक्या लांबून बिचारे जपून गाडी हळुवार चालवत येत असणार कारण वर्षभराचे पोटाचे साधन होते त्यांचे.सहा-सात महिने खपून,गाळलेला घाम होता तो.गाडी सोडून, बैल बांधून कुंभार विश्रांती घेई.गाडीशेजारीच कुत्रे धापा टाकत बसून असे.कुंभारासोबत अजून एखादे नातेवाईक असे.क्वचितच एखादे ७-८वर्षाचे पोर असे पण स्त्रिया कधीच येत नसत.एका गाडीबरोबर दोन किंवा तीन पुरुष असत.हडकुळी शरीरयष्टी ,पांढरा ढगळा अंगरखा,गुडघ्यापर्यंत घातलेली खाकी ढगळ चड्डी आणि पांढरी टोपी इतकाच वेष असायचा त्यांचा.

उन्ह कलतीला लागली की गाडीवरील जाळी हळुवार काढून काड बाजूला सारत एक एक मडके बाजूला काढून गाडीजवळ मांडून ठेवत.पाच पाच छोट्या मोठ्या संक्रांतीचे(मडक्यांचे)गट,तांबड्या मातीच्या,काळ्या मातीच्या चुली,उभट -गोल करंड्या ,बिश्या(पैसे साठवण्यासाठी मातीची वस्तू) अशी कितीतरी आकाराची वेगवेगळी मातीची भांडी त्यांनी आणलेली असत.मडक्यांची काळी सोनेरी झाग सगळ्या हाताला लागायची.मला उत्सुकता असायची ती बोळकी,बिशी आणि छोट्या पाणी भरायच्या कळशीची.

मडकी मांडून झाली की मग शेजारीच ते तीन दगडांची चूल मांडत.चिपाड,चगाळ घालून चूल पेटवत.गाडीला केलेल्या खोळीतून जर्मनची पातेली, ताटल्या,बाजूला काढून घेत ;मग चुलीवर चहा ठेवत.चहा  पिऊन त्याच चुलीवर एका पातेल्यात भात शिजत घालत आणि आसपासच्या चार घरातून कालवण मागून आणत. भातात ते कालवण कालवून खात आणि शेजारच्याच गोठ्यात झोप न विश्रांती घेत.

गाडी आलेली माहिती झाली की बायका खण (५मडक्यांचा समूह)ठरवायला यायच्या.खणाव्यतिरिक्तही बरेच काही घ्यायच्या.बेटकं घालायला उभट बरणी,बी बेवळा राखेत घालायला मोठं गाडगं, चूल जुनी झाली असेल तर चूल. गरजेनुसार वस्तूंची बेरीज व्हायची मग सौदा व्हायचा.हा सौदा पैशावर नसायचा तर ज्वारीवर असायचा,अडशिरी पासून पायली,दीड पायली,दोन पायली.वस्तूच्या संख्या व आकारावर हा सौदा असे.

हे लोक कधीच पैसे घेऊन खण किंवा इतर वस्तू विकत नसत.चुकूनच ज्यांच्याकडे ज्वारी मिळणार नाही अशांकडून पैसे स्वीकारत.जसजशी संक्रात जवळ येई तसतशी बायकांची खरेदीला लगबग सुरू व्हायची.

आठ दिवसांवर संक्रांत आली म्हणजे कासारीण बांगड्या विकायला गल्लोगल्ली फिरायची.संक्रातीला नवीन बांगड्या मिळायच्याच हमखास! त्याआधी कुठल्या आवडल्यात त्या हेरून ठेवायच्या आणि मग तिला बोलावून त्या आवडीच्या बांगड्या घ्यायच्या.

ववसायला नवी काकण पायजेतच! म्हणून बायका हातभर बांगडया चढवायच्याच.अगोदरच्या नवीन असल्या तर मग दोन रेशमी का होईना पण नवीन बांगड्या संक्रातीला चढवायच्याच .

संक्रात आली की शाळेतल्या पोरी आपापल्या मैत्रिणींना संक्रात भेट द्यायच्या.गंधांची गोल बाटली,प्लास्टिक टिकल्या,रंगीत चाप ,डिस्को रबर.ही देवाणघेवाण फक्त आपल्याला कुणी भेट दिली तरच तिला द्यायची, नाही दिली तर आपली भेट मग परत मागून घ्यायची! किती मजेशीर  शाळकरी दिवस होते ते!

संक्रांत दोन दिवसांवर येऊन ठेपायची.दुकानातून चार आणे किंवा आठ अण्यांची मेंदी आणायची मग लिंबू ,काथ घालून मेंदी भिजत घालायची आणि रात्री डाव्या हाताने उजव्या आणि उजव्याने डाव्या तळहातावर गुलाच्या काडीने मेंदीचे गोल गोल ठिपके द्यायचे.सकाळी उठल्यावर त्यातली निम्मिअर्धी सुकून पडलेली असायची.उरलेल्या मेंदीवर खोबरेल तेलाचे थेंब टाकून दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून उरलेली मेंदी पण काढून टाकायची मग हात लालभडक दिसायचे.

भोगीच्या आदल्या दिवशी मग कुणाच्यात पावटा ,कुणाच्यातला हरभरा ,ऊस ,शेतातले तीळ,राळे,बोरे,गाजरे, कांदा-लसणाची पात एकमेकींना देवाणघेवाणवाण करायच्या.तिघी चौघी मिळून अंगणात गप्पा मारत पावटा ,हरभरा सोलत बसायच्या.शेतातून हरभऱ्याचे भारेच्या  भारे आणायचे आणि शेजारी पाजारी वाटायचे.आंबट गोड गोल गोल बोरे म्हणजे आमचे विक पॉईंट! बांधावरच्या बोरी सर्वांगावर बोरांचे भार वागवत झुकून जात.हिरवी -पिकली बोरे पाटीने असायची त्यातली पसा पसा बोरे आसपास सगळ्यांनाच मिळायची.शेतातल्या असल्या सगळ्या वस्तुंचीच देवाण घेवाण व्हायची.प्लास्टिक वस्तू आणि इतर गोष्टींचे वाण लुटायची पद्धत नैसर्गिक वस्तूंच्या  देवाणघेवाणीत कधी घुसली काय माहीत!

भोगी दिवशी मग पहाटे लवकर उठून सवाष्णी न्हाऊन एकमेकींच्या घरात जाऊन हळदी कुंकू लावून यायच्या आणि मग भोगीच्या कालवणाला चुलीवर फोडणी बसायची.बाजरीची भाकरी,भोगी आणि राळ्याचा भात खाऊन सुस्ती यायची.

ज्या दिवसाची वाट पहात असू तो संक्रांतीचा दिवस शेवटी यायचाच. पोळ्या करून,ठेवणीतली पातळ नेसून बायकांच्या झुंडीच्या झुंडी हातात एकावर एक मडकं घेऊन ववसायला गल्लीभर फिरायच्या .प्रत्तेकीच्या अंगणात  तुळशीपाशी जाऊन एकमेकींना ववसायच्या .तिळगुळाची देवाणघेवाण व्हायची .गुलालाने भांग भरून केस गुलाबी रंगात न्हाऊन निघायचे.

दिवसभर गल्लीत हिंडून संध्याकाळी खिशात तिळगुळाची डबी घेऊन सगळ्या बाई आणि गुरुजींची घरे पालथी घालून तिळगुळ देऊन मगच घरला यायचे.शाळेत मारणारे,ओरडणारे बाई -गुरुजी तिळगुळ द्यायला गेल्यावर मात्र गोड-मवाळ व्हायचे.

दुसऱ्या दिवशी वर्गातल्या मुलींना आणि उरल्यासुरल्या शिक्षकांना तिळगुळ देऊन राहिलेले तिळगुळ स्वाहा व्हायचे.सगळ्या वरांड्यात ,वर्गात इथंतिथं सांडलेले तिळगुळ संक्रात संपल्याची जाणीव करून देत.

संक्रांत झाली की मैदानात उतरलेली ती संक्रातीची गाडी आवराआवर करू लागायची.उरली सुरली,तडा गेलेली मडकी,जमा झालेली ज्वारीची पोती गाडीत घालून गाड्या परतीच्या प्रवासाला लागायच्या.

काळ बदलला.घरे आधुनिक झाली .चुली जाऊन गॅस आले.मडक्यांची उतरंड अडगळ होऊन हद्दपार झाली.पारंपरिक शेती संपली. चूल गेली ,राख नाही आणि मग उतरंडीतला राखेत ठेवलेला बी बेवळा पण इतिहास जमा झाला.

संक्रातीच्या गाड्या कधीपासून यायच्या बंद झाल्या काही कळलेच नाही.काकणांची दुकाने ठिकठिकाणी झाली,कासारणीकडून काकण घालून घ्यायची गरज उरली नाही.हातभर काकण भरायची पद्धत जुनी झाली आणि आपसूकच संक्रातीला नवीन बांगड्या भरायची पद्धतही जुनी झाली.

भोगीच्या वस्तूंचे बाजार भरू लागले,शेते आधुनिक झाली ,मने संकुचित झाली.शेजार पाजार आकसला. पावटा, हरभरा, ऊस ,बोरे,तीळ देवाण घेवाण बंद झाली. तीळ तर शेतात लावणेच बंद झाले !

प्लास्टिक वस्तू आणि तशीच छोटी स्टील भांडी वाण म्हणून दिली घेतली जाऊ लागली आणि संक्रातीच्या सणातला नैसर्गिक गुळाचा गोडवा जाऊन कृत्रिम साखरेच्या गोडीने प्रवेश केला.

” तिळगूळ घ्या ….गो ss ड बोला !”

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments