? वाचताना वेचलेले ?

⭐ रांगोळी… – लेखिका :श्रीमती गायत्री कामत-प्रभू ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या.

अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळपिठाची ओळ.

बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं सुंदर कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.

थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली.

अजून तांदूळपिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या, त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटेसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.

मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या .त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या .

विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.

नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, “इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटं सुद्धा टिकली नाही, तुम्हाला वाईट नाही वाटलं ?”

त्या हसल्या, म्हणाल्या, “रांगोळी काढत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली.रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !”

इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने  सोडवून घेतल्या होत्या.

कशातही अडकून राहू नये , सोडून द्यावं.संयमाने, आनंदाने, क्षमाशील व्रताने जीवन जगावं.

रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच अल्पजीवी आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.

लेखिका :श्रीमती गायत्री कामत-प्रभू

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments