श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “सौन्दर्य वैशाखाचे…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. सध्या वैशाख महिना सुरू आहे. या महिन्यात त्रेता युग प्रारंभ झाले. याच महिन्यात विष्णूंचे भगवान परशुराम, नरसिंह आणि कुर्म अवतार झाले. या महिन्यात वेद प्रकटले. या महिन्यात सीता नवमी, नारद जयंती, भगवान बुद्ध जयंती.. आद्य शंकराचार्य जयंती असते. असे महत्त्वाचे सण असलेला हा पवित्र मास.

या वैशाखात वाढणारा उष्मा मात्र त्रास देतो. पण जीवनात प्रत्येकाला वैशाख वणवा सोसावाच लागतो. जणू सहनशक्तीची ती परीक्षाच. पण परमेश्वर या रुक्षतेतही जो दिलासा देतो त्यासाठी कृतज्ञ राहायलाच हवे.

हा दिलासा मिळतोय तो बहरलेल्या निसर्गातून. हे बघण्याची दृष्टी लाभली होती अण्णासाहेब किर्लोस्करांना. त्यांचे ‘संगीत सौभद्र’ हे सन १८८२ चे अजरामर नाटक. त्यात त्यांनी वैशाखाचे असे काही अप्रतिम वर्णन केले आहे की हा ‘सौंदर्य मास’ ठरलाय.

या महिन्यात बहरलेल्या गुलमोहराने आकाश व्यापलेय. मोगरा.. जाई जुई.. अनंत.. गुलाब सगळ्याच फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतोय. मनुष्यच आम्ररसाने संतृप्त झालाय असे नाही तर आम्रवृक्षावर आम्ररस मनसोक्त पिऊन कोकिळ आनंदाने गात आहेत. फुलांभोवती गुंजारव ऐकू येतोय.

लग्नासाठी आतुर वर वधूंना पावणारा.. स्वप्नपूर्तीचा हा काळ. जाईच्या सुगंधी फुलांचे हार एकमेकांना घालून नवजीवनाचा प्रारंभ केलाय. लग्न मंडपात गर्दी जमलीय. वाद्याचा गजर सुरू आहे. एकुण काय तर हा सौंदर्य मास. सध्या झाडावरच्या फुलांचे फळात रूपांतर करण्यासाठी धडपडणारा, जीवन सुगंधी करणारा हा माधव.. वैशाख मास.

 वैशाखमासी वासंतिक 

 समय शोभला ।

 आम्रासव पिऊनि

 गान करिती कोकीला ॥धृ॥

*

 या जाईजुई मोगरिला

 बहर तो अला ।

 गुंजारव करण्यात 

 गुंग मधुप जाहला ।

 नव पल्लव ते फुटति

 सकल वृक्षगणाला ।

 कुसुमगंधयुक्त मंद

 वात सुटला ॥१॥

*

 अति थंडगार चंदनाचि

 उटी लावुनी ।

 वर जातिपुष्प-धवल हार

 कंठि घालुनी

 रमतात युवति चांदण्यात

 पतिस घेउनी ।

 लोका शीतोपचार

 इष्ट वाटला ॥२॥

*

 नगरांत लग्नमंडपाचि

 दाटि जाहली ।

 नरनारि नटुनि वीर्थित 

 मिरवित चालली ।

 बहु वाद्यगजर दुमदुमुनी

 गर्दि उसळली ।

 दक्षिणार्थ भिक्षुकगण 

 पळत सुटला ॥३॥

*

(गीत : अण्णासाहेब किर्लोस्कर.)

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments