?  वाचताना वेचलेले  ? 

☆ असाही व्हॅलेंटाईन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मित्राची घट्ट मिठी

तोंडातून कच्चकन शिवी

आणि पाठीवर बुक्की

गच्च दोस्ती, घट्ट प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

बाबांची घट्ट मिठी

ऐकायचे त्यांचे काळीज ठोके

न बोलताही ऐकू येते ते प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

संध्याकाळी दिवेलागणीला

ओसरीवर आज्जीसोबत

करुणाष्टके म्हणून झाल्यावर

तिला नमस्कार करताना

तिचा खरबरीत सुरुकुतलेला हात

माझ्या डोक्यावर विसावतो

केसांमधून फिरतो

दाट मऊसर ते कापूसप्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

आईची साद येते

मी कुठे तरी आपल्याच तंद्रीत

लक्षातच येत नाही आईची साद

घरी पोहोचायला उशीर होतो

पेंगुळल्या डोळ्यांची

आई असते उंबरठ्यावर बसलेली

पेंगुळल्या आवाजातच म्हणते,

आलास तू. किती वाट बघायला लावतोस रे, काळजी वाटते बघ

पेंगुळल्या डोळ्यातले प्रेम

उंबरठ्यावर सडा पसरलेले.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

बहिणीचा फोन

दादा, कुठे आहेस ? अरे गाढवा काल येतो म्हणालायस आणि अजून येतोयस ? बावळट आहेस तू. झरझरुन फोनवर तिचे हसणे. मी मारलेल्या थापा ओळखणे. आणि दुसऱ्या दिवशी भेटल्यावर घट्ट मिठीत घेऊन, दाद्या, तू आहेस म्हणून मी आहे रे … पाणावलेले डोळे हळूच पुसत हसताना माझ्या अंगभर पसरणारे तिचे प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

मुलाशी भांडण

मग न बोलता जेवण पान लावून सुम्म बसणं बातम्या संपल्या की झोपायला जाणं झोपल्यावर रात्री कधीतरी जाग येते. अंगावर शाल पसरलेली असते. पायावर कुणाचा तरी हात असतो. उठून बघतो तर मुलगा तसाच बसून माझ्या अंगावर हात ठेवून गाढ झोपलेला असतो. डोळ्यातले पाणी गालावर सुकलेले. मी त्याच्या केसांत हात फिरवून त्याला जागं करतो. तो जागा होतो. आणि घट्ट मला मिठी मारतो. हुंदक्यांना आवरत तो म्हणतो,” बाबा, आय ॲम सॉरी. माझ्याकडून परत असं होणार नाही. पण बोल रे माझ्याशी ” मी ही त्याला म्हणतो, “आय ॲम सॉरी मित्रा. माझंही जरा चुकलंच रे ” घट्ट मिठीत आश्वासक प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

मुलीचा कॉलेजमधे कसला तरी सत्कार असतो.  बाबा, तू यायलाच हवायस हं ” मी आणि बायको जातो. मुलगी तिच्या तिच्या मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यात असते. आमच्याकडे बघते आणि तिच्या नजरेत हसरी चमक उठते. कार्यक्रम सुरु होतो. ती स्टेजवर असते. बक्षिस मिळते. ती माईक हातात घेते. “माझ्या या बक्षिसाचे खरे मानकरी आहेत माझे आई-बाबा.” आमच्याकडे खूण करते. सगळे अॉडिटोरियम आम्हां दोघांकडे बघायला लागते. टाळ्यांचा आवाज वाढत असतो. स्टेजवर असलेली ती आमच्याकडे बघत आपले डोळे पुसत असते. आमचेही डोळे भरलेले. भरुन भरुन ओसंडणारे प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

सिग्नलला गाडी थांबलेली… सोनचाफ्याची फुले विकणारी ती झिप्र्या केसांनी विस्कटलेली गाडीच्या काचेजवळ. मी गाडी बाजूला घेऊन थांबवतो. बाहेर येऊन तिच्याकडून दोन पाकिटे फुले घेतो. पन्नासच्या ऐवजी शंभर देतो. आणि फुलांची पाकिटे उघडून ती सगळी फुले तिच्याच ओंजळीत ओततो. ती श्वास भरुन गंधाळली होते. सोनचाफी गंधाळ हसत हसत निघून जाते. ती गेलेल्या वाटेवर पसरलेले असते ते सोनचाफी गंधाचे निर्व्याज अनामिक प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

वृध्द ओणव्या झालेल्या वडाच्या पारावर संध्याकाळी ती काळपट म्हातारी बसून असते. काळ्याशार अंधारात मिसळलेली. डोळ्यांतले दिवे मंदावलेले. गार वाऱ्यात थरथरणारी. रात्री तिच्यासाठी पारावर जेवणाचे ताट येते. ताट विस्कटत ती कशीबशी चार घास खाते आणि तशीच लवंडते. कुणीतरी तिच्या अंगावर धाबळी ठेवतंय. ती झोपेतच गालातल्या गालात हसते. सकाळी पारावरुनच ती अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली असते. रात्रीचे हसू तिथेच पारावर त्या वृध्द ओणव्या झालेल्या वडाला भेट देऊन व्हॅलेंटाईन डे ची. 

व्हॅलेंटाईन असा ही….

लेखक : अज्ञात 

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments