सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “ओव्या.. निवृत्तीपूर्वीच्या आणि नंतरच्या…” – कवयित्री : सुश्री अमिता नागले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

ओव्या निवृत्तीपूर्वीच्या – –

अरे संसार संसार घड्याळाचा झाला गजर

उठा हजेरी द्या आता स्वैपाकाच्या ओट्यावर

 *

अरे संसार संसार झाली पहाट पहाट

काम करता करता घेऊ चहा घोट घोट

 *

अरे संसार संसार चार जिवांचा विचार

डब्यासाठी काय करू? समस्येचा होई भार

 *

अरे संसार संसार सकाळची वेळ छान

शिट्टी कुकरची कानी आणी घड्याळाचे भान

 *

अरे संसार संसार कामे आटपली सारी

ओटा पुसता पुसता गिझर मी अॉन करी

 *

अरे संसार संसार कावळ्याची अंघोळ होई

आरशात बघण्यास मुळी सुद्धा वेळ नाही

 *

अरे संसार संसार पळा पळा लोकल गाठा

जागा मिळताच आत गर्दीतच हुश्श म्हणा

 *

अरे संसार संसार बँकी पोचले मी बाई

वेळ सुरू होता होता काउंटरवर माझ्या घाई

 *

अरे संसार संसार जेवायला लंच रूम

डब्यांची ती देवघेव आणि हास्याला उधाण

 *

अरे संसार संसार निघायची झाली वेळ

पुन्हा गर्दी तीच थोर आणि जीवालागी घोर

 *

अरे संसार संसार जाता गाठावा बाजार

मनातील चिंता मोठी रात्रीसाठी करू काय?

 *

अरे संसार संसार बसू नये मी निवांत

देवापुढे मात्र नित्य लावायची सांजवात

 *

अरे संसार संसार रोजचीच भाजीपोळी

मिळे बदल यातून फक्त एका रविवारी

 *

अरे संसार संसार जेवणेही उरकली

आता उघडून पाहू पेपराची पाने दाही

 *

अरे संसार संसार झोप डोळ्यात साठली

उद्या काय करू याची चिंता मनात दाटली

 *

अरे संसार संसार पाठ गादीला टेकली

डोळ्यामध्ये माझी सारी स्वप्ने कशी झाकोळली

 ☆ ओव्या निवृत्तीनंतरच्या – – ☆

अरे संसार संसार झाली पहाट पहाट

कानावर पडे माझ्या पाखरांचा किलबिलाट

 *

अरे संसार संसार सकाळची वेळ छान

हाती कप चहाचा नी वाची पेपराचे पान

 *

अरे संसार संसार घेऊ चला मॉर्निंग वॉक

चालताना करू थोडा व्यायामही झटपट

 *

अरे संसार संसार स्वाद घेऊ संगीताचा

आता नाही ऐकू येत कुकरच्या मला हाका

 *

अरे संसार संसार न्याहारीस मिळे सवड

गरमागरम इडली चटणी आणि चविष्ट सांबार

 *

अरे संसार संसार अंघोळीस वेळच वेळ

देवपूजेसाठी मिळती फुलेपत्री ताटभर

 *

अरे संसार संसार लेखन वाचन अपार

आनंदास माझ्या नसे आता मुळी पारावार

 *

अरे संसार संसार छंद जोपासावे किती

राहिलेल्या आवडींना आता मिळतसे मुक्ती

 *

अरे संसार संसार दुपारची वामकुक्षी

आणितसे माझ्या ठायी उर्जाभरी जीवनशक्ती

 *

अरे संसार संसार उन्हे उतरू लागती

छाया लांबता लांबता जगण्यासी अर्थ देती

 *

अरे संसार संसार आता उजळूया वाटा

देऊ दान आनंदाचे जगास या जाता जाता

 *

अरे संसार संसार संधीप्रकाश दाटला

ज्ञानदीप उजळूया अंधाराच्या वाटेकरिता

 *

अरे संसार संसार नाही वाटत लोढणं

आयुष्याच्या वाटेवरचं आहे दैवी ते लावण्य

 *

अरे संसार संसार वेळा निरोपाची आली

किंचितही दुःख नसे, नसे किंचितही भिती

 *

अरे संसार संसार डोळ्यांतील स्वप्ने सारी

साकारलो म्हणती आता उभी ठाकोनी सामोरी

कवयित्री : सुश्री अमिता नागले

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments