सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कोणती साडी नेसू ????  – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

बायकांना पडणारा सर्वात मोठ्ठा गहन प्रश्न…

.. .. ..  कोणती साडी नेसू.. प्रत्येक बाईच्या आयुष्यात, ‘संध्याकाळी भाजी काय करू’? प्रमाणेच, ‘कोणती साडी नेसू’ हा प्रश्न पण फार ज्वलंत प्रश्न असतो. पुरूषांना जसं मयताला आणि लग्नाला एकच ड्रेस चालतो तसं बायकांचं मुळीच नसतं बरं…  बाहेर पडताना साडी चॉईस करणं बाईसाठी मोठंच  चॅलेंज असतं.  प्रत्येक प्रसंगाची साडी वेगळी असते. त्यातही बऱ्याच साड्या, ब्लाऊज अभावी बाद झालेल्या असतात. साड्या चांगल्या असतात. पण ब्लाऊज पुन्हा शिवावं इतक्या पण नसतात. 

तुमच्याकडे भले शंभर साड्या असल्या तरी त्यातली प्रत्येक साडी तुम्ही कुठेही नेसू शकत नाही. म्हणजे भाजी बिजी आणायला साधीशी वॉश अँड वेअर साडी नेसावी लागते. इथे साधी म्हणजे कॉटन नाही बरं. कॉटनची साडी मुलांच्या शाळेत वगैरे जायचं असेल, लायब्ररीत वगैरे, एखादी कामकाजी मिटींग असेल तेव्हा. वाढदिवस, डोहाळेजेवन वगैरेला जाताना अगदी लाईट जरी बॉर्डर असलेली. लग्नाला जाताना प्युअर सिल्क, कांजिवरम, वगैरे साड्या नेसाव्या लागतात. दहाव्याला, तेराव्याला वेगळ्या लाईट कलरच्या, बारीकशी किनार असलेल्या. त्यात पण समारंभ किती जवळच्या संबंधात आहे, त्याप्रमाणे साडीचा भारीपणा..  हलकेपणा ठरतो. गेलेली व्यक्ती म्हातारी होती की तरूण ह्यावरून पण बायका जरीची /  बिनजरीची असे प्रकार ठरवतात. म्हणजे म्हातारी व्यक्ती गेली की जरा साधीशी पण जरीबॉर्डरची नेसली तरी चालते. तरूण व्यक्ती गेली असेल तर मात्र दु:ख जास्त दाखवावं लागतं. मग जरा जास्त साधी साडी. 

साडी ठरवताना जिच्याघरी लग्न आहे तिला तुम्ही किती किंमत देता त्यावर पण साडी बदलते.काही जणी चांगल्या श्रीमंत साडी सम्राज्ञी असतात… साडी खरेदी हे ह्यांचं आद्य कर्तव्य. म्हणजे ह्यांचं जन्माला येण्याचं प्रयोजनच साड्यांची खरेदी हेच असावं असं वाटावं इतक्या साड्या घेतात.  

साडी नेसताना स्मरण शक्तीचा पण खूप कस लागतो. म्हणजे ही साडी आपण कोणाच्या घरच्या कार्यक्रमाला नेसलो होतो. तिथे तेव्हा कोण कोण होतं. कोणी कोणी ही साडी पाहिली आहे. आता ज्या कार्यक्रमाला चाललोय तिथे त्या आधीच्या कार्यक्रमाच्या कोण कोण येतील. ही सगळी व्हिडीओ फिल्म मनातल्या मनात प्ले करावी लागते. मग त्याप्रमाणे साडी ठरते. 

बरं एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण चांगल्यातली साडी नेसून जावं तर बाकीच्या अगदी साध्या साड्यांमधे आलेल्या असतात. मग ‘बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ अशी आपली गत होते. आणि ते  पाहून आपण दुस-या तशाच कार्यक्रमाला साधीशी साडी नेसावी तर बाकीच्या झकपक साड्या नेसून आलेल्या असतात. पुन्हा पचका!! हे गणित तर मला कधीच जमलेलं नाही. अगदी क्वचित एखाद्या वेळेस आपण चुकून परफेक्ट साडी नेसली की मला धन्य धन्य होऊन जातं. 

बरं साडी कितीही सुंदर असली तरी बायका एकमेकींच्या साडीला कधी मोकळेपणी ‘छान आहे साडी’ असं म्हणत नाहीत. त्या नुसत्या डोळ्याच्या कोप-यातून तुमच्या साडीकडे बघत असतात. आणि अगदीच असह्य झालं तर अशी दखल घेतात.

“माझ्याकडेपण होती अशातली, खूप पिदडली मी. मग मागच्या वर्षी बहिणीला देऊन टाकली.” अशा शब्दांमधून आपण ठरवायचं हे साडीचं कौतुक होतं की पोस्टमार्टेम. 

खूप छान साडी बघून एखादी म्हणते, “हिच्यापेक्षा परवाच्या डोहाळे जेवणातली तुुझी साडी चांगली होती”.पुन्हा आपण कोड्यात. म्हणजे ही साडी चांगली नाही असं हिला म्हणायचं आहे, *पण मग ती साडी चांगली होती तर तेव्हा का नाही बोलली तसं?*असा विचारही मनात येतो.

त्यामुळे साड्यांनी कपाट ओसंडून वहात असलं तरी ‘कोणती साडी नेसू’ ह्या प्रश्नाचं उत्तर काही ते कपाट देऊ शकत नाही. म्हणजे साडया ठेवायला जागा नाही आणि नेसायला साडी नाही अशातली गत. त्यात आता ड्रेसेसची पण भर. ड्रेसेसमधे पण गावात वापरायचे वेगळे, पुण्या-मुंबईत वापरायचे वेगळे, फॉरिन टूरचे वेगळे. ट्रीपचे वेगळे. म्हणजे साड्यांचा जेवढा स्टॉक तेवढाच ड्रेसेसचा…  किती ते डोकं लावायचं बाईने. 

पुरूषांना दोन ड्रेस दिले तरी ते त्याच्यावर दोन वर्ष आनंदाने काढून टाकतील.उलट काही ऑप्शनच न ठेवल्याबद्दल आभार मानतील. त्यामुळे त्यांना ह्या गहन प्रश्नाला तोंड द्यावं लागत नाही परिणामी अनेक महत्वाची कामं त्यांच्या हातून पार पडतात.   

पण *बायका* बिचा-या .. ..  कोणती भाजी करू?.. कोणती साडी नेसू?.. ह्या दोन प्रश्नांपायीच केवळ आयुष्यात मागे पडतात….

लेखिका : अज्ञात 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments