श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

अर्धांगिनी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

जीवनसाथी झाली ती पत्नी म्हणून आली

तिचे घर सोडून ती या घरची झाली 

माझे घर तिचे म्हणून सहज तिने सावरले

पण माहेरच्या आठवणींचे किती हुंदके तिने आवरले,

…….. हे मला कधी कळलेच नाही!

*

स्वत:ची आवड, स्वत:ची स्वप्ने बाजूला ठेवली

माझी स्वप्ने, माझी आवड मात्र जपत गेली

तिचीही काही स्वप्ने असतील

तिच्याही काही आवडी असतील,

……. हे मी कधी विचारलेच नाही!

*

नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले

कौतुकाचे बोल मात्र मी हातचे राखले

क्वचीत काही करपले तर लगेच नाव ठेवले

पण ते करताना तिने कीती चटके सोसले

…….. हे मला कधी जाणवलेच नाही!

*

मी चार पैसे कमावले, तिने दोन वाचवले

माझ्या नकळत भविष्यासाठी साठवले

मी घर चालवतो, ती सांभाळते 

चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते

…….. हे मला कधी समजलेच नाही!

*

मी म्हणालो, मुले मोठी झाली, मार्गी लागली

ती म्हणाली, हो चांगली निघाली बापावर गेली

आपल्या संस्कारांमुळे चांगली वागू लागली

पण त्यांना घडविताना ती किती रात्र जागली

….. हे कधी मला उमजलेच नाही!

*

अशीच वर्षे सरत गेली

कोणाला काय हवं नको सारं बघत गेली

अर्धांगिनी म्हणून आयुष्यभर सोबत ती अशीच रहावी

पण तिच्या ऋणांची परतफेड कशी करावी

……. हे मला कधी जमलेच नाही!

(अर्धांगिनी समजायला खूप वेळ लागतो.. ज्या वेळी समजते त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल.)  

कवी : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments