सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… प्रवाळांची दुनिया –  भाग – ६ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

प्रवाळांची दुनिया 

अंदमान मधील बेटं कोरल लिफ्स अर्थात प्रवाळ भिंती साठी प्रसिद्ध आहेत. ही बेटं म्हणजे जणू या भूमीवरील अद्भुत चमत्कार आहे. प्रवाळांचे एकशेएकोण ऐंशी पेक्षा जास्त प्रकार इथं आढळतात. शाळा कॉलेज मध्ये शिकत असताना प्रवाळांचा अभ्यास नेहमी वेगळी ओढ लावत असे. प्रवाळांची रंगीत चित्रे मन आकर्षित करणारी असतात. प्रत्यक्ष प्रवाळ कधी बघायला मिळतील असं वाटलं नव्हतं. पण अंदमानची सहल या करता वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रवाळ भिंत ही एक अद्भुत अशी पाण्याखालील बाग आहे. जिवंत, श्वास घेणाऱ्या प्रवाळांच्या बागेत आपण फिरतोय ही कल्पनाच केवढी मोहक आहे, हो ना? 

ते एक चित्तथरारक दृश्य आहे. लाल, गुलाबी, जांभळे, निळे लवलवते प्रवाळ, हात पसरून आपल्या आजूबाजूला पसरलेले दिसतात. जणू काही पाण्याखालील रंगीबेरंगी उद्यानांची शहरेच. अकराशे चौरस किलोमीटर पेक्षा जास्त पसरलेली ही शहरे दोन प्रकारात मोडतात. एक-बॅरियर रीफ आणि दुसरा -फ्रिंगिंग रिफ. भारतातील सर्वात प्राचीन व गतिशील परिसंस्थांपैकी एक. समुद्राच्या उथळ आणि पारदर्शक पाण्यात वाढणारी ही प्रवाळ बेटे म्हणजे सिलेंटेराटा या वर्गातील ऍंथोझोआ गटातील लहान आकाराच्या प्राण्यांची वसाहत होय. हे सजीव चुन्याचे उत्सर्जन करतात. त्यांच्या भोवती या चुन्याचे कवच तयार होते. कालांतराने हे सजीव मृत झाल्यावर, त्यांच्या अवशेषांमध्ये वाढणारे जलशैवाल आणि त्यांनी उत्सर्जित केलेले चुनायुक्त क्षार एकत्र येऊन प्रवाळ खडक तयार होतात. या खडकांना प्रवाळ मंच किंवा प्रवाळ भित्ती (Coral reefs) असे म्हणतात. सामान्य भाषेत आपण यांना पोवळे म्हणतो.

अंदमान येथील नॉर्थ बे, हॅवलॉक बेट (स्वराज द्वीप) आणि नील बेट (शहीद द्वीप) या बेटांवर ही प्रवाळांची भिंत आपल्याला बघायला मिळते. नॉर्थ बे द्वीप या बेटावर मऊशार पांढरी शुभ्र वाळू तुमचं स्वागत करते. या वाळूवर जिकडं तिकडं प्रवाळांचे अवशेष इतस्ततः विखुरलेले दिसतात. स्वच्छ समुद्रकिनारा हे ही अंदमानच्या सर्व सागरकिनाऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. मऊ रेशमी वाळूचा किनारा आणि निळा समुद्र. दोन्ही किती मोहक. निळी मोरपंखी झालर झालर वाली घेरदार वस्रं ल्यालेली नवतरुण अवनी, जिच्या निळ्या झालरीला शुभ्र मोत्यांच्या लडी अलगद जडवल्यात. तिच्या पदन्यासात निळ्या झालरीची लहर फेसाळत शुभ्र किनाऱ्यावर झेपावत येते. येताना किती चमकते शुभ्र मोती पसरून जाते. का कुणी अवखळ सागरकन्या धीरगंभीर भारदस्त किनाऱ्याच्या ओढीनं मौत्यिकं उधळत खिदळत येते. नजरकैद म्हणजे काय हे उमगावं असं हे फेसाळणारं सौंदर्य बघून.

सबमरीन नावाची लालपरी आपल्याला अलगद समुद्रात पाण्याखाली घेऊन जाते. आठ जणांना बसायची सोय असलेल्या या परीतून आपण समुद्रात काही मीटर खोल जातो. आजूबाजूला पसरलेलं प्रवाळ साम्राज्य बघून स्तिमित होतो. नॉर्थ बे किनाऱ्यावर जास्त करून आपल्याला प्रवाळांचे खडक बघायला मिळतात. यातील प्राणी आता जिवंत सापडत नाहीत. पण यांनी समुद्रातील कितीतरी सजीवांना आसरा दिला आहे. इथं माशांचे खूप प्रकार बघायला मिळाले. टेबल कोरल्स, ब्रेन कोरल्स, फिंगर कोरल्स, फुलकोबी कोरल्स अशी यांची नावं असल्याचं आमच्या नावाडीमित्रानं माहिती दिली.

नील बेटावर आम्हाला काचेचा तळ असलेल्या बोटीतून समुद्र सफर करायला मिळाली. या बोटीच्या तळाशी काच बसवलेली असते. त्यामुळे समुद्रातील प्राणी, मासे, वनस्पती अगदी बसल्या जागेवरून दिसतात. या बोटीतून नावाडी आपल्याला समुद्रात दूरवर घेऊन जातो. मनमोहक निळं पाणी संपून जिथं अधिक गहिरा निळा रंग समुद्रानं धारण केला असतो. या पाण्यात प्रवाळांची संख्या जास्त आहे. शिवाय प्रकार देखील जास्त आहेत. समुद्र वनस्पती प्रवाळांच्या खडकांतून डोकावताना दिसतात. नावाडी त्याला माहित असलेल्या प्रवाळांची माहिती देतो. सबमरीन पेक्षा जास्त प्रकारचे प्रवाळ तर दिसतातच, पण विविध मासेही दिसतात. नशीब बलवत्तर असेल तर डॉल्फिन दर्शन सुद्धा होतं.

या बेटांवर स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, केयाकिंग, पॅराग्लायडिंग सारखे साहसी खेळ आहेत. आवड असणारे साहसवीर यात सहभागी होऊ शकतात. समुद्र सफारीचा अनोखा आनंद मिळवू शकतात. अर्थात यासाठी वयाची अट आहे. साठी नंतरचे लोक, तसंच रक्तदाब, मधुमेह किंवा आणखी काही शारीरिक व्याधी असेल तर परवानगी मिळत नाही. इथं जाताना आपलं आधार कार्ड, पासपोर्ट गरजेचा आहे. त्याशिवाय हे साहसीखेळ खेळायला परवानगी दिली जात नाही. हा समुद्र प्रवास सुद्धा शक्य नाही. प्रत्येक जेट्टीवर हे तपासलं जातं.

– क्रमशः भाग सहावा

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments